दापोलीतले गणेश मूर्तिकार

0
2599

गणेश चतुर्थी आता अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्व गणेश चित्रशाळेंतील धांदल वाढली आहे. मूर्तिकारांना त्यांच्या कामातून आता जराशीही सवड नाही; तरीही दापोलीतल्या फुटाणकरांच्या गजगणेश चित्रशाळेतील ‘नयन गणपत शिंदे’ आणि जालगांव कुंभार वाडीतल्या ‘अशोक नारायण मांडवकर’ यांनी आम्हा ‘तालुका दापोली’ टीमला वेळ दिला आणि व्यवस्थित माहिती दिली.

 माहिती इथे ऐका – 

आपल्या दापोली तालुक्यात अनेक मूर्तिकार आहेत. काहींना पिढीजात वारसा आहे, तर काहींना नाही. परंतु प्रत्येक जण आपल्या कलेत निपुण आहे, तरबेज आहे. कारण येथे बाहेरून आयत्या आणल्या जाणाऱ्या मूर्त्यांचे प्रमाण कमी आहे. इथले मूर्तिकार स्वयं हाताने मूर्ती घडवतात, तिला शोभिवंत करतात. अफाट मेहनत असताना देखील त्यांनी pop चा पर्याय तितकासा स्विकारलेला नाही. शाडूच्या मातीचेच गणपती असावेत आणि लोकांची मागणीसुद्धा मातीच्याच मूर्तीची असावी म्हणून अनेक मूर्तिकारांनी pop वर गावबंदी असावी, अशी निवेदने ग्रामसभेत केली आहेत आणि ही निवेदने काही गावांनी किंवा गावातल्या काही वाडीनीं आमलात देखील आणली आहेत. मूर्तिकारांना मातीच्या मूर्ती बनवताना जे समाधान लाभते, ते अनोखे असते. त्यामुळेच मन मारून ते pop च्या मूर्ती विकत जरी असले तरी स्वतःच्या घरी मातीचीच मूर्ती बसवतात.

दिवसेंदिवस दापोली शहरात आणि दापोली तालुक्याच्या गावांमधून घरांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या तुलनेत कारागिरांची संख्या अत्यंत मर्यादित आहे आणि त्यामुळेच इच्छा नसतानाही मूर्तिकारांना pop चा पर्याय स्विकारावा लागतो. शिवाय मातीच्या मूर्ती बनवताना काही मर्यादा पडतात. उदा. साडे तीन फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती बनवणे कठीण असते, मातीच्या मूर्तीला घडवताना आणि रंगकाम करताना वाळण्यासाठी उचित वेळ द्यावा लागतो, मातीच्या वाढत्या किमती परवडत नाही, लोकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या ढब असलेल्या मूर्त्या बनवणे शक्य असले तरी लोकांकडून त्याचा योग्य मेहनताना मिळत नाही.

सध्या या सगळ्याला एक नवीन पर्याय समोर आलेला आहे; तो म्हणजे लाल मातीचा. चिऱ्याच्या खाणीतील तासलेल्या चिऱ्यांची अति बारीक भुकटी वापरून गणपती तयार केले जातात. यात थोडासा pop वापरला जातो; परंतु अगदी कमी प्रमाणात आणि केवळ मूर्तीच्या मजबुतीकरता. यात pop प्रमाणे काथ्याचाही वापर असतो, त्यामुळे मूर्तीची मजबुती चांगली ठरते. या लाल मातीच्या मूर्ती शाडू मातीच्या मूर्तीप्रमाणेच वजनाला जड असतात, त्यामुळे त्या विसर्जनानंतर पाण्यावर तरंगत नाहीत व त्यांचे विघटन होते. फक्त शाडू मातीपेक्षा थोडासा कालावधी जास्त लागतो.

लोकांची मागणी पुरवण्यासाठी आणि पर्यावरण हानी थांबवण्यासाठी लाल मातीचे गणपती हा उत्तम पर्याय आहे. तो येणाऱ्या पुढच्या काळात सर्व मूर्तिकार आणि लोक स्विकारतील, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here