पहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

Wrangler Paranjpe

0
8166
हिंदुस्थानातील विश्व विद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सिनियर रँग्लर’ हा बहुमान मिळवणारे पहिले भारतीय र.पु.परांजपे म्हणजेच “रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे”.

रँग्लर पदवी म्हणजे काय?

पूर्वी केंब्रिज विद्यापीठात गणित विषयाच्या अंतिम परीक्षेत पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यास रँग्लर म्हणून घोषित केले जाई. रँग्लर म्हणून सर्वप्रथम येणाऱ्यास सिनियर रँग्लर म्हटले जाई. र.पु.परांजपे १८९९ मध्ये सिनियर रँग्लर म्हणून परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा लेखी नसून तोंडी असतं. परीक्षार्थी विद्यार्थ्यास तिपाई स्टूलावर बसविले जायचे म्हणून या परीक्षांना ‘ट्रायपॉस’ परीक्षा असे नाव पडले. प्रश्नकर्ते प्राध्यापक समोर खुर्चीवर बसून अत्यंत कठीण प्रश्न विचारून विद्यार्थ्यास जेरीस आणत व ज्ञानाची खरी कसोटी घेत. सिनियर रँग्लर विद्यार्थ्यास पुढे अनेक सन्मान व सवलती मिळत. अशा विद्यार्थ्याचे पुढचे शिक्षण खास सुविधांसह होत असे, त्याला कोलेजची फेलोशिप मिळे, विद्यापीठात चांगले पद तसेच पुस्तक लिहण्याचे आमंत्रण मिळे. कालांतराने लेखी परीक्षा सुरु झाल्या.

र.पु.परांजपे यांचा जन्म दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळच्या मुर्डी या गावी १६ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे वडील पुरुषोत्तम  पंत दशग्रंथी ब्राह्मण होते. बुद्धिमत्तेचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. र.पु हे तेरा भावंडापैकी सातवे. भारतरत्न कर्वे व रँग्लर परांजपे ही आत्ये मामे भावंडं. कर्वेंनी र.पु. ना शिक्षणाखातर भरपूर मदत केली. र.पु.चे प्राथमिक शिक्षण आंजर्ले, मुरुड, दापोली येथे झाले व उच्चशिक्षण मुंबई, पुणे येथे. त्यांनी बी.एस.सी. सर्व पारितोषिकासह पास केलेली.

त्यांच्या उज्ज्वल कामगिरीमुळे त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व ते इंग्लंडला गेले. १८९९ साली भारतातील पहिले ‘रँग्लर’ म्हणून इंग्रज सरकार तर्फे त्यांचा बहुमान झाला.

१९०२ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांना फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पद मिळाले. दहा वर्षे ते या पदावर होते. १९१३ साली मुंबई कायदेमंडळाचे सरकारी नियुक्त झाले. १९१४ मध्ये पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले. ( ३ वर्ष पदावर ) १९१६ ते १९२० विधिमंडळात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना सदस्यत्व मिळाले. १९२१ साली त्यांची मुंबईचे शिक्षण व आरोग्यमंत्री म्हणून शासनाकडून नियुक्ती झाली ( १९२३ पर्यंत ). १९२७ मध्ये वनविभाग, सहकार व कृषिविभागाचे मंत्री ( ६ महिने पदावर ) म्हणून कार्यरत होते. १९२७ ते १९३२ पर्यंत लंडनमधील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य त्यांना मिळाले. १९३२ साली लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू ( ६ वर्ष ) आणि १९४४ ते १९४७ पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे उच्चायुक्त झाले. १९४९ साली चेन्नई मधल्या ‘भारतीय बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे’ संस्थापक व अध्यक्ष ही ते झाले. १९५८ मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ( ३ वर्ष ) झाले.

बुद्धिवादी, कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांचा लौकिक होता. गोपाळ कृष्ण गोखल्यांना ते आपले गुरु मानीत. त्यांचे मोडी हस्ताक्षर फार सुंदर, सुरेख होते. १९३८ साली त्यांनी आपल्या जन्मगावी शाळा सुरु केली. त्याचे नाव ‘गोपाळ कृष्ण गोखले’ स्कूल ठेवले. त्याच शाळेत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे ग्रंथालय देखील सुरु केले.


वाचा: दापोलीतील मोडी लिपी जाणकार ‘तेजोनिध रहाटे’ बद्दल


दापोलीच्या रस्त्यांवरून चालताना पटापट गणित सोडवत जाणारा मुलगा, जो पुढे गणिततज्ञ व शिक्षणतज्ञ झाला, ‘सिनियर रँग्लर’ हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय ठरला. 

संदर्भ –
प्रा. डॉ. विजय अनंत तोरो ( परिचित अपरिचित दापोली तालुका )
स्वातंत्र्य सैनिक स्मरणिका जि. रत्नागिरी, सिंधुदुर्ग

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here