दापोलीतील ‘माता रमाई’ स्मारक

1
6917

दापोली शहरापासून केवळ ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वणंद गावी नतमस्तक व्हावे, असे माता रमाबाईंचे पूज्य स्मारक आहे. याच गावात ७ फेब्रुवारी १८९७ साली धोत्रे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भिकू धोत्रे व आईचे नाव रुक्मिणी धोत्रे होते. ( खैरमोडे यांच्या चरित्रग्रंथात रमाबाईंचे आडनाव वलंगकर असे दिले आहे. ) वडील हर्णे बंदरातील माशांच्या टोपल्या मार्केटमध्ये आणण्याचे हमालाचे काम करीत असत. धोत्रे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार हालाखीची, गरिबीची होती. रमाबाईंना तीन भावंडे होती. एक थोरली बहीण ( जिचे लग्न वयाच्या ६-७ वर्षी दापोलीत झाले. ) व एक धाकटी बहीण आणि भाऊ ( धाकट्या बहिणीचे नाव गौरा व भाऊ शंकर ). रमाबाईंचे पाळण्यातील नाव ‘भागीरथी’ होते. पण त्यांच्या मामाने सुचविलेले नाव ‘रामी’ हे सर्वांचे आवडते होते. लग्नानंतर बाबासाहेबांनी त्यांचे नाव ‘रमा’ ठेवले. परंतु ते प्रेमाने रामू म्हणित असत. वयाच्या आठव्या वर्षी वणंद येथे असताना रमाबाईंचे आई-वडील वारले, त्यावेळी त्यांच्या मामांनी त्यांना व त्यांच्या भावंडांना मुंबईस नेले आणि वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे बाबासाहेबांशी लग्न झाले. ( त्यावेळेस बाबासाहेब १६ वर्षांचे होते. ) पुढे त्यांनी बाबासाहेबांच्या संसाराला, शिक्षणाला, सामाजिक कार्याला यथायोग्य साथ दिली आणि कर्तुत्वशालिनी, माता ‘रमाई’ म्हणून गौरविल्या गेल्या.

रमाबाईंच्या पश्चात त्यांचे घर पूर्णपणे दुर्लक्षित होते. घराची अत्यंत भग्न अवस्था झाल्यानंतर वणंद ग्रामस्थांनी त्या ठिकाणी माता रमाईचे स्मारक करायचे ठरवले. लोकनिधी व लोकश्रमातून मातेचे स्मारक छोटेसे बांधण्यात आले. पुढे हे स्मारकास मोठे होण्यास बाबासाहेबांच्या सुनबाई ‘मीराताई आंबेडकर’ यांनी मोठा हातभार लावला. या स्मारकामध्ये रमाबाई व बाबासाहेबांचा पुतळा, छायाचित्र आणि बुद्ध, स्तूपाची प्रतिमा आहे. शिवाय रमाबाईंच्या खडतर आणि संघर्षमय आयुष्याची माहिती देणारा फलक आहे. रमाबाईंच्या जयंती आणि स्मृतिदिनादिवशी येथे मोठ्या प्रमाणावर लोक वंदन करण्यासाठी येतात. धोत्रे आणि आंबेडकर परिवार देखील यादिवशी आवर्जून हजर असतो. स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही सध्या मोठी आहे. २०१५ साली जेव्हा स्मारकाचे उद्घाटन झाले तेव्हा उद्घाटन सोहळ्याला जवळपास तीन लाखाहून जास्त लोक उपस्थित होते.

संदर्भ : प्रा. डॉ. विजय अनंत तोरो

विनिता धोत्रे ( वणंद ग्रामस्थ)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here