चंद्रनगरची स्वयंभू घाणेकरीन देवी

0
2183

दापोली शहरापासून अगदी थोडक्या अंतरावर चंद्रनगर हे गाव आहे. दापोली – बुरोंडी रस्त्यालगत असलेल्या चंद्रनगर गावात मुख्य रस्त्याला लागूनच स्वयंभू घाणेकरीन देवीचे सुंदर मंदिर आहे. सन २०१७ मध्ये जीर्णोद्धार झालेले हे मंदिर भव्य व प्रशस्त असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान आहे. गावातील तरुणाईने अपार मेहनत करुन सध्याचे हे सुंदर व गावाच्या सौंदर्यात मोलाची भर घालणारे मंदिर साकारले आहे. सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपुर्वी घाणेकरीन देवीचे मंदिर अस्तित्वात आल्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीच्या काळातील श्री देवी घाणेकरीन मंदिर हे झोपडीसदृश व गवताने शाकारलेले होते. मंदिराच्या भिंती माडाच्या झावळ्यांच्या कुडाच्या होत्या असे गावातील जाणकार सांगतात. गवतारु मंदिरास दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आग लागून दरवर्षी या मंदिराचे नुकसान होत असे. दरवर्षीच्या या नुकसानावर उपाय शोधताना सुमारे साडेतीनशे वर्षांपुर्वी दगडी व लाकडी खांब असलेले, मातीच्या भिंतीचे व कौलारु छप्पर असलेले मंदिर बांधण्यात आले होते. त्यानंतर सन २०१७ सालात श्री देवी घाणेकरीन मंदिराचा जीर्णोद्धार होऊन सध्याचे भव्य व प्रशस्त मंदिर साकारले आहे.

www.talukadapoli.com – Chandranagar Ghanekarin Devi


श्री देवी घाणेकरीन स्वयंभू देवस्थान आहे. घाणेकरीन देवीची काळ्या दगडाची मूर्ती अतिशय पुरातन आहे. मूर्ती सुबक व रेखीव असून अस्र व आयुधांनी सज्ज आहे. गाभाऱ्यातील इतर मूर्तीही अशाच पुरातन व उभ्या स्थितीत आहेत. घाणेकरीन देवीची पाषाणी मूर्ती दगडी असल्याने व ती प्राचीन असल्याने ती कालौघात तशीच टिकून रहावी यासाठी गाभाऱ्यातील सर्वच स्वयंभू व पाषाणी मूर्तींवर वज्रलेप करण्यात आला आहे. नंदुरबार येथील एका कारागिराने सतत चार दिवस काम करून हा वज्रलेप केला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करताना घाणेकरीन देवी व इतर देवतांसाठी एक चौथरा बांधून त्या चौथऱ्यावर सर्व मूर्तींची पुनर्रस्थापना करण्याचे नियोजित होते. मात्र घाणेकरीन देवीचे स्वयंभू पाषाण अनेक प्रयत्न करुनही जागचे हलले नाही. त्यामुळेच सध्याच्या मंदिरातही श्री देवी घाणेकरीन तिच्या आधीच्या जागीच विराजमान आहे. घाणेकरीन देवीचे सध्याचे मंदिर आर.सी.सी. प्रकारातील असून ते मजबूत व अतिशय सुंदर आहे. प्रवेशद्वार, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना असून गाभाऱ्याभोवती प्रशस्त प्रदक्षिणा मार्गही आहे. मंदिरात गोलाकार व चौकोनी खांब असून गाभाऱ्यावर उंच कळस आहे. कळसावर सुंदर नक्षीकाम असून देवदेवता व संतमंडळींची शिल्पचित्रे कोरली आहेत. मंदिराचा सभामंडप अतिशय विस्तीर्ण असून याच सभामंडपात अखंड हरिनाम सप्ताह, भजन, किर्तन, कोजागरी पौर्णिमा शिमगोत्सव यांसारखे सण व उत्सव दरवर्षी साजरे होतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीमंडप असून तेथूनच मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिरातच श्री देव चक्रातदेवाचा एक घुमट असून तो घाणेकरीन देवीचा मुख्य पहारेकरी आहे.

www.talukadapoli.com – Chandranagar Ghanekarin Devi

गाभाऱ्यात श्री देवी घाणेकरीन देवीचे स्वयंभू पाषाण असून शेजारी श्री देवी महामाई, श्री देवी मानाई यांच्याही पाषाणी मूर्ती आहेत. याशिवाय श्री देव भैरी, श्री देव बापदेव, श्री देवी जोगेश्वरी, श्री देव लिंगायतदेव ही दैवतेही गाभाऱ्यात प्रतिष्ठापित आहेत. आहेत. मंदिर परिसरात चंद्रनगर गावातील मुलूख भावकीची श्री देवी वाघजाई व मिसाळ भावकीची श्री देवी कालिका उर्फ काळकाई यांची देवस्थाने आहेत. मंदिराच्या बाहेरच्या आवारात फरसबंदी असून घाणेकरीन देवीची पालखी ठेवण्यासाठी सहाण बांधली आहे. याच सहाणेवर पालखीची विधिवत पूजा करून घाणेकरीन देवीच्या शिमगोत्सवाची सांगता होते.


