दिनांक ३ जानेवारी २०१९, मंगळवार रोजी स्थळ – हनुमान मंदिर, धानकोली, ता.दापोली येथे पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण शिबीर पार पडले. हे शिबीर उन्नत भारत आणि ता.कृषि विभागाच्या ‘आत्मा’ या राष्ट्रीय यंत्रणेच्या अंतर्गत राबविण्यात आले होते. या शिबिराला ता. कृषि अधिकारी – हाके सर, शास्त्रज्ञ कृषि विद्यापीठ आणि नोडल ऑफिसर –श्री. संतोष वरवडेकर सर, उन्नत भारत ग्रामसमन्वयक व ‘आत्मा’ अध्यक्ष विनायक महाजन, लोकसंचालीत साधनकेंद्र, खेड सभासद सावंत व माने बाई, कृषि सहाय्यक – सचिन पवार व मर्चंडे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबिरात ‘नागली’ म्हणजेच ‘नाचणी’ या पिकावर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ कसे बनविण्यात येतात, याचे प्रशिक्षण देण्यात आले. नाचणी हे किती पौष्टिक तृणधान्य आहे व त्याची बाजारपेठेतील मागणी केवढी मोठी आहे, हे ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणवर सहभाग घेतला. तेथे उपस्थित स्त्री व पुरुषांकडून प्रशिक्षण देणाऱ्या सावंत व माने बाईंनीं नाचणीचे लाडू, शेवया, इडली, उत्तपा, थालीपीठ असे अनेक पदार्थ करून घेतले. हे पदार्थ उत्तमरित्या झाले व तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आवर्जून या पदार्थांची चव चाखली. “ केवळ घरापुरते हे पदार्थ मर्यादित न ठेवता, लवकरात लवकर बाजारपेठेत लोकांसाठी उपलब्ध करा.’’ असा सल्ला उपस्थित सर्वमान्यवरांकडून प्रशिक्षणार्थींना देण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.