स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचनेच्या अंतर्गत राज्यांची स्थापना होत होती. त्याच काळात मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाली. डिसेंबर १९५४ मध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाच्या अहवालात महाराष्ट्राला दुजाभाव दिला होता. त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्रापासून तोडल्याने अन्यायाची भावना मराठी जनात निर्माण झाली होती. त्यामुळे या आयोगाच्या विरुद्ध महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला.
या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीर हुतात्मा झाले. या हुतात्म्यांमधील प्रथम हुतात्मा कु. कै. सीताराम बनाजी पवार हे दापोली तालुक्यातील माथे गुजर गावाचे रहिवासी. सीताराम यांच्या आईचे लहानपणीच देहावसान झाले. आईच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्ये (मुरुड येथील लाड) यांनी केला. त्यांच्याच बरोबर ते मुंबईत गेले.
मुंबई मधील फणसवाडी भागात ते राहत असत. ते सहा फूट उंच असून त्यांना इंग्लिश शिकायची आवड होती असे ह्या भागातील रहिवासी त्यांचे वर्णन करतात. इंग्रजी शिकण्याच्या आवडीमुळे ते त्याचे मित्र मनोहर कोचरेकर यांच्यासोबत विल्सन महाविद्यालयात गेले. तेथील संयुक्त महाराष्ट्राच्या चर्चेने ते भारावून गेले. याच दरम्यान एका रात्री कोणीतरी त्यांची चेष्टामस्करी केली त्यावर त्यांनी मी सर्वांच्या स्मरणात राहील असे काहीतरी करेन असे उत्तर दिले.
२१ नोव्हेंबर १९५६ रोजी फाजल अली आयोगाच्या विरुद्ध निदर्शन करण्यासाठी त्यांनी फ्लोरा फाउंटन गाठले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरु केला व कालांतराने आंदोलकांचा आवेश बघून गोळीबाराला सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेण्यासाठी पवार यांनी पोलिसावर झडप घातली.त्याच वेळी त्या पोलिसाने केलेल्या बेछूट गोळीबारात ५ गोळ्या सीताराम यांना लागल्या व ते जागीच खाली कोसळले. त्यांना लगेचच जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
संयुक्त महाराष्ट्रासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सीताराम यांनी सर्वोच्च बलिदान दिले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. त्याच बरोबर फणसवाडीतील रहिवाश्यांनी बालाजी मंदिरासमोर त्यांचे स्मारक उभारले होते. माथे गुजर येथील पवारवाडी येथे या वीर हुतात्म्यांचे मूळ घर आहे. येथील ग्रामस्थांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटे स्मारक उभारले असून तेथील मार्गास कु. कै. सीताराम बनाजी पवार मार्ग असे नाव दिले आहे.
संदर्भ –
१) पहिल्या हुतात्म्याच्या स्मृतींना उजाळा – दै. लोकसत्ता, ०१ मे २०१५
२) Fanaswadi’s forgotten martyr – DNA India
३) माथे गुजर गावातील ग्रामस्थांसोबतचे संभाषण