सीगल पक्षी दापोलीत | Seagull Birds In Dapoli | Information

0
3541

थंडीच्या दिवसात दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर या परदेशी पाहुण्यांची गर्दी पहायला मिळते. हे पाहुणे खूप लांबचा प्रवास करून येथे आलेले असतात. सकाळी ६-७ च्या सुमारास आणि सायंकाळी ६-७ च्या सुमारास यांचे थवेच्या थवे आपल्याला पाहायला मिळतात. यांच्या येण्या-जाण्याचा व किनारी थांबण्याचा मार्ग निश्चित नसतो.

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील फॉरेस्ट्री विभागाच्या विद्यार्थ्यांनी २०१७ मध्ये हिवाळ्यात स्थालांतर करून येणाऱ्या या पक्ष्यांचा एक स्टडी केला होता. हा स्टडी दापोली मर्यादित होता. स्टडी दरम्यान आढळलेल्या या Gull आणि Tern म्हणजेच कुरव आणि सुरय पक्ष्यांची सविस्तर माहिती घेऊ.

Brown Headed Gull | तपकिरी डोक्याचा कुरव. मराठी मध्ये याला नर असेल तर धोबा, सरोता, कीर, कुरव, खारा टिंबा आणि मादी असेल तर कंबावली, केगाई, केगा, केगो, बलाई, बलई असे म्हटले जाते. आकाराने डोमकावळ्यापेक्ष्या मोठा असून रंगाने वरून राखाडी आणि खालून पांढरा असतो. उन्हाळ्यात याच्या डोक्याचा रंग कॉफिसारखा तपकिरी दिसतो. पण थंडीत जेंव्हा भारतात असतो, तेंव्हा डोके राखट सफेद रंगाचे दिसते. पंखाची टोके काळी असून त्यावर आरशासारखा पांढरा डाग असतो. चोच आणि पाय लाल असतात. कानाला कठोर वाटणारा गेक् गेक् असा आवाज हे कुरव करतात.

हे कुरव समुद्राचे सफाई कामगार असतात. कावळ्याप्रमाणे अन्न म्हणून जिवंत- मृत मासे, किडे आणि समुद्राच्या पाण्यावर तरंगणारी घाण खातात.

यांची आढळ भारतीय पूर्व –पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर आणि क्वचितच समुद्रापासून दूर अशा नद्या व सरोवरांवर होते. यांची वीण लडाखच्या पठारावरील सरोवरांचे किनारे आणि दलदलीत होते. हे कुरव एकलकोंडे न राहता समूहाने राहणे पसंत करतात.

Black Headed Gull | म्हणजेच काळ्या डोक्याचा कुरव. मराठीत नराला कुरवक आणि मादीला केगाई, केंगा, केगो, कागाई, काळशिर केगो असे म्हटले जाते. हा कुरव आकाराने थोडा लहान असून इतर कुरवांपेक्षा पंखांची टोके टोकदार व पंखाचा पहिला भाग पांढऱ्या रंगाचा आणि त्यास काळी किनार असते. उन्हाळ्यात डोक्याचा रंग काळपट तपकिरी. हिवाळ्यात मात्र डोके पांढरे व त्यावर डोळ्यानजीक काळा डाग असतो. कर्कश क्वाई व ऱ्हस्व क्वुप असा आवाज हे कुरव करतात.

यांची आढळ भारतीय पूर्व-पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर होत असून कधी-कधी समुद्रापासून दूर अशा नदी, तळ्यात होते. यांची वीण युरोप, आशियाच्या Palearctic भागात होते. हे कुरव तपकिरी डोक्यांच्या कुरावांप्रमानेच अन्न खातात आणि त्यांच्याबरोबरच समूह करून राहतात.

Heuglin Gull | म्हणजेच बांगड्या कीर. हा कुरव बांगडा मासा खात असल्याने सिंधुदुर्गात याला ‘बांगड्या कीर’ म्हटले जाते. आणि मादीला ह्युग्लिनची केगो किंवा पिवळ्या पायाची पल्ला केगो, असे म्हटले जाते. या कुरवाचा आकार बदकाएवढा असून डोके, मान, शरीराचा मागील भाग आणि शेपटी हिमशुभ्र असते. रंग काळपट–करडा असतो. उडताना पंखांची किनार पांढरी दिसते. आंतरपंखाच्या टोकाला आरशासारखा पांढरा डाग असतो. पाय आणि पावले दिसायला पिवळी, चोचीच्या खालच्या पुटाचे टोक तांबडे आणि नर-मादी दिसायला एकसारखे असतात.

