कोकणातील सर्वात उंच डोंगरकड्याच्या कुशीत दापोली तालुक्यातील आवाशी हे गाव वसले आहे. आवाशी येथील डोंगर हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक बालेकिल्ला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर अशी ऐतिहासिक ओळख लाभलेल्या डोंगराच्या कुशीत सन १७६२ च्या दरम्यान वाईजवळील बावधन येथील स्वराज्याचे जहागीरदार असलेल्या सकपाळ शेडगे घराण्याने दापोली तालुक्यातील आवाशी हे गाव वसविले असल्याचे आवाशी या गावातील जुनेजाणते बुजुर्ग सांगतात. आवाशी हे गाव दापोली तालुक्यातील एका टोकाचे गाव असून आवाशी गावाच्या पुढे मंडणगड तालुक्याची हद्द सुरु होते. सन १७६२ मध्ये आवाशी हे गाव वसविल्यावर त्याच दरम्यान सकपाळ शेडगे घराण्यानेच या गावातील निर्जन देवराईत निसर्गाच्या सुंदर कोंदणात श्री देवी जनाईचे मंदिर बांधल्याची माहिती मिळते. श्री देवी जनाईची काळ्या पाषाणातील मूर्ती स्वयंभू नाही. सकपाळ शेडगे घराण्याने आवाशी येथून जवळच असलेल्या कुडावळे येथील कदम शेडगे घराण्याच्या मदतीने आवाशी येथे श्री देवी जनाई मंदिरात सकपाळ शेडगे घराण्याचे मूळ बावधन येथील कुलदैवत असलेल्या श्री जनाई देवीची प्रतिष्ठापना केली.

त्यानंतर चव्हाण घराणे आवाशी येथे आणून सकपाळ शेडगे, कदम शेडगे व चव्हाण घराण्यांनी आवाशी गावाचा कारभार सुरु केला.
आवाशी गावातील पुरातन संवर्धित देवराईत श्री देवी जनाईचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिराचा परिसर आजही संरक्षित वनक्षेत्रात येत असल्याने या परिसरात वृक्षतोड व शिकार होत नाही. काळेथर दगडी बांधकाम असलेले मंदिर भक्कम व मजबूत आहे. प्रवेशद्वार, सभामंडप आणि आत गाभारा अशी जनाई मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात श्री देवी जनाई ही प्रमुख देवी असून श्री देवी वाघजाई, श्री देवी काळकाई, श्री देव व्याघ्रेश्वर, श्री देव भस्मनाथ, श्री देव सोमय्या, श्री देव केदारनाथ, अशी एकूण सतरा दैवते आहेत. श्री देवी जनाईची मूर्ती काळ्या दगडात घडविलेली असून सुबक व रेखीव आहे. मंदिराच्या आवारात बारमाही पाण्याने भरलेली दोन कुंडे आहेत. या कुंडांतील पाणी थंडगार व चवदार असून उन्हाळ्यात गावकरी या कुंडांतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. जनाई मंदिराच्या परिसरात एक ओढा असून तो दरवर्षी शिमगोत्सवानंतर कोरडा पडतो. मंदिर परिसरात दाट वनराई असून समृद्ध वन्यजीवसृष्टीही आहे.


श्री देवी जनाई मंदिरात दरवर्षी शिमगोत्सव, नवरात्रोत्सव व पालेजत्रा यांसारखे सार्वजनिक उत्सव साजरे होतात. आवाशी हे गाव चार वाड्यांचे असून चारही वाड्यांतील सर्व गावकरी श्री देवी जनाई मंदिरातील सर्व उत्सव एकत्रच साजरे करतात. शिमगोत्सवात जनाई देवीची पालखी गावातील चारही वाड्यांमध्ये फिरते. नवसाला पावणारी देवी अशी जनाई देवीची ख्याती असल्याने परिसरातील अनेक लोक जनाई देवीच्या पालखीच्या दर्शनासाठी येत असतात. श्री देवी जनाई देवस्थानाचे सकपाळ शेडगे हे प्रथम मानाचे मानकरी असून कदम शेडगे हे दुसर्या क्रमांकाचे मानकरी आहेत. मात्र सर्व मानकरी व ग्रामस्थ एकजुटीने व एकोप्याने जनाई देवीचे उत्सव साजरे करतात.


शिमगोत्सव व नवरात्रोत्सवात श्री देवी जनाईस सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांनी मढविले जाते. देवीच्या अंगावर असे भरजरी व पारंपारिक दागिने असल्याने नवरात्रोत्सव काळात देवीचा जागर केला जातो. गावातील चारही वाड्यांचे मानकरी आळीपाळीने देवीचा रात्रभर जागर करतात. रात्रीच्या जागरात भजन, जाखडीनृत्य, दांडीयानृत्य यांसारखे पारंपारिक कार्यक्रम होतात. घटस्थापनेपासून जनाई देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात होते. विजयादशमीच्या दिवशी या नवरात्रोत्सवाची सांगता होते. दसर्यादिवशी सर्व ग्रामस्थ जनाई मंदिरात जमतात. जनाई देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता करताना देवळातील सर्व देवांस सोने (आपट्याची पाने) वाहून परस्परांना आलिंगन देऊन सोन्याची देवाण-घेवाण करतात. दापोली तालुक्यातील आवाशी गावातील श्री देवी जनाई हे जागृत देवस्थान आहे. वाई जवळील बावधन घराण्याचा वारसा सांगणारे हे दैवत भक्तांच्या हाकेस धावून जाते अशी भक्तांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळेच आवाशी हे गाव आजही अतिदुर्गम असले तरी येथील नवरात्रोत्सव व शिमगोत्सव दापोली तालुक्यात प्रसिद्ध आहे.