परशुरामाने बेटासुर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर तोडले. त्या शिराच्या ब्रम्हरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन ‘तिंतृण-तिंतृण’ असा ध्वनी काढीत तो रेणुकेजवळ आला. बेटासुराच्या धडाचे चौंडके आणि शिरांचे तुणतुणे वाजवून परशुरामाने जे हे पहिले मातृवंदन केले त्यातूनच गोंधळाची प्रथा उगम पावली. परशुरामाने केलेले मातृवंदन म्हणजेच गोंधळ. परशुरामाने आपल्या अंगावरच्या मळातून मनुष्यकृती निर्माण केली. तिला जिवंत केले; तोच हा गोंधळी. परशुरामाकडून त्याला गोंधळाचा मंत्र मिळाला अशी कथा आहे.
महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाभवानी, तुळजापूरची जगदंबा, माहुरची रेणुकाआई अशी आईची अनेक दैवते आहेत. जगदंबेचे उपासक गोंधळी तिच्या पूजेतून एक गोंधळ उभा करतात. माफक अभिनय आणि सूर-तालातून गोंधळी ‘आख्यान’ लावतात.
पायघोळ अंगरखा, कमरेला उपरणे, डोक्याला लाल पागोटे, गळ्यात कवडयांच्या माळा आणि संबळाच्या तालावर तुणतुणे आणि झांजेचा ठेका देत हे देवीचे भक्त गोंधळ घालतात. सुरेल आवाज, मुद्राभिनय, हलकेसे आणि वाजवी नृत्य हे या लोककलेचे वैशिष्ट्य आहे. आई अंबाबाई ही महाराष्ट्राची कुलदेवता. या अंबेच्या नावाने गोंधळ घालणे हा मराठी माणसाचा कुलाचार. कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, अभिवृद्धीसाठी तसेच विवाहानंतर शुभकार्यात गोंधळ घालण्याची पध्दत आहे.
गोंधळी यजमानांच्या अंगणात आई अंबेच्या स्वरूपात घटस्थापना करतात. संबळ, खंजिरी, झांज, तुणतुणे या वाद्यांच्या तालावर आवाहन करून सर्व देवदेवतांना यजमानांच्या घरी बोलावतात. अंबेचे स्तवन करतात. पुराणातील एखादे आख्यान लावतात. संबळाच्या तालावर चाललेला हा गोंधळ पहाटेपर्यत चालतो.
आपल्या दापोलीत जालगावातील ‘लष्करवाडी’ ही आधी गोंधळेवाडी म्हणून ओळखली जात असे. येथे आजही गोंधळी समाजाची दहा घरे आहेत. त्यांतील गायकवाड घरातील ‘रवींद्र गायकवाड’ हे आजही घराण्याच्या वारसा राखून आहेत. सबंध दापोलीत धार्मिक गोंधळ पूजा सांगणारे ते केवळ एकमेव. आई जगदंबेचा आशीर्वाद आणि आठ पिढ्यांनी सोपवलेला वसा म्हणून ते आपल्या या कार्याकडे बघतात. गोंधळगीतांबद्दल त्यांच्याजवळ विचारणा केल्यास, गोंधळीची वस्त्र परिधान केल्यानंतर व संबळ हाती घेतल्यानंतर अंगात एक शक्ती संचारते व भक्तीची कवन आपोआप मुखातून बाहेर पडतात; असं ते सांगतात. ही कवने आधी कुठेही लिहलेली, वाचलेली, ऐकलेली नसतात. ती त्या गोंधळात जन्माला येतात आणि संपतात, असं त्याचं म्हणणं आहे.
गोंधळ ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि गोंधळगीत हे वाङ्मय. या दोन्ही गोष्टी पुढे अविरत वाहील्या पाहिजेत. त्यात कुठेही अडथळा येता कामा नये. त्याच स्वरूप कुठेही बदलता कामा नये. कारण ही आपल्या संस्कृतीची खरी संपदा आहे.