दापोलीतील प्राचार्या शांता सहस्रबुद्धे

    0
    2019

    गेल्या चार दशकाहून अधिक दापोलीच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासवैभवासाठी कार्यरत असणाऱ्या आणि दापोलीतील अनेक सेवाभावी संस्था व व्यक्तींचे प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय प्राचार्या, शांताबाई चिंतामणी सहस्रबुद्धे. अभ्यासू, वृत्तीने नम्र, मृदुभाषी, विचाराने समृद्ध, उत्तम लेखन, उत्तम वकृत्व, भरपूर लोकसंग्रह ही त्यांची ओळख. याशिवाय आंतरिक तळमळीने, चिकाटीने आणि सर्वांशी समरस होऊन कार्य करण्याचा स्वभाव, त्यामुळे दापोलीत सर्वजनप्रिय असं हे व्यक्तिमत्व.

    शांताबाईंचा जन्म ३ एप्रिल १९३४ रोजी दापोली तालुक्यातील कोळथरे गावी झाला. त्यांना पाच बहिणी व एक भाऊ. ‘लक्ष्मण महाजन’ हे त्यांचे वडील. शांताबाईंच शिक्षण मोठ्या कष्टानं झालं. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं, कोळथरेच्या शाळेत आणि पुढील ए.जी. हायस्कूलमध्ये. प्रथम त्या व्हर्नाकूलर फायनल झाल्या ( त्यावेळची सातवीची परीक्षा ) व पुढे एम.ए पर्यंत शिक्षण केलं. सातवीत असताना त्यांच्या आईची प्रकृती गंभीर बिघडलेली. त्यावेळी वडील कामास, मोठा भाऊ मुंबईस व मोठी बहिण सासरी असल्याकारणाने आईची जबाबदारी त्यांच्यावर होती; परंतु ती निभावत त्यांनी सातवीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. सातवीनंतर आठवी, नववी त्यांनी बाहेरून केली ( प्रायव्हेट कॅन्डीडेट ) त्यावेळेस आगोमचे कृष्णा मामा महाजन त्यांना संस्कृत व गणित शिकवायचे. बाकीचा अभ्यास त्या स्वतःहून करीत होत्या. त्याचवेळेस कोळथरेच्या शाळेकडून सहावी, सातवीसाठी अर्ज झाला. लोकल बोर्ड असल्यामुळे वर्ग चालू झाले आणि शिक्षक नेमण्याची जबाबदारी शाळेवर आली. शांताबाई सातवी पास असल्यामुळे त्यावेळेस त्यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. वयाच्या तेराव्या वर्षीच त्या शाळेतील शिक्षिका झाल्या. त्यांनी साडेदहा महिने कोळथरेच्या शाळेत काम केले. त्यांना तिथे तीस रुपयांचे वेतन मिळायचे. ( इतर शिक्षकांना ७० रु. चे वेतन होते. ) अकरावी एस.एस.सी.त प्रवेश घेतल्यानंतर शाळा चालू होऊन फक्त दहा दिवस झाले असताना शांताबाईंना टायफॉईड झाला व जवळपास तीन एक महिने तरी त्या अंथरुणाला खिळून होत्या. तरीसुद्धा बरे होताच त्यांनी चिकाटीने अभ्यास केला आणि साडे सत्त्याहत्तर टक्क्यांनी ए.जी.हायस्कूलमध्ये पहिल्या, जिल्ह्यात दुसऱ्या आणि राज्यात मुलींमधून पहिल्या आल्या. पुढे त्यांनी एम.ए. पर्यंतच शिक्षण रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमधून केलं. त्यांना बी.ए.साठी नॅशनल स्कॉलरशिप आणि कॉलेज कडून फ्रीशिप मिळाली. त्या १९५६ साली इंग्रजी एम.ए झाल्या व १९५७ ते १९६० गोगटे कॉलेजमध्ये ट्यूटर आणि १९६० ते १९६५ मध्ये व्याख्याता म्हणून काम केले. १९६५ ते १९७४ दरम्यान सिंधुदुर्ग कॉलेज, मालवण येथे त्या व्याखाता होत्या. १९७४ साली त्या वराडकर कॉलेज, दापोली येथे उपप्राचार्य म्हणून रुजू झाल्या. तिथूनच १९८९ साली त्यांनी वायाव्ह्या ५५ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