यांची आढळ हिवाळ्यात पाकिस्तान, पश्चिम भारत ते मुंबईचा समुद्र किनारा आणि क्वचितच केरळ आणि श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यावर होते. यांची वीण सैबेरियात होत असून, समुद्रकिनारा व किनाऱ्यावरील पर्वताच्या कडा-कपारीवर घरटे करून हे कुरव सामुहिकरित्या राहतात. जिवंत-मृत मासे, किडे, शिंपल्यातले जीव हे त्यांचे अन्न आहे.

Gull-billed Tern | कुरव चोचीचा सूरय.

मराठीत नराला लहान किरा आणि मादीला कुरारिका, केगो, चंचू कुररी असे म्हटले जाते. हा पक्षी ‘कल्ला कुररी’ या पक्ष्यापेक्षा आकाराने मोठा, पिवळसर करडा आणि पांढऱ्या वर्णाचा असतो. चोच कुरव पक्ष्यासारखी जाड आणि काळी असते. शेपटी खोलपर्यंत दुभंगलेली असते. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात यांच्या रंगात बदल होतो. भारतात व श्रीलंकेत हिवाळ्यात हे सूरय आढळतात. पाकिस्तानमध्ये एप्रिल ते जून या काळात यांची वीण होते.

वाळूतले खेकडे, छोटे मासे, बेडूक आणि किडे हे सूरय अन्न म्हणून खातात. समूहाने राहणे यांना पसंत असले तरी, यांचे थवे छोटे छोटे असतात.

कास्पियन टर्न Caspian Tern म्हणजेच पारसी सुरय
मराठीत याला नर असेल तर पारसी शिपाई पक्षी आणि मादा असेल तर पारसी केगो, पारसी कुररी म्हणतात.
हा भारतात आढळून येणारा सर्वात मोठा सुरय. याची चोच जाड व पोवळ्या (पिवळ्या नाही.) रंगाची असते. शेपटी किंचित दुभंगलेली, पांढरे डोके आणि मान, डोक्यावर काळ्या रेषा आणि खालील भाग शुभ्र पांढरा असतो. हिवाळ्यात शरीराचा वरील भाग मोतिया उदी दिसतो. हे सुरय  भारतात आणि नेपाळमध्ये हिवाळी पाहुणे म्हणून आढळतात. यांची वीण बलुचिस्तान आणि श्रीलंका येथे होते. हे सुरय मासे, कोळंबी जिवंत पकडून खातात. मेलेले मासे खात नाहीत. शिवाय समूहाने राहणं यांना पसंत नाही हे एकटे दुकटे असतात.

Lesser Crested Tern  म्हणजे मोठा तुरेवाला सुरय
हा  सुरय  बंगालमध्ये आढळून येतो म्हणून याला बंगाली सरोता आणि मादीला लहान शिखी, कुररी, लहान शेंडुर्ली पराटी म्हटले जाते. आकाराने घारीपेक्षा लहान असून मध्यम आकाराच्या कावळ्याएवढा असतो. चोच नारिंगी – पिवळी सडपातळ, कपाळ काळे आणि खालील भागाचा रंग पिवळट असून पाय काळे असतात.

पाकिस्तान, भारत, श्रीलंका, अंदमान व निकोबार बेटे या भागात हे सुरय वर्षभर येतात. यांची वीण मक्रानचा किनारा, रामेश्वरम्, लक्षद्वीप आणि मालदीव बेटावर होते. यांचे अन्न कास्पियन टर्न म्हणजेच पारसी सुरायांप्रमाणे आहे. हे सुरय समूहाने राहणे अजिबात पसंत करत नाहीत.

थंडीच्या दिवसात स्थलांतर करून येणारे हे पक्षी स्थलांतरणाचा प्रवास दिवसा करतात की रात्री, का दोन्ही वेळेस, सलग की थांबत – थांबत हे सांगणे फार कठीण आहे. पण अन्नाच्या शोधात आणि त्यांना पूरक अश्या वातावरणात राहण्याकरता ते भारतात येतात हे निश्चित. कारण त्यांचे वास्तव्य असलेले प्रदेश थंडीच्या दिवसात अतिशीतल होतात आणि खाद्याची कमतरता भासू लागते. येण्या-जाण्याचा प्रवास सुरु करण्याआधी पक्षी भरपूर खातात आणि प्रवासासाठी लागणारी शक्ती चरबीच्या रूपाने शरीरात साठवतात. अन्न कमतरतेमुळे ज्यांच्या शक्तीचा साठा पूर्ण होत नाही, ते पक्षी प्रवास करत नाहीत. वर्षभर ते स्थलांतर करून आलेल्या ठिकाणीच थांबतात आणि त्यामुळेच थंडीचा काळ निघून गेल्यानंतरही हे परदेशी पाहुणे आपल्याला समुद्रकिनारी अधून-मधून दिसतात. खाद्याची गरज पूर्ण करण्यासाठी कधी मासे भरून आलेल्या बोटीमागे उडत असतात, तर कधी भरती ओहटीच्या लाटांवर शांतपणे तरंगत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here