बीजापुर आणि पोर्तुगिजांमधील या लढाया सतरावे शतक उजाडले तरी चालूच होत्या. दाभोळ बंदर व शहर या लढायांना वारंवार बळी पडत होते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला दाभोळ मुसलमानी आमदनीत होते. इ.स. १६११ मध्ये इंग्रज अधिकारी मिडलटोनला येथे सीदी सुभेदार आढळला. त्याने त्याच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी दाभोळचा व्यापार मंदावलेला, निराशाजनक होता. विक्रेते उत्तम कापड, नीळ आणि काळी मिरी विक्रीसाठी गोंगाट करीत असत. परंतु ते खरेदी करायला कुणी पुढे येत नसे. येथील लोक फक्त जाडेभरडे कापड, चटया ( Kerseys) आणि शिसेच खरेदी करत. त्यानंतर पुढच्याच वर्षी इ.स. १६१२ मध्ये जॉन जॉर्डन या इंग्रजाने दाभोळला भेट दिली. तो लिहितो, “सोळाव्या शतकापासून महत्वाच्या बंदरात पोर्तुगिजांनी बाहेर जाणाऱ्या जहाजांना परवाने ( कार्टाझ ) देण्याची पद्धत सुरु केली होती. दाभोळ बंदरात देखील दुसरीकडे जाणाऱ्या जहाजांना दस्तके देण्यासाठी पोर्तुगिजांनी आपला एक प्रतिनिधी ठेवलेला होता. तांबडा समुद्र, पर्शियातील होर्मुझ आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या गलबताना परवाने देण्यासाठी गोव्याच्या व्हाईसरायकडून त्याची नेमणूक करण्यात आली होती. तोफेची दारू आणि इतर प्रकारचे युद्धसाहित्य गलबतातून नेण्यास मनाई होती. पण पोर्तुगीज प्रतिनिधीला लाच देऊन बंदी असणारे साहित्य नेण्यात येत असे. अरबस्थानातून घोडे आणून विकण्याचा मक्तादेखील त्याच्याकडेच होता. घोडेविक्रीप्रमाणेच दाभोळ शहरात मद्य विकण्याची मक्तेदारीदेखील पोर्तुगीज अधिकाऱ्याकडे होती. यासाठी तो दाभोळच्या आदिलशाही सुभेदाराला दरवर्षी २००० लाऱ्या देत असे. दाभोळात पोर्तुगिजांचा स्वतःचा व्यापार जास्त नव्हता. मात्र सागरी प्रवासाला जाणाऱ्या परदेशीय गलबताना परवाने देण्यासाठी तेथे पोर्तुगीज प्रतिनिधी होता.” (प्रतिनिधी बाबतचा असाच उल्लेख सुरतेहून लिहिलेल्या १० एप्रिल १६२१ च्या इंग्रजी पत्रात आहे.) याशिवाय जॉन जॉर्डन दाभोळच्या वर्णनात लिहितो, “हे बंदर प्रवेश मुखाजवळ अरुंद आहे. या ठिकाणी खडक दिसत असला तरी पाण्याची खोलीमात्र अधिक आहे. शहर दोन मैलावर असताना जहाज जेव्हा प्रवेश करते तेथे हे एक चांगले बंदर असल्याचे जाणवते.” त्याशिवाय दाभोळच्या व्यापाराविषयी तो म्हणतो, “दरवर्षी दोन किंवा तीन जहाजे दाभोळहून लाल समुद्राकडे जातात व त्यामध्येच सुरतेच्या जहाजपेक्षा अधिक व्यापारी माल भरलेला असतो. त्याचप्रमाणे पर्शियन आखातातील होर्मुझ या बंदराकडे देखील दोन जहाजे जातात.”
