कॅम्प दापोलीची गोष्ट

13
46990

१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षिदार राहिली.

१६११ …

पण कॅम्प दापोलीची ही गोष्ट १६११ मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळ बंदरात कोकणातला पहिला कारखाना टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरु होते. फेब्रुवारी १६११ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सर हेन्री मिडलटन ने ३ बोटींसह दाभोळ बंदरात तेव्हाच्या सिद्धी गव्हर्नरची भेट घेतली व थोडासा व्यापारही मिळवला. असा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीने पुन्हा १६१२ आणि १६१८ मध्ये पुन्हा केला पण दाभोळ आणि एकंदरीत कोकण किनाऱ्यांवर असलेल्या पोर्तुगीज आणि डच प्रभुत्वामुळे तोही अयशस्वी ठरला. शेवटी १६२४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला, सिद्धी बरोबर झालेल्या करारानुसार दाभोळ बंदरात कारखाना उघडण्यासाठी परवानगी मिळाली. दाभोळ बंदर व आसपासचा प्रांत, कंपनीच्या व्यापाराकरिता अधिक सुरक्षित आणि सोईस्कर ठरेल, म्हणून कंपनीने त्यांचे सुरतेचे सर्व कारखाने व धंधे दाभोळला हलवावे, अशी अट १६२४ च्या ह्या करारात होती. कारखाना चालू केल्यानंतर मात्र इंग्रज ह्या कराराला प्रामाणिक राहिले नाहीत आणि पुढील दहा वर्षातच त्यांना दाभोळचा कारभार आटोपता घ्यावा लागला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोकणात तळ जमविण्याचा हा पहिला प्रयत्न होता.

१६३९…
कोकणात त्यानंतर १६३९ मध्ये सर विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने कारखाना टाकण्यात यश मिळवले. लंडनच्या ह्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने दाभोळ आणि राजापूर प्रांतातून जवळजवळ दहा वर्षे व्यापार चालवला. राजापूर आणि दाभोळ ह्या दोन व्यापारी बंदरातून इंग्रज वर्षाला जवळजवळ ३००० खंडी मिरीची निर्यात करीत. मिरपुडीचा वापर हा मांस जास्त काळ टिकवण्यासाठी होत असे. युरोपातल्या “मीट प्रोसससिंग” इंडस्ट्रीचा हा सुरवातीचा काळ होता. विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन बरोबर ईस्ट इंडिया कंपनीसाठीहि राजापूर हे सुरत व बॉम्बे नंतरचे महत्वाचे लक्ष्य बनले होते.

१६५०…
१६५० च्या दरम्यान विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशनच्या हेळसांड कारभाराला आणि वाढत्या कर्जाला कंटाळून तिथल्या मुसलमान गव्हर्नर ने सुरतला ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेंटची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या करारात राजापूर ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी मोकळा झाला, आणि इंग्रजाची ईस्ट इंडिया कंपनी अधिकृत रित्या कोकणात व्यापार करू लागली. गमतीची गोष्ट म्हणजे करारानंतर लगेचच, ईस्ट इंडिया कंपनीने, विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशनचा ताबा मिळवून त्यांच्याकरवीच काम चालू ठेवली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरवातीच्या साम्राज्यातील मोक्याची असलेली राजापूरची हि फॅक्टरी शिवाजी महाराजांच्या काळात १६६४ मध्ये पुन्हा बंद पाडली गेली.

१७०८….
१६११ व १६३९ च्या दोन प्रयत्नानंतर, १७०८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दाभोळ, राजापूर आणि वेंगुर्ल्यात व्यापाराला मार्ग मोकळे झाले होते, परंतु ह्याच काळात कंपनीचा बॉम्बे पोर्टचा कारभार बराच वाढल्याने पुढे १७५६ पर्यंत कंपनी कोकणात कुठेच असल्याचं नमूद नाही.

शिवाजी महाराज…
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत, सिद्दीच्या जंजिरासारखी एकदोन अपवाद वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भाग बनली होती. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सरखेल कान्होजी आंग्रे हा एकछत्री अंमल होता, कानोजी आंग्र्यांची जरब इंग्रजापासून, डच आणि पोर्तुगीजामध्ये संपूर्ण युरोपात होती. परंतु १७३९ नंतरच्या काळात आंग्रे कुटुंबातील अंतर्गत वाद व पेशवाईचा प्रभाव दोन्ही वाढतच गेले

१७५६…
शेवटी मार्च १७५६ मध्ये, नानासाहेब पेशव्यानी इंग्रजांची मदत घेऊन हर्णेच्या सुवर्णदुर्गावर हल्ला चढविला. बॉम्बेच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोमोडोरे जेम्स ने ४ युध्दनौका घेऊन सुवर्णदुर्ग व समोरच्या भुईकोट किल्यांच्या ताबा मिळवला. आंग्र्यांबरोबरच्या लढाईत केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून बाणकोटचा किल्ला, हिम्मतगड व त्याच्या आसपासची ५ गाव पेशव्यानीं इंग्रजांना देऊन टाकली. पेशव्यानं कडून मिळालेला बाणकोट हि ईस्ट इंडिया कंपनीची कोकणातील पहिली भौगोलिक मिळकत होती. इंग्रजांनी बाणकोटचा किल्ल्याचे नंतर फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले.

