स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर

0
4736

 

दापोली तालुक्याचे पहिले आमदार ‘सुडकोजी बाबुराव खेडेकर’ म्हणजेच “दादासाहेब खेडेकर”. यांचा जन्म ९ जुलै १९१० रोजी खेड (जि.रत्नागिरी) येथे चर्मकार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अगदी जेमतेम झालेले. घरची गरिबी निवारण्यासाठी मुंबईतल्या गिरणीमध्ये त्यांनी जॉबर म्हणून दहा वर्षे नोकरी केली.  वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. २१ वर्षाचे असताना वडील निवर्तल्यानंतर खेडमध्ये वडिलांचा जन्मजात ‘चर्मकार व्यवसाय’ ते करू लागले. मुंबईत असताना १९२० ते १९३२ पर्यंतच्या राष्ट्रीय चळवळींनी त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचे मन देशसेवेकडे ओढले जात होते. म्हणूनच रात्रीच्या शाळेत जाऊन त्यांनी आपले शिक्षण वाढवले. ते वृत्तपत्रे वाचू लागले. हळूहळू खेडमध्ये आपला धंदाव्यवसाय करीत असताना हरीजनांचे शिक्षण व अस्पृश्यता निवारण इ. सामाजिक प्रश्नांकडे ते लक्ष देऊ लागले.

खेडमध्ये सामाजिक कार्य करताना १९४० मध्ये खेड नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. राष्ट्रीय प्रवृतीचा व्यक्ती म्हणून खेडच्या नागरीकांकडून त्यांना नगरपिता ही उपाधी मिळाली. १९४२ चे ‘चले जाव’ आंदोलनात गांधी प्रेरणेने त्यांनी उडी घेतली. खेड येथे त्यांना अटक झाली व रत्नागिरीच्या सब जेलमध्ये सजा भोगावी लागली. यावेळी रत्नागिरीच्या कारागृहात पं. वकील, आठल्ये गुरुजी, गंगाधर देशपांडे अशा महाराष्ट्रातील नामवंत देशभक्तांशी संबंध आला. १९४३ ला खेड नगरपालिकेची निवडणूक झाली. दादांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली व ते पुन्हा बहुमताने निवडून आले. १९४४ नंतर दापोलीचे गोसेवा चर्मालय अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आज्ञेने ४०रु. मानधनावर वर्षभर चालवले आणि सावंतवाडी जेलमध्ये व्यवस्थापक सुटून आल्यानंतर ते त्यांच्या स्वाधीन केले. १९४६ साली पू. सानेगुरुजी, मोडक गुरुजी, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आग्रहाखातर रत्नागिरी जिल्हा उत्तर भाग मतदार संघातून अर्ज भरला व प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे गमरे यांचा पाडाव करून आमदार म्हणून निवडून आले.

१९४७ च्या स्वातंत्र्यदिनी दादांच्या प्रयत्नाने दापोलीत काँग्रेस कमिटीची स्थापना झाली. दादा १० वर्ष त्या कमिटीचे अध्यक्ष होते. या १० वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक आंदोलनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९५२ ला ते पुन्हा विधानसभेवर पाच वर्षांसाठी आमदार म्हणून निवडून आले.  त्यांची ती कारकीर्द चालू असताना महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. त्याचे परिणाम कांग्रेसच्या भवितव्यावर उमटले आणि पर्यायी दादांना १९५७ साली निवडणुकीत अपयश आले. याचवेळी पू. विनोबांची रत्नागिरी जिल्ह्यात पदयात्रा सुरु होती. दादा विनोबांच्या त्या पदयात्रेत अपक्ष शांती सैनिक म्हणून सामील झाले. पुढे त्यांनी दापोली तालुका व खेड तालुका यात चर्मोद्योग सोसायट्या स्थापन केल्या. दापोलीमध्ये बॅकवर्ड क्लास हाऊसिंग सोसायटी तयार केली. हरिजन मुलींच्या शिक्षणासाठी १९६२ मध्ये दापोलीत कस्तुरबा कन्या छत्रालय व खेड येथे हरिजन व सवर्ण समाजातील सहा वर्षांखालील मुलामुलींसाठीआदर्श बालक मंदिरसुरु केले. १९६४ साली महाराष्ट्र सरकारने त्यांचीऑनररी मॅजिस्ट्रेटम्हणून नेमणूक केली.

१९६७ साली दादांना अस्थम्याच्या विकाराने गाठले. तिथे त्यांच्या कार्याची गती थोडी कमी झाली. परंतु बाबूरावजी बेलोसेंच्या रुपानं त्यांनी नवीन राजकीय फळी निर्माण केली. दादांचा नेहरू, मुरारजी देसाई, जगजीवन राव, सखा पाटील अशा बड्या मंडळींशी थेट संपर्क होता; पण राजकारणापेक्षा जास्त त्यांची सामाजसेवेवरच निष्ठा होती. त्यांनी लोककल्याणाची कामे अत्यंत तळमळीने केली. ६-७-१९७० रोजी त्यांचा षष्ठ्यद्वीपूर्ती कार्यक्रम दापोलीत साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डाकवे गुरुजी, मोडक गुरुजी, आप्पासाहेब पटवर्धन, ना. वसंतराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. १४-१-१९७७ रोजी मात्र हा लोकनेता लोकांमधून हरवला. त्यांचे देहावसान झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here