श्रेष्ठ साहित्यिक श्री.ना.पेंडसे

1
2823

६० ते ७० च्या दशकातल्या साहित्यिकांच्या काल्पनिक परंतु प्रस्थापित कादंबऱ्यांची कृत्रिम चौकट मोडून ज्या माणसाने वास्तविकतेला साज चढवत साहित्य क्षेत्रात हिमालयाची उंची गाठली ; लेखणीच्या आधारावर रॉकफेलर फाऊंडेशन फेलोशिपची शिष्यवृत्ती जागतिक प्रवासासाठी मिळवली, असे दापोली तालुक्यातील मुर्डी गावात ५ जानेवारी १९१३ रोजी जन्मलेले, समस्त मुर्डी गावचे शिरुभाऊम्हणजेच श्री.ना.पेंडसे (श्रीपाद नारायण पेंडसे). त्यांना घरातील कुटुंबीय दादाअशी हाक मारत. माणसांपेक्षा जास्त दापोलीतील निसर्गरम्य वातावरणात संवाद साधत, हसतखेळत तिसरी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण श्री.नां.नी त्यांच्या आजोळी मुरुडला पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते गोखलेवाडी भवानी शंकर रोड, दादर येथे त्यांच्या मामाकडे वास्तव्य करू लागले. मुंबईत आल्यावर श्री.नां.ना जुन्या रम्य आठवणी भूतकाळाच्या वाटेकडे घेऊन जायच्या. खळखळत वाहत असलेला पाट , सुपारीच्या बागा , मुरुडचा समुद्र , हर्णे बंदर , तेथील शुभ्र दीपस्तंभ , आसूदला असलेले उंच हिरवेगार डोंगर , त्या डोंगराच्या माथ्यावरचे केशवराजाचे देखणे मंदिर या सगळ्यामुळे श्री.नां.च्या डोळ्यातून आठवांचे थेंब गळत होते. मुंबईतील शानदार इमारतींपेक्षा त्यांना दापोलीतील मंगलोरी कौलारू घरे अतिप्रिय होती. सुट्टीच्या दिवसात ते दापोलीला येत असत. मनाने दापोलीच्या परिसरात व शरीराने मुंबईत राहून त्यांनी बी.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे १९३३१९४२ पर्यंत ठाण्यातील मो..विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा केली व पुढे मुंबईच्या बेस्ट’ परिवहन संस्थेत डेप्युटी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर या पदावर रुजू झाले . १९६८ साली त्यांनी या पदावरून निवृत्ती स्वीकारली.

या दरम्यानच्या काळात नोव्हेंबर १९३७ मध्ये सह्याद्रीअंकात जीवनकलाहि पहिली कथा प्रसिध्द झाली. या कथेमुळेच श्री.नां.नी साहित्याच्या प्रांगणात उडी घेतली. त्या लागोपाठच साधारण १९४१ साली खडकावरील हिरवळहे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक प्रकाशित झाले , १९४९ साली हिंदू मुस्लिम दंग्यांवर आधारित एल्गारकादंबरी प्रकाशित केली. साहित्य क्षेत्रात देखील त्यांची ओळखशिरुभाऊयाच नावाने निर्माण झाली. यानंतर हद्दपारकादंबरी प्रसिध्द झाली. हि कादंबरी प्रसिध्द होतानाच गारंबीच्या बापूनेजन्म घेतला. गारंबीच्या वेलींवर झोका घेत असलेला तो मुलगा म्हणजे गारंबीचा बापू.’  वणंद , आसूद बाग , मुरुड अशा सर्व ठिकाणांना एकत्रित करून शिरुभाऊंनी गारंबीकागदावर निर्माण केली. याच गारंबीतून अफाट बापू , सपाट बापू  अशी अर्करीत पात्रं निर्माण झाली. या गारंबीमुळेच साठच्या दशकात एक विलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. अफाट कर्तुत्ववान बापूला लोकांनी आपलसं केलं, ब्राम्हण आळीतून गुरुवांसोबत उठणंबसणं , वणन्द नदीच्या पुलावरील  हॉटेलात बापूने केलेली नोकरी , बापूच्या नितळ माणुसकीने राधाला पडलेली भुरळ या सर्व प्रसंगांमुळे प्रसिध्द झालेल्या गारंबीचा बापूकादंबरीची वाचक पारायणे करू लागले. या कादंबरीमुळे शिरुभाऊंना (श्री.ना.पेंडसे) ‘प्रादेशिक कादंबरीकार श्री.ना.पेंडसेअसा वाचकवृंदाकडून सन्मान मिळाला. कालपरत्वे हत्या, यशोदा, कलंदर, चक्ररथ, लव्हाळी आणि ओक्टोबस या कादंबऱ्या वाचकांना पसंतीस पडल्या. या सर्व कादंबऱ्यांतून शिरुभाऊंनी कोकणचे पर्यायाने दापोलीचे निसर्गचित्र, माणसांचे स्वभाव कागदावर उतरवले. कादंबरीतील माणसांवर वाचकवृंदाने केलेले प्रेम पाहून शिरुभाऊ म्हणतात, “ कादंबरीतील माणसे कशी निर्माण होतात या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण असते. माझा अनुभव असा आहे कि, मुख्य व्यक्तीची रेखा मेढीसारखी स्पष्ट समोर उभी राहिली कि इतर माणसे अलगद, अपरीहार्यतेने पुढे येऊ लागतात, या माणसांत नंतर फरक पडत नाही असे नव्हे. कलेसाठी साचेबंद विधान कधीच करता येत नाही.”

