नवरात्री विशेष – कोंगळे येथील स्वयंभू श्री देवी सताई

0
2069

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीकाठावर कोंगळे हे गाव वसले आहे. दोन डोंगरांच्या कुशीत हे गाव वसले असल्याने या गावात प्रवेश करण्यासाठी दोन्ही बाजूनी तीव्र उताराच्या रस्त्याने जावे लागते. मात्र उतरण उतरत असतानाच या नयनरम्य गावाचे दुरून दर्शन होते. हे गाव असे दुरुन बघताना एखाद्या चित्रपटातल्या किंवा एखाद्या निसर्गचित्रातल्या गावासारखेच खूप सुंदर दिसते. पावसाळ्यात तर या गावाचे सुंदर रुपडे बघणाऱ्याला मोहवून टाकल्याशिवाय राहत नाही. दापोली शहरपासून हे गाव साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे. दापोली – बांधतिवरे – ताडील मार्गे कोंगळे गावात प्रवेश करता येतो. गावापर्यंत डांबरी सडक असल्याने सडक खाच खळग्यांची असली तरी कोणत्याही वाहनाने गावात पोहोचता येते. याशिवाय आंजर्ले – सुकोंडी – सातांबा या मार्गानेही कोंगळे गावात जाता येते.

Taluka Dapoli Kongele Devi Satai T

कोंगळे गावाच्या मुख्य वस्तीपासून दूर व निबिड अरण्यात प्रसिद्ध श्री देवी सताईचे मंदिर आहे. आंजर्ले- सुकोंडी – सातांबा या मार्गाने साध्या डांबरी रस्त्याची तीव्र उतरण उतरताना कोंगळे गावातील मुख्य वस्ती सुरु होण्याआधी रस्त्यालगतच हे सताई देवीचे मंदिर आहे. श्री देवी सताई हे स्वयंभू देवस्थान असून भक्तांच्या नवसास पावणारी व हाकेस धावणारी देवी अशी श्री देवी सताईची विशेष ओळख आहे. मंदिरातील गाभाऱ्यात श्री देवी सताईची काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती असून तिला सणासमारंभांच्या दिवसांत सोन्याच्या व चांदीच्या रुप्यांनी मढविण्यात येते. चांदीचा मुखवटा, सोन्या – चांदीचे अलंकार व साडी चोळी नेसवून सजविलेल्या श्री देवी सताईचे रुप मढविल्यावर अतिशय सुंदर व मोहक दिसते.

श्री देवी सताईचे सध्याचे मंदिर आधुनिक व आर.सी.सी. असून विविध कलाकुसर व नक्षीकामाने सजविले आहे. दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीस श्री देवी सताईचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो. सताई देवीची किर्ती सर्वदूर पसरली असल्याने हे देवस्थान अतिदुर्गम भागात असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भक्तजन या दिवशी श्री देवी सताईच्या दर्शनासाठी येतात. आंजर्ले परिसरातील अनेक घराण्यांचे श्री देवी सताई हेच कुलदैवत आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी सर्वदूर स्थायिक झालेली सताई देवीची हजारो लेकरे वर्षभरात व वार्षिक जत्रोत्सवात सताई देवीच्या भेटीला येऊन देवीसमोर नतमस्तक होतात. श्री देवी सताई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन सध्याचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. हा जीर्णोद्धार सन २०१२ मध्ये करण्यात आला आहे. जीर्णोद्धार होण्यापुर्वीचे सताई देवीचे मंदिर लाकडी, दगडी खांबांचे व कौलारु छप्पराचे होते. सताई देवीचा महिमा पाहून स्वतः पेशव्यांनी श्री देवी सताईचे पुरातन मंदिर बांधल्याचे कोंगळे गावातील जाणकार ग्रामस्थ सांगतात. पेशवेकालीन मंदिराची धाटणी तीच ठेवून आधुनिक स्वरुपात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. प्रवेशद्वार, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची स्थापत्यरचना असून गाभाऱ्यावर उंच व आकर्षक कळस आहे. गाभाऱ्याभोवती स्वतंत्र व प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असून सताई देवीचे मंदिर खूप भव्य आहे. दोन उपगाभारे असून त्यांच्यावरही छोटे कळस आहेत. सताई देवीच्या मंदिरास एकूण सव्वीस खांब असून पाच दरवाजे व आठ खिडक्या आहेत.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान असून तिथेच जय विजय हे द्वारपाल उभे केले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील हे जय विजय पाहिले की दक्षिण कोकणातील काही प्रसिद्ध मंदिरे डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाहीत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून येथेच देवीची महाआरती, भजन, किर्तन, जाखडीनृत्य यांसारखे विविध कार्यक्रम होतात. गाभाऱ्यात श्री देवी सताईची स्वयंभू पाषाणी मूर्ती आहे. याशिवाय गाभाऱ्यात श्री देवी मानाई, श्री देवी झोलाई, श्री देवी काळेश्री, श्री देवी जाखमाता, श्री देवी वाघजाई, श्री देव चटकोबा, श्री देव हनुमंत यांच्याही तशाच पुरातन व प्राचीन पाषाणी मूर्ती आहेत. आंजर्ले येथील काही ब्राह्मण घराणी ही श्री देवी सताई देवस्थानाचे प्रमुख मानकरी आहेत. श्री सताई देवी हे कोंगळे गावचे ग्रामदैवत असून सर्व ग्रामस्थ भक्ती भावाने देवीच्या उत्स्तवात सहभागी होतात.