काही वर्षांपुर्वीपर्यंत मंदिराचा परिसर निर्जन व दुर्गम होता. त्या काळात गावात पटेरी वाघाचा दिवसाढवळ्याही संचार असे. मात्र हे पटेरी वाघ घाणेकरीन देवीच्या परवानगीनेच गावातील एखाद्या प्राण्याची शिकार करीत असत असे सांगितले जाते. एखाद्या दिवशी शिकार न मिळाल्यास वाघ मंदिराच्या पायरीवर शेपटी जोरजोरात आपटत डरकाळी फोडत असे. मात्र आता येथे पटेरी वाघाचे अस्तित्व दिसत नाही. घाणेकरीन देवीच्या मंदिरात दरवर्षी शिमगोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागरी पौर्णिमा, अखंड हरिनाम सप्ताह यांसारखे उत्सव साजरे होतात. सण व उत्सव काळात घाणेकरीन देवीला सोने व चांदीच्या रुप्यांनी मढवतात. सर्वच दैवतांना चांदीचे मुखवटे चढवून त्यांना सजविण्यात येते. सोन्या – रुप्याने मढवलेल्या देवीचे रुप उत्सव काळात अतिशय लोभस व प्रसन्न दिसते. घाणेकरीन देवीच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून होते. घटस्थापनेपासून दररात्री प्रत्येक वाडी मंदिरात आपापला कार्यक्रम साजरा करून देवीचा जागर करते. गावात एकूण नऊ वाड्या असून आळीपाळीने प्रत्येक वाडीकडून देवीचा जागर केला जातो. भजन, किर्तन, जाखडीनृत्य व दांडीयानृत्य यांसारखे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करून देवीचा जागर केला जातो. विजयादशमीदिवशी घाणेकरीन मंदिरात सर्व गावकरी व भाविक जन एकत्र जमून सर्व देवतांना सोने वाटतात. याच दिवशी घाणेकरीन देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते.

www.talukadapoli.com – Chandranagar Ghanekarin Devi


घाणेकरीन देवी व चंद्रनगर गावचा पारंपारिक शिमगोत्सव प्रसिद्ध असून अनेक भाविकजन या शिमगोत्सवाचा आनंद घेतात. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून देवीच्या शिमगोत्सवास सुरुवात होते. शिमगोत्सव काळात दोन पालख्या गावात फिरतात. एका पालखीत श्री देवी घाणेकरीन, श्री देवी महामाई व श्री देवी मानाई यांच्या चांदीच्या मूर्ती पालखीत प्रतिष्ठापित करून पालखीला सजविण्यात येते. दुसर्‍या पालखीत मुलूख भावकीची श्री देवी वाघजाई व मिसाळ भावकीची श्री देवी कालिका यांच्या चांदीच्या मूर्ती प्रतिष्ठापित करून दोन्ही पालख्या सोबतच गावात फिरतात. पुर्वी घाणेकरीन देवीच्या पालख्या मुरुड, हर्णे गावापर्यंत फिरत असत. मात्र आता ती प्रथा बंद केली असून या पालख्या शिमगोत्सव काळात फक्त चंद्रनगर गावातच फिरतात. पालख्यांसोबत असलेला तमाशासदृश गोमूचा नाच हे चंद्रनगर येथील शिमगोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. गावातील सुशिक्षित, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुणही कोणतीही लाज न बाळगता राजस्थानी स्रीवेशात तमाशातील पारंपारिक गीतांवर पारंपारिक नृत्य करतात. या कार्यक्रमात कोणतीही भडक, उडती गाणी नसतात. रामायण व महाभारतातील कथानकांवर आधारित पारंपारिक गीतांवर हे आगळेवेगळे नृत्य केले जाते. सध्याच्या आधुनिक काळातही जपलेला हा पारंपारिक वारसा पाहण्यासाठी अनेक रसिक चंद्रनगर येथील शिमगोत्सवास भेट देतात. शिमगोत्सव आटोपल्यावर दुसर्‍याच दिवशी घाणेकरीन मंदिरात ‘ आरधान ‘ हा महाप्रसादाचा विधी असतो. विशेष म्हणजे हा महाप्रसाद मांसाहाराचा असतो. यावेळेस देवीलाही मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो.

www.talukadapoli.com – Chandranagar Ghanekarin Devi


श्री घाणेकरीन देवी स्वयंभू देवस्थान असल्याने तिची किर्ती सर्वदूर पसरली आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने हजारो भाविक घाणेकरीन देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गावातील माहेरवासिनी उत्सव काळात घाणेकरीन देवीची ओटी भरून कौटुंबिक सौख्यासाठी प्रार्थना करतात. श्री घाणेकरीन देवीच्या देवस्थानाची व्यवस्था पाहण्यासाठी आता देवस्थान समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावातील सर्व ग्रामस्थ व भक्तजन परस्पर सामंजस्याने व एकजुटीने श्री घाणेकरीन देवीचे सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here