भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला नायक

0
3608

‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवून दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला. २००९ साली आलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमातून फाळकेंचा पहिल्या चित्रपटाचा प्रवास कसा घडला? हे आपण पहिले असेलच. नाटकाच्या बहारदार काळात चित्रपटासाठी नट मिळवताना फाळकेंना मोठी खटाटोप करावी लागली. पण इतर पात्रांसाठी फाळकेंची जेवढी दमछाक झाली, तेवढी हरिश्चंद्रासाठी झाली नाही. फाळकेंना त्यांच्या चित्रपटाचा नायक लगेच मिळाला होता आणि ते होते श्री. दत्तात्रय दामोदर दाबके.

दाबकेंचा जन्म १८८५ मध्ये झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद हे त्यांचे मूळ गाव. शाळेच्या वयातच त्यांनी दणकट शरीर कमावण्यासाठी घर सोडून थेट बनारस गाठले. तेथे कुस्त्या मारता मारता हिंदी आणि उर्दू शिकले. याच काळात त्यांनी उर्दू नाटकांमध्ये कामे केली. नाटकांमध्ये कामे करण्याच्या निमित्ताने ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांना दादासाहेब फाळकेंची मूकपट काढण्याची खटपट समजली. नाटकाचा विचार सोडून ते फाळकेंना भेटले. फाळकेंनी त्यांची उत्तम देहयष्टी पाहून मुख्य नायकाची ‘हरिश्चंद्राची’ भूमिका त्यांना दिली. त्यासोबतच फाळकेंच्या लक्षात आले की दाबके यांच्यामध्ये दिग्दर्शनाची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) म्हणून नेमले. दाबकेंनी दिग्दर्शन आणि छायालेखन (Cinematography) या दोन्ही क्षेत्रात फाळकेंच्या हाताखाली पाच वर्षे उमेदवारी केली. दाबके चित्रपटात इतके रमले की, त्यांनी लंकादहन(१९१७), सत्यवादी राजा हरिश्चंद्र (१९१८), श्रीकृष्णजन्म (१९१८), दिलफरोष, हुस्नका डाकू, विमला या चित्रपटांमधून कामे केली. काही काळानंतर त्यांनी फाळकेंची साथ सोडली आणि १९२२ साली द्वारकादास संपत यांच्या कोहिनूर फ्लिम कंपनीत दिग्दर्शक आणि छायालेखक म्हणून नोकरी धरली. त्यावेळी द्वारकादास संपत यांच्या ‘विश्वामित्र मेनका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यात मुख्य नायकाची भूमिकाही त्यांनीच साकारली होती. नंतर ते छायाचित्रण ( Photography) व्यवसायाकडे वळले. मामा वरेरकर यांच्या ‘पुण्यावर हल्ला’ (१९२४) आणि भालजी पेंढारकर यांच्या ‘वंदे मातरम आश्रम’ (१९२६) या चित्रपटांचे छायाचित्रण त्यांनी केले. नट म्हणून आलेल्या दाबकेंनी पुढे एक उत्तम छायाचित्रकार म्हणून नाव कमावले. ट्रिक फोटोग्राफी यात त्यांचा विशेष हातखंडा होता. मूकपटांच्या जमान्यात त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे छायाचित्रण केले. मराठी – हिंदी चित्रपटाचे पुढील काळातील प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग नाईक यांनी दाबके यांच्या हाताखालीच छायाचित्रणाचे धडे घेतले. १६ डिसेंबर १९४६ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचा हा पहिला नायक काळाच्या पडद्या आड गेला.

संदर्भ

  • आधुनिक महाराष्ट्र जडणघडण शिल्पकार चरित्रकोश ( चित्रपट – संगीत ) – श्रीराम ताम्रकर
  • परिचित – अपरिचित दापोली – डॉ. विजय अनंत तोरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here