शिमगोत्सव, नवरात्रोत्स व वार्षिक जत्रोत्सव यांसारखे प्रमुख उत्सव दरवर्षी सताई देवीच्या मंदिरात साजरे होतात. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीस पहिली होळी पेटवून कोंगळे येथील श्री देवी सताईच्या शिमगोत्सवास सुरुवात होते. सताई देवीने कौल दिल्यावर सताई देवीची पालखी कोंगळे व आंजर्ले गावात फिरते. सताई देवीबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत नितांत श्रद्धा असल्याने आंजर्लेवासिय सताई देवीच्या पालखीची मोठ्या श्रद्धेने वाट पाहत असतात. आंजर्ले येथील काही प्रमुख मानकरी असलेल्या ब्राह्मण घराण्यांच्या भेटीसाठी श्री देवी सताईची पालखी रात्रभर आंजर्ले गावात फिरते. पहाटे सताई देवीची पालखी आंजर्ले गावातून परत निघताना ताडाचा कोंड परिसरात सताई देवीच्या पालखीसमोर पारंपारिक टीपरीनृत्य होते. हे टीपरीनृत्य खूप प्रसिद्ध आहे. हे टीपरीनृत्य पाहण्यासाठी पहाटेच्या वेळी शेकडो लोक येतात. पालखी परत सताई देवीच्या मंदिरात आल्यावर पहाटेस होम पेटविला जातो. फाल्गुन द्वादशीस शिमगोत्सव काळात सताई देवीच्या पालखीचा ‘ शेरणे ‘काढण्याचा कार्यक्रम खूप प्रसिद्ध आहे. सायंकाळी पालखी सजवून शेरणे काढण्याचा हा थरारक व रोमांचक सोहळा पार पडतो. याच वेळेस देवीचे काही मानकरी देवीची तरवार पोटावर आपटतात. हा दरवर्षीचा कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमातील थरार व रोमांच कयम आहे. हा थरार पाहण्यासाठी आंजर्ले, दापोली शहरातून शेकडो लोक कोंगळे येथे जातात. सताई देवीच्या मंदिरातच दरवर्षी शिमगोत्सवाची सांगता होते.

मंदिराच्या आवारात बांधलेल्या सहाणेवर देवीची पालखी ठेवून दरवर्षी विधिवत पूजा केली जाते. नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून मंदिरात नवरात्रोत्सव सुरु होतो. सताई देवीच्या मंदिरात घटस्थापना करून घटावर दरदिवशी माळ चढवली जाते. नवरात्रोत्सव काळात दरवर्षी सालाबादप्रमाणे ठरवून दिलेली वाडी आळीपाळीने मंदिरात जागर व घटाची रखवाली करते. दररात्री मंदिरात भजन, किर्तन,जाखडीनृत्य यांसारखे पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात. विजयादशमी व कोजागरी पौर्णिमेस सताई देवीच्या मंदिरात रात्री इतर कार्यक्रमांबरोबरच दांडीया नृत्यही होते. या नृत्यात सगळे गावकरी सहभागी होतात. नवरात्रोत्सव काळात पंचक्रोशीतील अनेक माहेरवासिणी मंदिरात येऊन सताई देवीची ओटी भरून जातात. या काळात देवीसमोर नवसही केले जातात. नवसाला पावणारी अशी सताई देवीची किर्ती असल्याने दुरदूरचे भक्तजन नवरात्रोत्सव काळात सताई देवीच्या दर्शनासाठी येतात. सताई देवीचे मंदिर व कोंगळे गाव अतिदुर्गम असल्याने दुरवरून येणाऱ्या भक्तजनांसाठी मंदिराच्या आवारात भक्तनिवास ( धर्मशाळा ) बांधण्यात आला आहे. या भक्तनिवासात प्राथमिक व मुलभूत सुविधा उपलब्ध असून दुरवरच्या भक्तजनांसाठी एका दिवसासाठीची चांगली निवासव्यवस्था उपलब्ध झाली आहे. सताई देवीचा संपूर्ण परिसर हा वनराईने नटलेला असून मंदिराजवळच एक बारमाही वाहता झरा आहे. याच झऱ्याचे पाणी टाकीत साठवून निवासी भक्तांसाठी ते उपलब्ध करुन देण्यात आले आहे. श्री देवी सताई मंदिराजवळच एक पेशवेकालीन शीवमंदिरही आहे.

पुरातन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेल्या ह्या शिवमंदिराची योग्य देखभाल नसल्याने काही ठिकाणी थोडी पडझड झाली आहे. मंदिराभोवती जंगली झूडूपे वाढल्याने हे मंदिर जवळच असले तरी पटकन दृष्टीस पडत नाही. प्रवेशद्वार, न॔दीमंडप व गाभारा अशी या मंदिराची पुरातन रचना आहे. गाभाऱ्यात श्री देव रामेश्वराचे शिवलिंग आहे. शिवमंदिरात एक रेखीव, सुबक, पुरातन दगडी श्रीगणेशमूर्तीही आहे. हे शिवमंदिर पाहिले की, येथील परिसर पुर्वी समृद्ध व सधन असल्याची खात्री पटते. सताई देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर या मंदिरास अवश्य भेट द्यावी इतके हे सुरेख शिवमंदिर आहे.

अद्भुत निसर्गसौंदर्य, दाट वनराई, पशुपक्ष्यांची किलबिल आणि स्वयंभू श्री देवी सताईचा महिमा अशा अनेक कारणांसाठी दरवर्षी वार्षिक जत्रोत्सव, नवरात्रोत्सव व शिमगोत्सव काळात हजारो भक्तजन सताई देवीच्या मंदिरास भेट देऊन श्री देवी सताईपुढे नतमस्तक होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here