सोळाव्या शतकात व सतराव्या शतकाच्या आरंभी दाभोळ बंदरातून दक्षिण अरबस्थान, पर्शियन आखातीच्या प्रदेशात व मालदीवसाठी तांदूळ व इतर धान्य पाठविले जात असे. औरंगाबाद येथे तयार झालेले रेशीम व सुती कापड, कोरोमंडलचे कापड अर्मेनियन व पर्शियन व्यापारी पर्शिया, अरेबिया, तुर्कस्तानला घेऊन जात असत. बफता, बिराम, शशेस इ. प्रकारचे कापड दाभोळात निर्माण आणि दाभोळातून निर्यात होत असे. याशिवाय नारळ, सुके खोबरे, सुपारी, गरम मसाले, साखर इ. निर्यात केले जात असे. दाभोळ व सुरत दरम्यान नियमित व्यापार चालत असे. तांदूळ, गरम मसाले विशेषतः मिरी व सुपारी सुरतचे व्यापारी विकत घेत असत. देशभरातील वस्तू सुरतला विक्रीसाठी येत असत. राजपुताना, मांडू, मध्यप्रांतातील वस्तू सुरतहून दाभोळला पाठविल्या जात असत. दाभोळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात दाभोळचे केवळ पर्शियाचे आखात व लाल समुद्रातील बंदराशी व्यापारी संबंध होते असे नव्हे, तर आग्नेय आशियातील देशानांही येथून जहाजे जात असत. सुमात्रा बेटाच्या अचिन या बंदराशी (इंडोनेशिया) दाभोळची जहाजे व्यापार करीत असत. डच कंपनीचा प्रतिनिधी पिटर वान डेन ब्रोकने हिंद महासागरातील घडामोडींचा बारकाईने उल्लेख केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर मध्ये भरपूर कापड घेऊन दाभोळची जहाजे सुमात्रातील अचिन बंदराकडे जात असत आणि परत त्यांना जावा व सुमात्रातील मिरी, डिंक, कापूर, लवंग, मसाल्याचे पदार्थ आणि रेशीम घेऊन फेब्रुवारी महिन्यात परतत असत. ही जहाजे पुढे गुजरातचे खंबायत व पर्शियन अखातातील मोखा या बंदराकडे जात असत. तसेच पर्शियातून आग्नेय आशियाकडे जाणारी जहाजे दाभोळ येथे थांबत असत.
दाभोळचे व्यापारी स्थान ओळखल्यामुळे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचे काही व्यापारी तेथे व्यापार करण्याचा प्रयत्न करत होते. (१६१० नंतरच्या दशकात) पण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात आपले सागरी वर्चस्व निर्माण केले होते व ते वर्चस्व ते अबाधित राखून होते. पोर्तुगिजांच्या दबावामुळेच आदिलशाही व निजामशाही राज्यकर्ते इंग्रज व्यापाऱ्यांना आपल्या बंदरात व्यापाराची परवानगी देण्यात फारसे राजी नव्हते. इ. स. १६१६ मध्ये मिडलटनच्या शिष्टाईने (सलगीच्या प्रत्नांनी) मोरवा जंक याने इंग्रजांना मुक्त व्यापाराची संधी दिली. त्यातच इंग्रजांची सुरतची वखार असुरक्षित झाल्याने त्यांनी आपली वखार दाभोळ येथे हलविण्याचा विचार केला. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. इ.स. १६१८ मध्ये इंग्रजांनी पुन्हा एकदा दाभोळातून व्यापाराचा प्रयत्न केला. पण तेव्हाही वखार हलविण्याचे जमले नाही. इ.स. १६२४ मध्ये पुन्हा सुरतची वखार दाभोळला हलविण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला इंग्रजांना दाभोळच्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण नंतर मात्र किरकोळ उद्भवलेल्या तंट्यात इंग्रजांनी आपल्या बंदुकांनी दाभोळवर गोळीबार केल्यामुळे लोक दाभोळ सोडून पळून गेले. परंतु पोर्तुगीज गुमास्त्याने त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ते परत आले आणि इंग्रजांना त्यांच्या जहाजांवर त्यांनी पिटाळून लावले.
इ.स. १६३६ मध्ये निजामशाही बुडाल्यानंतर महाड ते चिपळूण कोकण व दाभोळ आदिलशहाकडे आले. इ.स. १६३९ मध्ये मंडेलस्लो हा इंग्रज लेखक दाभोळ हे तटबंदी उध्वस्त झालेले, प्रवेशद्वार जमीनदोस्त झालेले व संरक्षणासाठी व नदीच्या बाजूने दोन बुरुजांवर तोफखाने असलेले शहर आणि येथे उत्तर कोकणशी व्यापार करण्यासाठी निकृष्ट नौका दिसल्या असे वर्णन करतो.