    निवृत्ती नंतर त्या दहावीच्या मुलांच्या शिकवण्या घेत होत्या. शिकवणे हे त्यांना जडलेलं व्यसन असल्यामुळे आज वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा मुलांच्या शिकवण्या घेतात. सध्या संस्कृत शिकवणारे फार कमी लोक असल्यामुळे त्या मुलांना संस्कृत शिकवतात. इंग्रजीमधून एम. ए. केलं असलं तरी मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर त्याचं सारखच प्रभुत्व आहे. त्यांनी तिन्ही भाषांमध्ये विपुल वाचन केले आहे. इंग्रजी कवी रॉबर्ट ब्राऊनी आणि त्याची पत्नी एलिझाबेथ ब्राऊनी यांच्या कविता त्यांना विशेष आवडतात. लेखन, वाचन आणि शिकवण्या व्यतिरिक्त त्यांना संगीत, खेळ यातही अभिरुची आहे. त्या उत्तम तबला व पेटी वाजवतात आणि टेबल टेनिस व बॅट मिंटन त्या भरपूर खेळलेल्या आहेत.

    साहित्यिक योगदान

    लहान मुलांसाठी त्यांचे ‘राजपुत्र अतुल’ हे कथापुस्तक आणि बहिणभाऊ ही कांदबरीका प्रसिद्ध झाली आहे. लहान मुलांसाठी दै.लोकसत्ता तसेच कुमार, गोकुळ या नियतकालिकांमध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘भावतरंग’ हा ललित लेखसंग्रह, ‘सोनचाफा’ हा कथासंग्रह त्यांच्या नावे आहे. त्यांचे पती प्रा.चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांचेवरील लेखांचा संग्रह ‘मणिबंध’ तसेच दापोली येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या वेळेस प्रसिद्ध झालेला विशेषांक ‘गारंबी’ चे संपादनकेले आहे. स्त्री जीवनाशी निगडीत त्यांचे अनेक लेख व कथा पुढारी, लोकमत, प्रहार अशा वृत्तपत्रातून आणि रोहिणी, अनुराधा, एकता अशा मासिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा.शांताबाई सहस्त्रबुद्धे कोकण मराठी साहित्य परिषद, दापोली शाखेच्या १९९२ ते २००४ पर्यंत अध्यक्षा होत्या.

    सामाजिक योगदान

    बाल व स्त्री कल्याण हे शांताबाईंचे आवडते सामाजिक कार्यक्षेत्र. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक संस्कार शिबिरे भरवली आणि खाजगी मोफत वाचनालय स्थापन केले. महिलांचा मानसिक व शैक्षणिक विकास हा उद्देश लक्षात ठेवून त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. ग्रामोद्योगी महिला मंडळ (रत्नागिरी), स्नेहल भगिनी मंडळ (मालवण), शारदा महिला मंडळ (दापोली) या संस्थांच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. रत्नागिरी जिल्हा महिला मंडळाच्या त्या चिटणीस होत्या. हुंडाबळी, दारूबंदी, कुटुंब कल्याण, कुटुंब स्वास्थ्य यासाठी खेडोपाडी जाऊन व्याख्याने, शिबिरे चालविणे ही त्यांची कार्यपद्धती होती. महिला मंडळांना व्यवसाय मार्गदर्शन, व्यवस्थापन सल्ला देण्याचेही महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. या संस्थांव्यतिरिक्त शांताबाई तालुका समन्वय समिती, दापोलीच्या सदस्या व कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या ५ वर्ष सिनेट सदस्या होत्या.

    समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य

    • इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय, दापोली च्या संस्थापक सदस्य आणि सहा वर्षे अध्यक्ष. शिवाय आजतागायत क्रियाशील कार्यकारणी सदस्य.
    • स्नेह्ज्योती अंधशाळा, घराडी( ता. मंडणगड ) च्या सन २००३ पासून आजतागायत सेक्रेटरी उपाध्यक्ष.
    • गणेश दातार वृद्धाश्रम, मौजे दापोली च्या संस्थापक सदस्य

    वरील संस्था मार्फत शांताबाई अनेक अंध, अपंग, वृद्ध व्यक्तींचे जीवन सुसह्य व आनंदी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

    सन्मान

    • महाराष्ट्र शासन, महिला व बालकल्याण विभागाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कार प्राप्त.(१९९७) (हा पुरस्कार त्यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळाला आणि रत्नगिरी जिल्ह्यात हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शांताबाई प्रथमच. )
    • शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्यासाठी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे संस्थेचा की.सरस्वतीबाई केळकर स्मृती पुरस्कार आणि गौरवपत्र प्राप्त.
    • सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल नेहरू युवा केंद्र, रत्नागिरीचे गौरवपत्र आणि महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र प्राप्त.(१९९७)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here