१७५६-१८१८…
१७५६ नंतर १८१८ पर्यंत संपूर्ण कोकण ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेपासून खाली बेळगाव पर्यंत पसरलेल्या साम्राज्याचे भाग बनला होता ज्याला आपण “The Bombay Presidency” म्हणून ओळखतो. १८१८ पर्यंत पेशवाई पूर्णपणे नामशेष होऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या झेंड्याखाली इंग्रज़ी राजवटीची पायमुळं अगदी खोलवर पसरली होती. ह्या दरम्यान कोकणात इंग्रजांनी, मालवण, वेंगुर्ला, बाणकोट व हर्णे अश्या ४ ठिकाणी छोट्या सैनिकी तुकड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर मात्र इंग्रजांना कोकणात एक नियमित सैनिकी ताफा ठेवण्याची गरज वाटू लागली व त्यासाठी दापोलीची निवड करण्यात आली. आणि कॅम्प दापोली अस्तित्वात आली.

१८१८ आणि पुढे ….
१८१८ च्या नंतर च्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली इंग्रजांनी कायदा, चलन, दळणवळण, शिक्षण क्षेत्रातल्या पारंपरिक व्यवस्था मोडीत काढून नव्या इंग्रजी संकल्पना राबविल्या, ह्या कालावधीत संपूर्ण उत्तर कोकण आणि त्याची शेतीसंस्कृती जवळजवळ नष्ट झाली. ह्याच कालावधीत दापोलीत कचेरी, दिवाणकोर्ट, चर्च, ईस्ट इंडिया कंपनीची चलनातील नाणी, आर्मी बर्राक, गोळीबार क्षेत्र, फॅमिली माळ व जालगावची बाजार पेठ वरून खाली कॅम्पात आली.

१८१८ ते १८५७ ह्या कालावधीत ईस्ट इंडिया कंपनीने इंग्रजी साम्राज्याची भारतावरची पकड मजबूत केली, पण ह्यात उत्तर कोकण, कुलाबा, पनवेल, भिवंडी व वसई सारखे प्रांत पेशवाई पासून चालत आलेल्या करांमध्ये व नंतर त्यात इंग्रजी विकास ह्यात संपूर्णपणे नष्ट होत चालले होते. अगदी भिवंडी पर्यंत रेल्वे ट्रॅकस, महाड पर्यंत गाडी रास्ता देखील पूर्ण होत आला होता. पण त्यापुढे दापोली पासून खाली तळ कोकणात बैलगाडीच चालू होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या अश्या परिस्थितीत सुद्धा संपूर्ण कोकणातुन, हर्णेचं सुवर्णदुर्ग आणि गुहाघरच अंजनवेल अशी दोन प्रांत अगदी वेळेवर न चुकता कर भरीत असत त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं दक्षिण कोकणात सगळं व्यवस्थित चाललं होतं. अगदी १८४० पर्यंत इंग्रजांनी दापोलीतील नियमित ताफा हलवून फक्त अनुभवी, आणि वरीष्ठ इंग्रज़ी अधिकाऱ्यांची तुकडी नियुक्त केली होती. ह्याला दापोलीतील थंड हवा व नैसर्गिक सौंदर्य ह्यापलीकडे दापोलीची भौगोलिक सरंचना कारणीभूत असावी. १८५७ नंतर मात्र इंग्रजांनी अधिकृत रित्या दापोलीत सैनिकी ताफा ठेवला नाही.

१८५७ च्या बंडानंतर इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनी कडून राज्यकारभाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. १८५७ पासून पुढे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी जाऊन ब्रिटिश राज चालू झाला आणि पुढे २१ वर्षांनी १८७८ मध्ये SPG मिशन चे आल्फ्रेड गॅडने दापोलीत आले. खुद्द राणीच्या शिफारसीतून आलेला हा एक तरुण स्कॉटिश मिशनरी होता. गॅडननेंनी दापोलीत आर्मी बर्राक च्या जागेवर AG high school ची स्थापना करून संपूर्ण अभ्यासक्रम रचला, आजु बाजूच्या गावातल्या मुलांना हे शिक्षण घेता यावं ह्याकरिता बोर्डिंग स्कूल्स बनवून घेतली. हर्णेत मुलींसाठी शाळा चालू केली. कोकणात रुढ असलेल्या पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धती नंतर इंग्रज़ी शिक्षण प्रणालीत कोकणात एवढं यश मिळवणारे ग्याडने हे पहिलेच.