६ जून १९६२ रोजी शिरुभाऊ जालगाव येथे त्यांच्या पत्नी श्रीमती कमला श्रीपाद पेंडसे व मुले नंदिनी, सरोज, अनिरुध्द यांच्यासह वासुदेव महादेव फाटक (अण्णा फाटक) यांच्या घरी राहायला आले होते. शिरुभाऊ सायकलवरून दापोली बाजारात काहीना काही कारणाने दिवसातून अनेक खेपा मारायचे. बाजारातले मारुती मंदिर, गोखले वाचनालय, तेथून काही अंतरावर असलेली मशिद, मराठी शाळा, त्या शाळेजवळील डेरेदार आंब्याचे झाड या सर्व अनामिक जगाशी लहानपणीच श्री.नां.चे नाते जडले होते. त्यांना मोठेपणी देखील हि अनामिक नाती साद घालत होती. शिरुभाऊ जालगावला राहून आसूदचे (गारंबीचे) अण्णा देपोलकर, पाटील, दाबके, जागुतात्या दाबके, राजाभाऊ बिवलकर, मुरुडचे आप्पा काळे ह्या त्यांच्या निकटच्या मित्रांना आवर्जून भेट द्यायचे. काही दिवस जालगावला राहिल्यावर ते जुलै महिन्यात पुन्हा मुंबईला गेले. १९६८ पासून श्री.ना.त्यांच्या कुटुंबासह तुकाराम भगत निकेतन रोड, माहीम येथे वास्तव्य करू लागले. त्यांच्या दापोलीला खेपा होतच असायच्या. मध्यंतरी मुरुडला न भूतोः न भविष्यतियोग शिरुभाऊंमुळेच जुळून आला. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, श्री.पु.भागवत व पु..देशपांडे या महान व्यक्तींशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मुरुडकरांना मिळाली. त्यावेळी पु..देशपांडे यांनी हार्मोनियम वाजवली होती. त्या हर्मोनियामचे सूर आजही मुरूडच्या बुजुर्ग व्यक्तींच्या कानी घुमत असावेत. दापोलीतील गावे, तेथील आपुलकी जपणारी माणसे, कोकणातील रूढी, परंपरा, हेवेदावे, जादूटोणा अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केल्यावर खेडमधील तुंबाडगावच्या परिसराला भारून जाऊन त्यांच्या लेखणीतून निर्माण झाली चार पिढ्यांची गोष्ट..१३५८ पानांच्या द्विखंडात्मक कादंबरीचा म्हणजे तुंबाडचे खोतचा जन्म झाला. या कादंबरीच्या यशानंतर गारंबीची राधा’ , ‘कामेरू’ , ‘एक होती आजी’ , ‘रात्र काळी घागरया कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या. ‘राजे मास्तर’ , ‘यशोदा’ , ‘गारंबीचा बापू’ , ‘असं झालं आणि उजाडलंही नाटके देखील काही काळानंतर त्यांच्या कादंबऱ्यांतून रंगभूमीवर आली. ‘महापूर’ , ‘सूंभूसाच्या चाळीत’ , ‘चक्रव्यूहअशी स्वतंत्र नाटके देखील त्यांनी लिहिली. ‘श्री.ना.पेंडसे लेखक आणि माणूसहे आत्मचरित्र व  बेस्ट उपक्रमाची कथाहे साहित्य देखील श्री.नां.च्या लेखणीतून निर्माण झाले.