इ.स.१६१७ मध्ये इंग्रज व्यापाऱ्यांनी पोर्तुगिजांचे एक जहाज कोमोरो बेटाजवळ पकडले होते. त्या जहाजावर सुरत, दीव व दाभोळचे व्यापारी होते. दाभोळचे व्यापारी संबंध पर्शियाचे आखात, लाल समुद्र, आग्नेय आशियाप्रमाणे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीशीही होते. तसेच भारतात उत्तरेस सुरत, खंबायत, दक्षिणेस केरळच्या किनारपट्टीशी, पूर्व किनारपट्टी व बंगालची बंदरे यांच्याकडे दाभोळची जहाजे ये-जा करीत असत. त्याशिवाय अंतर्भागातील व्यापारोपयोगी माल गोळा करून साठविण्यात दाभोळ चांगले शहर होते. इंग्रज कंपनीचा एक प्रतिनिधी रॉबर्ट जेफरीज याने १६२१ मध्ये भेट दिली असता त्याला या प्रदेशात उपलब्ध होऊ शकणाऱ्या मालाविषयी माहिती देण्यात आली. प्रवाळ, शिसे, हस्तीदंत व कापड इ.प्रकारच्या मालाला या प्रदेशात चांगली मागणी होती व लाल समुद्र, पर्शिया, इंग्लंड मध्ये मागणी असणाऱ्या वस्तू या प्रदेशात मिळू शकतील, असे त्याला सांगण्यात आले. बाळाघाटाच्या प्रदेशात(देशभाग) कापड, लाख, इत्यादी प्रकारचा माल उपलब्ध होता. दाभोळलगतच्या प्रदेशात मिरीचे उत्पादन बऱ्यापैकी होत असे. सुरतचे व्यापारी दाभोळहून मोठ्या प्रमाणावर मिरी, वेलची व गरम मसाल्यांचा व्यापार करीत असत. सुरतेचा प्रसिध्द व्यापारी वीरजी वोहरा दाभोळहून मिरी गरममसाले खरेदी करत असे व बदल्यात गुजराती कापड व अफूची विक्री करत असे. हा माल नंतर परदेशात निर्यात केला जाई. इंग्रज वखारवले दाभोळ व आसपासच्या प्रदेशातून मिरी, विविध प्रकारचे कापड, सुंठ, लाख इ. वस्तू खरेदी करत असत. गोणी, दोरखंड माल बांधण्यासाठी लागणारा दोरा व व्यापारी मालाचे गठ्ठे बांधण्यासाठी धती (धोती )नावाचे कापड इ .वस्तूदेखील खरेदी करत असत. इंग्रज वखारवले विकण्यासाठी काही माल तेथे आणत असत.
त्यामध्ये शिसे ,बॉडक्लॉथ नावाचे इंग्लंड मध्ये तयार झालेले कापड, तंबाखू, लोकर, खजूर, मनुका आणि तलवारींची पाती इ.मालाचा समावेश असे. बेळगांव जवळील रायबाग ही सतराव्या शतकातील एक महत्वाची बाजारपेठ होती. बरेच व्यापारी रायबाग व अथणी इ.बाजारपेठांमध्ये व्यापारोपयोगी माल खरेदी करून तो दाभोळला आणत व तेथून त्याची इतर ठिकाणी निर्यात होत असे. रायबागचे व्यापारी पेठ म्हणून महत्व १७ व्या शतकात बराच काळ टिकून होते. दाभोळहून रायबागला पोहचण्यास तीन ते चार दिवसांचा प्रवास करावा लागे.
दाभोळ व रायबाग येथे सतराव्या शतकात अस्तित्वात असणाऱ्या वजन मापांची देखील माहिती तत्कालीन कागदपत्रांतून मिळते. मिरीचे वजन मापण्यासाठी प्रामुख्याने खंडी या वजनाचा उपयोग करण्यात येत असे. ४० शेरांचा एक मण व २० मणांची एक खंडी असे वजनाचे प्रमाण होते. मंडेलस्लो हा सतराव्या शतकातील प्रवासी याबद्दल माहिती देताना कोकणातील मन ४० शेरांचा होता असे म्हणतो. तत्कालीन इंग्रजी पत्रव्यवहारात दाभोळच्या मनाचे तुलनात्मक वजन जवळपास २५ इंग्रजी पौंडाएवढे होते असे सांगितले आहे. व्यापारी मालाच्या वजनासाठी शेर, मण, खंडी या वजनांचा उपयोग करण्यात येत असे.
