दापोलीतील मधमाशी संरक्षक, खानविलकर दांपत्य

    3
    3632

    दापोलीतील खेर्डी गावात राहणारे ‘श्री. मिलिंद खानविलकर व त्यांच्या पत्नी सौ. मृणाल खानविलकर’ गेली दहा वर्षे मधमाशी संवर्धन/संरक्षणाचे कार्य करीत आहेत. हल्ली इमारतीला किंवा घराच्या आडोशाला लोंबणारं मधाचं पोळं काढण्याकरता लोक केमिकल स्प्रेचा (पेस्ट कंट्रोल) वापर करतात किंवा ते सरळ जाळून काढतात, यामुळे मध तर मिळत नाहीच; पण हजारोंच्या संख्येत मधमाश्या मृत्यूमुखी पडतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन ‘खानविलकर दांपत्याने’ अशाप्रकारची मधमाश्यांची घरे विनामूल्य दरात काढून देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांमध्ये शेकड्याहून अधिक त्यांनी मधमाश्यांची पोळी काढली व मधमाश्यांचे प्राण मोठ्या संख्येत वाचवले. त्यांच्या या कार्याबद्दल आणि मधमाश्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली खालील बातचीत.

    • तुम्ही दोघंही मधमाश्यांच पोळं काढता, तर याचं कुठे प्रशिक्षण घेतलेलं का? म्हणजे विद्यापीठात वगैरे….

    नाही, अजिबात नाही. सुरुवातीला मधमाश्यांविषयी एखाद्या सामान्य माणसाला जितकी माहिती असते तेवढीच आम्हाला होती. पण त्यांच्याविषयी अभ्यास केल्यानंतर पोळं काढताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे व त्यांना त्रास न देता, हानी न पोहचवता कसं मध मिळवता येतं, ही गोष्ट लक्षात आली. मग पोळं काढण्याचा पहिला प्रयत्न केला जो व्यवस्थित यशस्वी झाला. तिथे भय संपून गेलं. आणि आता तर काय, आम्ही मधमाश्यांचे मित्र आहोत!

    • मधमाशी संवर्धन हा विचार कसा व कुठून आला?

    मधमाश्यांविषयी अभ्यास केल्यानंतर ‘जेव्हा मधमाश्या संपतील त्यानंतर काही वर्षातच मनुष्य जीवन संपेल’ असे अल्बर्ट आईनस्टाईन का म्हणाले होते हे लक्षात आलं. आणि हे लक्षात आल्यामुळे मधमाश्या वाचविण्याकडे आमचा कल आहे.

    • मधमाशी संवर्धनाबरोबरच मधमाशी पालन व मधोत्पादनाचा विचार केला होता का कधी?

    हो केलेला. मधुमक्षिका पालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. शिवाय बाजारपेठेत मधाची आणि मेणाची मागणी मोठी आहे. आम्ही पण याचं दृष्टीकोनातून मधपेटी तीन ते चार वर्ष सांभाळली. परंतु कोकणात भरपूर पाऊस आणि मधमाश्यांचे नैसर्गिक शत्रू जास्त असल्यामुळे पेट्यांचा सांभाळ अत्यंत कठीण जातो. त्यामुळे मध उत्पादनाचा व्यवसाय इथे तितकासा शक्य नाही.

    • मधमाश्यांचे नैसर्गिक शत्रू कोणते?

    लाल मुंग्या, ओंबील (लाल डोंगळे), सरडा, गांधील माशी हे मधमाश्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत.

    • मधमाश्या त्यांचे कार्य कशाप्रकारे करत असतात आणि त्याचं घर करण्यासाठी त्या कशी जागा निवडतात?

