लाडघर दत्तमंदिर

0
5358

दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्तमंदिर आहे. हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना जपणारे आहे. पण अथांग समुद्र आणि दाट वृक्षराई असलेल्या डोंगराच्या कक्षेत असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य मन लुभावून नेणारे आहे.

या मंदिराची स्थापना ऐकीव माहिती व पिढी अंदाजानुसार १८८० ते १८९० च्या दरम्यानची आहे. लाडघर गावातील ग्रामस्थ ‘श्री.पांडुरंग संभाजी मोरे’ या दत्त उपासकाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि लाडघर गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर स्वप्नात दिसल्याप्रमाणे औदुंबराच्या बुंध्याशी दत्तपादुका आढळल्या. खोदून काढलेल्या त्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि कालांतराने तेथे मंदिराची निर्मिती झाली.

काही वर्षानंतर श्री.हबुशेठ नरवणकर यांच्या पुढाकाराने लळीत, किर्तन आणि अन्य धार्मिक, सांस्कृतिक कार्यांसाठी सभागृह बांधण्यात आले. त्या सभागृहाला जोडूनच स्टेज व गॅलरी होती. १९४७ च्या वादळात सभागृहातील बांधकाम कोलमडून खाली आले. मंदिराचे सभागृह बरेच दिवस कोसळलेले होते. पुढे मोहन मयेकर यांच्या पुढाकारातून देणग्या जमवून व दत्त प्रासादिक मंडळाने केळशी, दाभोळ, दापोली, गुहागर, मुंबई येथे व्यावसायिक नाटकाचे प्रयोग करून सभागृहाची उभारणी केली. त्या बांधकामाची दुरावस्था झाल्यानंतर लाडघरचेच बाळासाहेब बाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाचे पुन्हा बांधकाम झाले. या सभागृहाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक श्री.श्री.ना.पेंडसे, तर्कतीर्थ श्री.लक्ष्मणशास्त्री आणि संगितकार श्री.स्नेहल भाटकर उपस्थित होते. या सभागृहाला फयान वादळाचा तडाखा बसल्यानंतर देऊळवाले मोरे व गाववाल्यांकडून सभागृह पुन्हा सुधारण्यात आले.

दत्त मंदिर सभागृहाला धरूनचं गणपती मंदिराची स्थापना केलेली आहे. सभागृहाच्या पुढे पुर्वेच्या बाजूस गणपती मंदिराला लागून असलेल्या चौकात श्री. काळभैरवाचे स्थान आहे. या काळभैरव मंदिर स्थापनेमागची कथा अशी की फार पूर्वी म्हणजे मंदिर स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात उत्सवावेळी वाघाने कोणा एकाचा बळी घेतला. त्यावेळी लोकवस्ती कमी होती, दाट जंगल होते, हिंस्र प्राण्यांची संख्या मोठी होती. तेव्हा यावर उपाय म्हणून देऊळवाले मोरे व ग्रामस्थांनी देवांचा सेनापती असलेल्या श्री. काळभैरवाचे मंदिर बांधले आणि उत्सवाला नैवेद्य म्हणून कोंबडा-बोकड बळी देण्याची प्रथा सुरु केली. श्री. काळभैरवाचा उत्सव इतर ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या काळभैरव जयंतीला असतो; पण लाडघरात तो दत्तजयंतीला जोडून केला जातो. दत्त जन्मकाळापूर्वी एक दिवस आधी हा उत्सव असतो. १९९७ पासून या उत्सवातील इतर प्रथा तशाच ठेऊन केवळ बळी प्रथा कायमची बंद करण्यात आली आणि त्याऐवजी आता प्रबोधनात्मक आणि तरुण पिढीला मार्गदर्शक असे कार्यक्रम घेतले जातात.

येथील प्रथेप्रमाणे दत्तजन्म काळापूर्वी दोन दिवस दत्त संप्रदायाप्रमाणे भिक्षेसाठी वारी निघते. वारीच्या पहिल्या दिवशी वारी बुरोंडी, करजगाव, लालबाग करीत लाडघर गाव पूर्ण करीत देवळावर येते तर दुसऱ्या दिवशी कर्दे गावी जाऊन येते. वारीचा दुसरा दिवस हा काळभैरवाच्या नवसाचा आणि महाप्रसादाचा दिवस असतो. पुढचा दिवस जन्मकाळाचा असतो. जन्मकाळाची वेळ पंचागानुसार रात्री १२:३९ ची आहे. रात्री ८:३० पासूनच मंदिरात भजने, कीर्तने चालू होतात. ती साधारणतः पहाटे पर्यंत असतात. जन्मकाळाच्या दुसऱ्या दिवशी अभिषेक, पूजा या विधिवत कार्यक्रमांनंतर देवळातून श्री.दत्तात्रयांची पालखी बाहेर पडते आणि तामस तीर्थावरील शंकर मंदिर व नदी पलीकडचे चंडिका मंदिर करून पालखी गावात शिरते व दुपारी दोनच्या आसपास पुन्हा मंदिरात येते.

पालखीच्या दिवसापासून येथे पुढील तीन दिवस जत्रा असते आणि जत्रेबरोबरच अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि खेळाच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. त्यामुळे लाडघरचा समुद्र किनारा सायंकाळच्या वेळेस माणसांनी प्रचंड फुललेला असतो. तर अशाप्रकारे लाडघरचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिरात दत्तजयंतीचा उत्सव चालतो. यावेळी भाविक म्हणून लाडघरला आलेले पर्यटकही हजर असतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here