त्यावेळी व्यापार सुलभ होण्यासाठी हुंडीपद्धत देखील प्रचलित होती. मध्ययुगीन काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फार मोठी रक्कम नेणे धोक्याचे असे. त्यामुळे हुंडीने व्यवहार करणे अधिक सोयीस्कर असे. हुंडी म्हणजे आधुनिक काळातील डिमांड ड्राफ्ट असे तिचे स्वरूप होते. दाभोळ किंवा रायबागच्या पेढेवाल्याकडे पैसे भरून त्या रकमेची हुंडी काढण्यात येत असे.
सोळाव्या शतकात पर्शियन आखाताशी असणाऱ्या व्यापारामुळे दाभोळ बंदराचा विकास झाल्यामुळे दाभोळ येथे आखाती चलनाची रेलचेल दिसून येत असे. केसाच्या पिनेसारखी लारी नावाचे नाणे मोठ्या प्रमाणावर वापरात होते. इराण जवळ असणाऱ्या लार प्रदेशावरून त्याचे नाव लारी पडले होते. कोकणात चौललारी, दाभोळलारी प्रचलित होत्या. दाभोळीलारीवर अली आदिलशहाचे नाव कोरलेले आढळते. साधारणपणे ३.५ लारीचे मूल्य एक रुपयाच्या समान होते. आदिलशहाने दाभोळ येथे टंकसाळ स्थापन केली होती. तत्कालीन कागदपत्रांमध्ये बसरी लारी आणि होर्मुझ लारीचाही उल्लेख सापडतो.
इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या जहाजातून दाभोळ,पर्शियाचे आखात व लाल समुद्र इ. ठिकाणी स्वतःचा व्यापार करीत असे. त्याचप्रमाणे इतर प्रवाशी, व्यापारी व त्यांच्या व्यापारी मालाची ते वाहतूक करीत असत. यासाठी ते भाडे आकारीत असत. १६३६ मध्ये दाभोळहून गोंबुनला जहाजातून मिरी नेण्यासाठी दरखंडीस ५० लाऱ्या याप्रमाणे भाडे आकारण्यात आले होते. मार्च १६३६ मध्ये मीर कमालदीन नावाच्या इसमाने आपल्या बरोबर इतर दहा व्यक्तीना नेण्यासाठी ‘फ्रान्सिल’ नावाचे जहाज घेतले व यासाठी ११,००० लाऱ्या असे भाडे ठरविण्यात आले. यावरून प्रत्येक व्यक्तीमागे १००० लाऱ्या एवढे भाडे आकारण्यात आले होते, हे लक्षात येते. १६३६ मध्ये सप्टेंबर महिन्यात दाभोळच्या सुभेदाराने त्याच्या मालकीची मिरी कंपनीच्या जहाजाने मोफत न्यावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र इंग्रज व्यापाऱ्यांनी त्याला नकार दिला व दरखंडीस १५ लाऱ्या भाडे द्यावे असा आग्रह धरला. २३ इंग्लिश कंपनीच्या ‘होपवेल’ जहाजाने एप्रिल–मे १६४३ मध्ये ९५ प्रवासी व व्यापारी माल घेऊन पर्शिया ते दाभोळ प्रवास केला. त्यावेळी जवळजवळ २१,७३८ लाऱ्या एवढे भाडे जमा झाले. अशा प्रकारे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळला व्यापार करण्याचे काही प्रयत्न केले. त्याचप्रमाणे प्रवाशी व मालवाहतूक करून त्यांना रोख स्वरुपात भाडेही मिळत असे. काही वेळा ५१००० महमुधा पर्यंत भांडवल ते दाभोळच्या खरेदीमध्ये गुंतवत असत.
