दापोलीतील वाणी उपचारक – सौ. रेखा र. बागुल

0
318

दापोली तालुक्यात कर्णबधीर, गतिमंद मुलांची संख्या फार मोठी आहे; पण तेवढ्या प्रमाणात सुविधा नाही. सुविधेचा अभाव असल्याकारणाने ही मुलं व्यंगमुक्त होत नाहीत; कायम तशीच राहतात. ग्रामीण भागांतून तर परिस्थिती आजही बिकट आहे. आणि या मुलांना केवळ वैद्यकीय उपचारांची नव्हे तर प्रशिक्षण केंद्राची देखील तितकीच आवश्यकता आहे.

सौ. रेखा रवींद्र बागुल ‘नचिकेत वाचा-श्रवण प्रशिक्षण केंद्रामार्फत’ दापोलीतील कर्णबधीर मुलांना वाचा – श्रवण शिक्षण देत आहेत. दा. जालगाव मधील स्वतःच्या राहत्या घरी त्या हे केंद्र चालवतात. त्याआधी त्या दापोलीतील कर्णबधीर महाविद्यालयात दहा वर्षे कार्यरत होत्या. दापोलीत येण्यापूर्वी २००६ सालापर्यंत त्या डोंबिवलीला राहत होत्या व डोंबिवलीमध्ये त्यांनी दोन मैत्रिणींसोबत कर्णबधीर मुलांची शाळा चालू केलेली. ही शाळा पुढे ‘अस्तित्व’ या समाजसेवी संस्थेत विलीन झाली. पुण्यातील वि.आर.रुईया मुकबधीर महाविद्यालयात वाणी उपचाराच प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षातच डोंबिवली मध्ये शाळा सुरु केली होती. त्या शाळा स्थापनेच्या आधी त्या उल्हासनगरच्या एका शाळेत कार्यरत होत्या. जी शाळा कोर्ट कमिटेड (अनाथ आणि गुन्हेगार जगतातून आलेल्या) मुलांची होती. अपंग मुलांबाबतची अशी तळमळ असेच लोक दाखवतात, ज्यांच्या घरी अपंग व्यक्ती आहे. परंतु सौ. रेखा बागुल यांच्या घरी कोणीही अपंग नाही. त्यांनी हे कार्यक्षेत्र स्वीकारलं, केवळ समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या दोन बहिणी, दोन मुली व काही विद्यार्थिनी या सेवाभावी क्षेत्राकडे वळल्या आणि त्याही आज त्यांच्याप्रमाणेच कार्य करीत आहेत. जवळपास ३०-३५ वर्षे चाललेल्या या सेवाभावी कार्यामधून श्रवण क्षमता कमी असलेली अनेक मुले बोलती झाली. या मुलांचे आयुष्य जितके कठीण झाले असते, तितके कठीण राहिले नाही. म्हणूनच २०१३ साली सौ. रेखा र. बागुल यांचा षष्ठीचा कार्यक्रम जोरदार केला व त्यामार्फत केलेल्या ऋणांसाठी आभार प्रदर्शन केले. आजही जी मुले त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्या पालकांमधील पाल्यासंबंधीची चिंता जवळजवळ मिटलेली आहे.

‘तालुका दापोली’ टीमने बागुल मॅडमची, प्रशिक्षण घेतलेल्या मुलांची आणि पालकांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मॅडमनी जुने किस्से आणि आठवणी सांगितल्या आहेत आणि पालकांनी आपले अनुभव. ही मुलाखत आपण जरूर पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here