ब्रिटिश राजवटीत SPG मिशनची मुख्य कार्यपद्धती हि ख्रिस्ती धर्माचा प्रसार व धर्मांतर करण्यावर जोर देत असे. आल्फ्रेड गॅडने देखील ह्याच उद्देशाने दापोलीत आले पण त्यापुढे ते असखलीत मराठी व संस्कृत बोलणारे दापोलीकर कसे बनले हि गोष्ट स्वतंत्रपणे सांगायला हवी.

खरंतर गॅडननेंना दापोलीत एकही धर्मांतर करण्यात यश मिळाले नाही. त्यांनी SPG मिशनला केलेल्या पत्रव्यवहारात ते नमूद करतात कि “इथे वेगवेगळ्या धर्मांची व जातीची बरीच लोक आहेत. बरीच लोक गरीबही आहेत, त्यांच्यावर कर्जही आहेत, परंतु इथल्या लोकांना इतर गरजा किंवा इच्छा नाहीत व ते समाधानी आहेत आणि म्हणूनच माझे इथले काम कठीण झाले आहे.”

१९२८ पर्यंत व त्यानंतरच्या कालावधीत ग्याडने च्या AG high school ने पुढे दापोली आणि पूर्ण देशाला थोर विचारवंत व क्रांतिकारी दिले. इतकेच नव्हे तर, सैन्यदल, नौदल, रेल्वे व इतर सरकारी सेवेत हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी सुद्धा दिले. १९२२ ची असहकार चळवळ, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, ४२ ची चले जावं ह्यासारख्या १९४७ पर्यंतच्या सर्व देशव्यापी चळवळीतून दापोलीने मोलाच योगदान केल. पुढे १९४७ नंतर, स्वातंत्र्याची घडी बसविण्यात सुध्दा दापोली अग्रेसर राहिली. ह्या प्रांताने देशाला धुरीचे राजकारणी दिले हि गोष्ट आजतायागत खरी होईल.

साने गुरुजी, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यासारखी युगप्रवर्तक नेतृत्व. डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, असे थोर विचारवंत. बाबा पाठक, सुडकोजीं खेडेकर, शिवराम मुरकर ,चंदुभाई मेहता, पुरुषोत्तम मराठे,मालू शेट, विठ्ठलराव बेलोसे, ह्यांच्यासारखी सामान्य पण नीतिमूल्यं जपणारी आदर्श स्वातंत्र्यसेनानी असुदेत किंवा त्यांना आडोसा देणारी नुसतीच बुटलांच्या दुकानाची ओसरी असुदे,त्यांच्या बोथट पण निरपराध विचारांना धार चढवणारी गोखले लायब्ररी असुदे, कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धनानी मिठाचा सत्याग्रह घडवला तो हर्णेचा समुद्र किनारा असुदे, वा स्वातंत्रउत्तोर काळात पूर्ण कोकणची राजकीय भाषणे ज्याने गिळून टाकली ते आझाद मैदान असुदे कोकणच्या व त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत दापोली कधी गोंगाट करीत तर कधी नकळत आपल स्थान टिकवून राहिली आहे.

कॅम्प दापोलीची गोष्ट कधी संपते किंवा संपली यासाठी अजून थोडं किंवा बरच खोदावं लागेल. मात्र १६११ पासून परकीय आक्रमणापासून इथल्या श्रीमंत संस्कृतीला व निसर्गाला जपून ठेवणारा हा प्रांत ज्याला आपण सर्व दापोली म्हणतो, तिची गोष्ट नक्कीच संपणार नाही.

 

13 COMMENTS

  1. खूप सुंदर माहिती ह्या पूर्वी कधीच वाचली नव्हती

  2. माझं गाव आंजर्ले ! हर्णे ,मुरुड, गिमव्हने, जालगाव, दापोली , कोलथरे,पंचनदी , केळशी या गावांना खूप नातेवाईक असल्याने सारा परिसर परिचयाचा आणि माझाच!
    गारम्बीला कोण विसरेल ?
    खूप आठवणी आहेत पण ऐतिहासिक माहिती नव्हती. ही प्रथमच वाचली, स्मरणरंजनाचा आनन्द मिळाला, खूप खूप धन्यवाद !

  3. समर्पक माहिती👌 स्तुत्य 👌 खूप अभिमान दापोलीकर असल्याचा

  4. अत्यंत रोचक अशी तपशीलवार माहिती. उत्एतम आढि अस्खलित अभिवाचन.
    एक सूचना : पार्श्वसंगीताचा आवाज थोडा कमी हवा होता.. बोलण्याकडे कांहीसं लक्ष द्विधा होतं.

  5. खूप छान माहिती आहे. मी दापोली, दाभोळ बंदर ई. ठिकाणी बऱ्याच वेळा गेलो आहे. तिथूनच गुहागर ला जाण्यासाठी बोटी आहेत. दापोलीची एवढी माहिती मला नव्हती. तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here