दाभोळहून वेगवेगळ्या देशातील बंदरांना पोहचण्यासाठी किती वेळ लागत असे, याची देखील थोडीफार माहिती तत्कालीन कागदपत्रांतून मिळते. लंडन ते दाभोळ या जलप्रवासास साधारण सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागत असे. २५ मार्च १६२० रोजी लंडनहून निघालेले जहाज निवडक ठिकाणी थांबून त्याचवर्षी २६ ऑक्टोबरला दाभोळला येऊन पोहचले. २६ मार्च १६२० रोजी दाभोळहून निघालेले जहाज सधारण एक महिन्यांनतर २५ एप्रिल १६२० सुमात्रातील अचिन येथे जाऊन पोहचले. गोंबून ते दाभोळ या प्रवासाला साधारण १७ ते १८ दिवसांचा अवधी लागत असे. ‘विल्यम’ नावाचे ईस्ट इंडिया कंपनीचे जहाज ३० मार्च १६३६ रोजी गोंबूनहून निघाले व दाभोळला १६ एप्रिल रोजी येऊन पोहचले. १३ एप्रिल १६४३ रोजी पर्शियाहून निघालेले ‘होपवेल’ नावाचे जहाज १ मे १६४३ रोजी दाभोळला येऊन पोहचले. यावरून पर्शिया ते दाभोळ हा सागरीप्रवास १७ ते १८ दिवसात करता येत असे हे स्पष्ट होते.
सतराव्या शतकाच्या आरंभापर्यंत दाभोळ,चौल इ. कोकणातील बंदरांचे महत्व टिकून होते. पण सतराव्या शतकात सुरतेचा एक प्रमुख आंतराष्ट्रीय व्यापारी बंदर म्हणून झपाट्याने विकास झाला आणि सतराव्या शतकाच्या मध्यापासून दाभोळ, चौल इ. बंदरांचे स्वरूप सहाय्यक बंदरे किंवा आंतर्भागातील माल गोळा करून सुरतेला पाठविणारी बंदरे असे बनले. तसेच गुजरात किंवा पूर्व किनारपट्टीच्या मानाने ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार दाभोळला वाढू शकला नाही. इ. स. १६३६ व१६३७ मध्ये इंग्रज व्यापाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले; पण त्यांना फारसे यश आले नाही. त्यानंतर दाभोळपेक्षा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी वखार घालून दख्खनमध्ये व्यापार सुरु करण्याचा प्रयत्न कंपनीने चालवला. या उद्देशाने फेब्रुवारी १६३७ मध्ये ‘हेन्री बोनफोर्ड’ या प्रतिनिधीला राजापूरला पाठविण्यात आले. हेन्री बोनफोर्डने राजापूरची पाहणी केल्यानंतर दाभोळ व राजापूर मध्ये त्याला फारसा फरक जाणवला नाही. पण राजापूरच्या आदिलशाही सुभेदाराने दरवर्षी ३००० खंडी मिरी उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आणि मोठ्या प्रमाणात इंग्रजांचा माल खरेदी करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. तेव्हा कंपनीने राजापूरला वखार सुरु करण्याकडे आपले लक्ष वळवले. इ. स. १६३७ च्या उत्तरार्धात राजापूर येथे ‘विल्यम पीट’ हा कंपनीचा व्यपारी राहत होता. तर दाभोळला ‘जोसेफ डॉउनहॅम’ हा व्यवहार सांभाळीत होता. दोघे मार्च १६३९ च्या मध्यावर सुरतला परतले. पुन्हा इस्ट इंडिया कंपनीने इ. स. १६३९ मध्ये राजापूरला व्यापार वाढविण्याचे आरंभिले. त्याचवर्षी “कोर्टीन्स असोशिएशन” या दुसऱ्या एका इंग्रजी व्यापाऱ्यांच्या संघटनेनेदेखील आदिलशहाकडून व्यापाराचा परवाना मिळवून राजापूरला व्यापार सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. अशाप्रकारे पुढे काही कालखंड या दोन्ही संघटनांमध्ये राजापूरला व्यापार करण्यावरून संघर्ष चालू होता. राजापूरला असे व्यापारी महत्व प्राप्त झाल्यामुळे दाभोळमधील परकीय व्यापाऱ्यांच्या उलाढाली हळूहळू कमी होऊ लागल्या.
✅ दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
✅ दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)
संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)