    आपण मधमाश्यांच पोळं पाहिलं, तर ज्या भरपूरशा माश्या दिसतात त्या कामकरी माश्या असतात. त्यांची कामे वाटलेली असतात. काही माश्या पाणी शोधतात, काही अन्न. काही केवळ पाहणी करणाऱ्या असतात, काही पोळ्यात स्वच्छता करणाऱ्या आणि काही सैनिकी. परंतु या सगळ्या माश्या संरक्षण करत असतात राणी माशीचे. जी आकाराने इतर माश्यांपेक्षा मोठी असते आणि थोडी वेगळी असते. तिचं कार्य असतं अंडी घालून माश्यांची संख्या वाढविण्याचं. ती एका वेळेस साधारणतः शंभरीच्या आसपास अंडी घालते. त्या नव्या माश्यांच्या सुरक्षेची आणि  खाद्यपाण्याची जबाबदारी कामकरी माश्यांवर असते. त्यामुळेच त्या खाद्यपाणी जिथे मुबलक प्रमाणात मिळेल अशा ठिकाणी घर करतात. ( मधमाश्यांना पिण्याकरता अतिशय स्वच्छ पाणी लागते. त्यामुळे मधमाश्यांच जिथे घर आहे तिथे जवळपास शुद्ध पाण्याचा पुरवठा निश्चित असतो. )

    • मधमाश्यांच्या प्रजाती किती आहेत?

    आपल्या भारतामध्ये अॅपिस सेरेना इंडिका, अॅपिस मेलिफेरा, अॅपिस फ्लोरीया, अपिस डोरसॅटा, ट्रायगोना इरिडीपेनीस या मधमाश्यांच्या प्रजाती आढळतात

    • मधमाशी चावल्यास त्वरित कोणता उपाय करावा?

    मधमाशी चावल्यास त्वरित त्यावर चुना लावावा.

    • मधमाश्या वाचवणे का गरजेचे आहे ?

    पहिली गोष्ट मधमाश्या नसल्या तर जी नैसर्गिक अन्नसाखळी आहे ती मोडून पडेल. दुसरी गोष्ट मधमाश्यांच्या कार्यामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ होते; ती थांबेल. तिसरी गोष्ट मध जे औषधी आणि अत्यंत गुणकारी आहे ते अन्य कोणत्याही प्रक्रियेने तयार करता येत नाही, केवळ मधमाश्यांमार्फत नैसर्गिक पद्धतीनेच मिळवावे लागते; ते मिळणार नाही. त्यामुळे मधमाश्यांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे.

    • मधमाश्या कमी होण्या मागची कारणे काय?

    मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, फळा-फुलांवर होणारी अजैविक कीटकनाशकांची फवारणी, मोबाईल टॉवर्सची उभारणी, ही सगळी मधमाशी संख्या कमी होण्या मागची कारणे आहेत.

    • तुम्हा दोघांना या कार्यात मदतीचे हात किती आहेत?

    तसे अनेक आहेत; पण आमची मुलं आम्हाला सहकार्य करतात (वयाने लहान असून सुद्धा ) आणि त्यांना देखील आमच्या इतकीच या गोष्टीची आवड आहे, ही खरी आनंदाची बाब आहे.

    खानविलकर दांपत्याचे मधमाशी संवर्धनाच्या कार्यबदल माहिती देणारा लेख. वृत्तपत्र -लोकमत

    मधमाशीचं पोळं काढायची प्रक्रिया –

     

    खानविलकर दांपत्याचे मधमाशी संवर्धनाचे हे कार्य खरोखर स्तुत्यास्पद आहे. ते लोकांमध्ये याविषयी जमेल तितकी जनजागृती देखील करतात. परंतु या जनजागृतीची दखल लोकांनी घेणे अत्यावश्यक आहे. कारण मधमाशी मित्र वाढल्याखेरीज दापोलीमध्ये मधमाशी संख्या वाढणार नाही.      

     

     

     

     

    3 COMMENTS

      • Hi Anagha,

        Here’s Mr. Milind Khanvilakar’s number – 9158815809
        Kindly give reference of ‘Taluka Dapoli’ (www.talukadapoli.com) when you connect with Mr./ Mrs Khanvilkar.

        To know more about Dapoli and its cultural, historical, architectural aspects, follow us on http://www.facebook.com/talukadapoli.

        Regards,
        Team Taluka Dapoli

    1. अत्यन्त स्तुत्य उपक्रम.
      In Thane near Upawan, many buildings face (so called) problem of hive.
      I have seen cruely against the bees.
      I personally try to rescue bees who enter the home by mistake.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here