दापोलीचे विद्यामहर्षी – महर्षी कर्वे

0
2716

Maharshi Karve

दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हायला  हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नररत्न, अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे. त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’, महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा.’

कर्वेंचं मूळ जन्मस्थान त्यांच आजोळ शेरवली; पण अण्णांच बालपण वाढलं ते दापोलीतल्या मुरुडच्या अंगाखांद्यावर खेळून. मुरुडच्याच सरकारी शाळेमध्ये त्यांच प्राथमिक शिक्षण झालं. अण्णा लहानपणापासूनच हुशार, बुद्धिमान आणि आज्ञाधारी होते. शिवाय सुस्कांराबरोबर रामविजय , हरिविजय, शिवलीलामृत हे वाचण्याचा दररोज घरी परिपाठ असल्यामुळें अण्णाची वाणी खणखणीत शुद्ध आणि स्पष्ट होती. मुरुडमधील लोकांना सार्वजनिक प्रश्नांची माहिती करून देण्यासाठी गुरुजींच्या सांगण्यावरून ते सायंकाळी पाच वाजल्यापासून दिवे लागणीपर्यंत तेथील दुर्गा मंदिरात बसून वर्तमानपत्र वाचीत असत. कमावते झाल्यानंतर अण्णांनी पुढाकार घेऊन याच मंदिराची कुजून गळू लागलेली रिफ बदलून घेतली. त्यांच्या प्रतिभाशाली, कर्तबगार आयुष्याची चणी खऱ्या अर्थाने येथूनच उभी राहिली. मुरुड गावावर त्यांचे फार प्रेम असल्यामुळे मुरुड फ़ंडामार्फत ग्रामविकासासाठी जमेल तेवढे प्रयत्न त्यांनी केले.

पहिली पत्नी राधाबाई सोबतचा सुखी संसार अण्णांनी या मुरुडमध्येच केला. र. धो चां जन्म देखील येथेच झाला. (र. धो  म्हणजे अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव – रघुनाथ धोंडो कर्वे). राधाबाईंच्या मृत्यूपश्चात अण्णांनी विधवेशी केलेला पुनर्विवाह संपूर्ण महाराष्ट्रासकट मुरुडलाही अमान्य ठरला. हेचं काय ते दुर्दैव. पुढे अण्णांची कर्मभूमी पुणे राहिली आणि संपूर्ण आयुष्याची वाटचाल केवळ स्त्री शिक्षण आणि स्त्री उद्धारासाठी राहिली.


वाचा: रघुनाथ धोंडो कर्वें बद्दल


भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने अण्णांच्या कार्याला गौरवांकित करण्यात आल्यानंतर त्यांचा त्या वर्षीचा जन्मशताब्दीचा कार्यक्रम मुरुड गावात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सेनापती बापट यांनी अण्णांच्या उपस्थितीत अण्णांच्या पुतळ्याच  अनावरण केलं. त्या कार्यक्रमाने अण्णा तर गदगद झालेच पण संपूर्ण मुरुड आणि दापोली तालुकाही गदगद झाला.

आज अण्णांच्या मागे मुरुड त्यांचे पुण्यस्मरणं करीत फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे कार्य करीत आहे. आज मुरुडमध्ये त्यांच्या नावाने चालणारी शाळा, ग्रंथालय आणि वझे कुटूंबियांनी उभारलेलं  त्याचं स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे मुरुड आणि दापोली खरोखर इतिहास पावन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here