दापोली तालुक्यातील पर्यटन केंद्र म्हणून ओळख असलेले कर्दे गाव हे स्वच्छ सुंदर किनारा, निळाशार समुद्र यापुरतेच सीमित नाही. दापोलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या या गावात डोंगरावर, नदी किनारी एक पुरातन मंदिर आहे.
गावातील बुजुर्ग ग्रामस्थ कै. लक्ष्मण गुणाजी रेवाळे यांनी लिहिलेल्या लावणीच्या संदर्भाने या सोमेश्वर मंदिराची उभारणी गोडबोले सरदार यांनी केली असे आढळते. याच लावणीत गोडबोले सरदारांनी नदी काठची जागा हेरून तिथे सोमेश्वराची मूर्ती व मंदिराची स्थापना केली असे वर्णन आहे. मूळ मंदिराची स्थापना १७व्या शतकात केली गेली असावी. इ. स. १९३२ साली कै. मुकुंद अनाजी नरवणकर यांनी देवळाचा जीर्णोद्धार केला. देवळासमोरची दीपमाळ ही देखील मंदिराबरोबरच उभारली असून आज देखील भक्कमपणे उभी आहे. या दीपमाळचे बांधकाम काळ्या दगडात केलेलं आहे. आधी उल्लेख केलेल्या लावणीत या दिपमाळेला मखमल असे म्हटले आहे.स्थापत्यकर्त्यांनी फार हौसेने ही दीपमाळ बांधली होती. त्यावर दिवाळीमध्ये दिवे लावण्यात येतात.
देवळाची रचना कोकणात सामान्यपणे आढळणाऱ्या शिव मंदिरांसारखी म्हणजे गाभाऱ्यावर घुमट असलेली आहे. घुमटाच्या बाजूला छतावर ६ ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत.या मूर्ती वेगवेगळ्या दिशांकडे बघत आहेत. मंदिरासमोर एक छोटीशी पुष्करणी आहे. जुन्या मंदिरातील पिंड व खांब देवळाच्या आवारात ठेवलेलं आहेत. इ.स. २०२० साली कै. श्रीधर शंकर तोडणकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी देवळाच्या रंगरंगोटीचे व साफसफाईचे काम केले.
सदर देवळाचे व्यवस्थापन संपूर्ण गाव मिळून पाहते. देवाच्या पूजेची जबाबदारी रहाटवळ परिवाराकडे आहे. येथील वार्षिक उत्सव महाशिवरात्रीला साजरा केला जातो. यावेळी अभिषेक केला जातो. तसेच संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. या बरोबरच श्रावण सोमवारी भक्तगण आवर्जून दर्शनासाठी जातात.
जवळच असलेल्या ग्रामदैवत असलेल्या खेम देवाच्या मंदिरात देखील सोमेश्वराचे स्थान आहे. त्यामुळे सोमेश्वर देखील ग्रामदैवत मानले जाते. शिमगोत्सवात गावातून खेम देवाची पालखी फिरते. त्याबरोबर असलेली निशाणाची काठी सोमेश्वर मंदिराकडे ठेवलेली असते.
मंदिराचे डोंगरावरील स्थान, बाजूने वाहणारी नदी, जंगल, तिथून दिसणारा अथांग समुद्र यामुळे तिथे गेल्यावर मनाला शांतता व प्रसन्नता लाभते. आज जरी मंदिरापर्यंत चालत जावे लागत असले तरी काही दिवसातच डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. हे मंदिर कर्डे गावातील नवीन पर्यटन स्थळ म्हणून नावास येऊ शकते, मात्र त्याचे पावित्र्य आणि स्वच्छता जपली जाईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
संदर्भ –
कर्दे गावचे ग्रामस्थ – श्री. सचिन तोडणकर, श्री. सचिन रहाटवळ, श्री. रेवाळे
संदर्भ: कर्दे गावचे ग्रामस्थ – श्री. सचिन तोडणकर, श्री. सचिन रहाटवळ, श्री. रेवाळे