श्री.नां.नी साहित्याच्या सहाय्याने समाजकार्य देखील केले. मुंबईतल्या बेस्ट’ परिवहन संस्थेत दापोलीतील गरजू,गरीब लोकांना नोकरी मिळवून दिली, मुरुडला माध्यमिक शाळा बांधण्याचे प्रयत्न सुरु असताना शाळेच्या आर्थिक मदतीसाठी गारंबीचा बापूनाटकाचा प्रयोग मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात लावला. प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यावर त्या नाटकाला मिळालेली रक्कम श्री.नां.नी मुरुडला माध्यमिक शाळा उभारणीसाठी खर्च केली. १९४७ साली लाडघर दत्त मंदिराच्या सभागृहाचे उद्घाटन श्री.ना. ह्यांच्या हस्ते झाले होते. १८ एप्रिल १९५८ रोजी महर्षी कर्वे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मुरुडला श्री.नां.नी आवर्जून उपस्थिती लावली. १९७० मध्ये मुर्डीच्या रँग्लर परांजपे वाचनालय उद्घाटनाच्या निधीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. १९८०मध्येगारंबीचा बापूहा चित्रपट दापोलीच्या परिसरात चित्रित होऊन प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

ज्या शिरुभाऊंनी हर्णे, आंजर्ले, मुरुड, मुर्डी या गावांसह दापोलीच्या परिसरावर हाडामांसाच्या माणसासारखं प्रेम केलं त्या शिरुभाऊंना रथचक्रकादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार व हद्दपार’ , ‘हत्या’ , ‘कलंदर’ , ‘संभूसांच्या चाळीत’ , ‘चक्रव्यूहया त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले. ‘एल्गारकादंबरीसाठी नॅशनल लायब्ररी नागपूर चे पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर रॉकफेलर फाऊंडेशन फेलोशिपची शिष्यवृत्ती जागतिक प्रवासासाठी मिळवणारे श्री.ना.पेंडसे हे मराठीतील व भारतातील पहिले साहित्यिक आहेत. श्री.नां.च्या या सर्व पुरस्कारांची दखल घेत संजीव कोलटे दिग्दर्शिततुंबाडचे खोतहि मालिका २००० साली प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचे चित्रिकरण मुरुड, आसूद, मुर्डी, आंजर्ले या ठिकाणी होत असे. या मालिकेमुळे दापोलीतील अनेक कलाकारांना मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. यावेळी गंगाधर गाडगीळांनी श्री.ना.पेंडसेंच्या कादंबऱ्यांवर आधारित हर्णेचा दिपस्तंभ’  लेख लिहिला. ज्या माणसाच्या लेखणीमुळे दापोलीतील माडपोफळींच्या बागा, व्याघ्रेश्वर मंदिर, कोकणची माणसे या सर्व गोष्टी कागदावर अवतरल्या, ज्याच्या लेखणीने अनिष्ट रूढी परंपरांविषयी वाचा फोडली, त्या श्री.ना.पेंडसेंनी गारंबीचा बापूमधल्या गारंबीला, कादंबऱ्यांतील पात्रांना, त्यांनी कागदावर निर्माण केलेल्या शब्दांना व वाचकवृंदाला २३ मार्च २००७ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा निरोप दिला. श्री.नां.च्या पश्च्यात त्याचे वंशज माहीम येथे वास्तव्य करीत आहेत.

काही वर्षातच म्हणजे २०१३ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेने श्री.नां.च्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून दापोलीत साहित्य संमेलन आयोजित केले. यावेळी सुप्रदिध गायक , वादक, लेखक, कवी , चित्रकार , अभिनेते आदींनी मिळून साहित्याची ज्योत श्री.नां.ना समर्पित केली. श्री.नां.च्या निधनानं गारंबी, त्यांच्या कादंबऱ्यांतील अर्करीत पात्रे, वाचकवृंद पोरके झाले असले तरीही श्री.नां.चे विचार, त्यांनी स्वर्गस्थ केलेले नाटकामधील संवाद, त्यांच्या कादंबऱ्यांतील पात्रे या सर्व गोष्टी आजही जिवंत आहेत. श्री.नां.नी वर्णन केलेल्या निसर्गरम्य दापोलीच्या परिसराला भेट देण्यासाठी श्री.नां.ची आठवण काढत पर्यटक येतात. पर्यटकांना आजही मुर्डी येथे श्री.नां.चे घर डागडुजी केलेल्या स्वरुपात आढळते. त्या घरी श्री.नां.चे नातेवाईक राहतात. आज समस्त मुर्डी गाव श्री.ना.पेंडश्यांची मुर्डीयाच नावाने ओळखला जातो. या महान लेखकाच्या साहित्याची पारायणे करत, कधी उत्सवात त्यांनी लिहिलेली नाटके सादर करत, कधी त्यांच्या कादंबऱ्यांतील माणसांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संवाद साधत दापोली तालुका दापोलीतल्या नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन देत आहे.

 संदर्भ :

  • श्री. अनिल पेंडसे , माहीम
  • श्री. शशिकांत पेंडसे , मुर्डी
  • श्री. प्रशांत परांजपे, जालगाव
  • श्री.ना.पेंडसे लेखक आणि माणूस
  • गारंबीचा बापू लेखक श्री.ना.पेंडसे
  • हर्णेचा दीपस्तंभसंपादक: गोविंद राठोड

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here