दापोली शहरात मुख्य बाजारपेठेत स्थित असलेल्या श्री स्वयंभू मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी अगदी उत्साहाने साजरा होतो. जोग नदीच्या काठावर स्थित असलेलं हे श्री स्वयंभू मारुती मंदिर सुमारे २५० वर्षे जुनं आहे. मंदिरात असलेली हनुमानाची हि स्वयंभू मूर्ती पंचमुखी आहे. दापोलीतील लोकांची या मारुतीवर अनन्य श्रद्धा असल्यामुळे येथील हनुमान जयंती उत्सव दापोलीतील उत्सवाचा मानबिंदू असतो.
श्रीराम नवमीपूर्वीच मंदिरात छताच्या भागास सुंदर पताकांची आरास करण्यात येते, गाभाऱ्यातील श्रींची मूर्ती अतिशय सुंदर प्रकारे सजविली जाते, संपूर्ण मंदिराला आकर्षक अशा रोषणाईचा झगमगाट असतो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंती दिवशी पहाटे श्रींची आरती केली जाते.
प्रथेप्रमाणे बरोबर सकाळी ५ वाजता हनुमान जयंतीच्या कीर्तनाची सुरुवात होते. पहाटेच्या या किर्तनाला दापोलीकर अगदी मोठ्या संख्येने येतात. सूर्योदयाच्या वेळी जन्मकाळ साजरा होतो आणि हनुमंताची न्हाणी व पाळणा पार पडतो. देवभेट व आरती झाल्यावर लगेचचं श्रीं च्या रथाची मंदिरास प्रदक्षिणा होऊन भव्य मिरवणुकीस प्रारंभ होतो. मिरवणुकीत खालु बाजा, धावजीचा बाजा, ढोल-ताशे, भजनाची दिंडी सामील असते. श्रीं चा रथ प्रथम प्रभू आळीतील श्री राम मंदिरात जातो. श्री राम मंदिरात भगवंताची पूजा व आरती केली जाते. लोकांच्या चहा-पाण्याची देखील श्रीराम मंदिरात व्यवस्था केलेली असते. श्री राम मंदिरातून रथ बाहेर पडल्यानंतर ही मिरवणुक मध्यरात्री मारुती मंदिरात परत येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लळीत किर्तन पार पडते.
दापोलीकर प्रत्येक उत्सवा प्रमाणे हनुमान जयंतीचा उत्सव देखील अगदी थाटामाटात आणि तितक्याच उत्साहाने साजरा करतात. दोन दिवस चालणारा दापोलीतीला हा उत्सव अतिशय नयनरम्य असतो.