नवरात्री विशेष – टेटवलीची श्री देवी महामाई

0
1299

दापोली शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर टेटवली नावाचे गाव आहे. टेटवली हे गाव वाकवली या मध्यवर्ती ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकवली – उन्हवरे या मार्गावर वसले आहे. मुख्य हमरस्त्त्याच्या दुतर्फा वसलेले टेटवली हे गाव नितांत सुंदर व निसर्गरम्य असून कोणाच्याही अगदी पाहताक्षणी नजरेत भरावे असेच आहे. या गावात मुख्य रस्त्यालगतच या गावाचे मुख्य ग्रामदैवत असलेल्या श्री देवी महामाईचे मंदिर आहे.

श्री देवी महामाईचे सध्याचे मंदिर पक्के व आर. सी. सी. प्रकारातील भक्कम बांधणीचे असले तरी या देवीचे आधीचे मंदिर पुरातन व प्राचीन होते. टेटवली गावात आज ज्या भागात मुस्लिम बांधवांचा मोहल्ला आहे, त्याच भागात पुर्वी हे प्राचीन महामाई मंदिर होते असे येथील ज्येष्ठ व बुजुर्ग ग्रामस्थ सांगतात. द्रविड राजांच्या सत्ताकाळात हे प्राचीन मंदिर बांधण्यात आल्याचीही माहिती मिळते. पूर्वी या ठिकाणी मुस्लीम मोहल्ला नव्हता. या भागातील मूळ रहिवासी असलेले म्हसकर कुटुंबिय या मंदिराची पूजाअर्चा व देखभाल करीत होते असे जाणकार सांगतात. त्यानंतर शेकडो वर्षांनी हा परिसर आदिलशाही, कुतुबशाही व मुघलशाहीच्या अंमलाखाली गेला आणि या भागातील मुस्लिम मोहल्ला अस्तित्वात आला असल्याची माहिती आहे. त्यानंतरच्या काळात मुस्लिम बांधवांच्या दैनंदिन दिनक्रमात अडचण येऊ नये यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी सर्वानुमते व सामोपचाराने येथील प्राचीन महामाई देवीचे मंदिर गावालगत असलेल्या देवराई परिसरात हलविण्यात आले. आधीच्या पुरातन व प्राचीन मंदिराच्या द्रविडी स्थापत्यशैलीप्रमाणेच देवराई येथे महामाई मंदिर बांधण्यात आले. जांभ्या दगडाचे मजबूत बांधकाम, कौलारु व टुमदार मंदिर अतिशय रमणीय व सुंदर असेच होते.

देवराई येथील निसर्गरम्य स्थळातील या मंदिराचा जीर्णोद्धार सन २०१२ मध्ये करण्यात आला आणि आधीच्या मंदिराच्या जागेवर हे मजबूत व सुबक मंदिर उभे राहिले आहे. आर. सी .सी प्रकारातील श्री देवी महामाई मंदिराची रचना व बांधकाम अतिशय सुबक व सुरेख आहे. प्रवेशद्वार, सभामंडप, गाभारा व प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या गाभाऱ्यावर मुख्य उंच कळस असून सभामंडपावरही एक कळस आहे. मंदिराच्या सभोवताली दगडी फरसदारी आहे. महामाई मंदिराच्या गाभाऱ्यात पाच प्रमुख देवतांच्या पुरातन व प्राचीन पाषाणी मूर्ती आहेत. या पाचही मूर्ती एका रांगेत स्थानापन्न असून मध्यभागी महामाई देवीची मूर्ती आहे. सर्व मूर्ती उभ्या स्थितीत असून शस्रास्रांनी सज्ज आहेत. श्री देव सोमय्या, श्री देवी काळेश्री, श्री देवी महामाई, श्री देवी मानाई, श्री देवी धाकटी काळकाई अशा या मूर्ती आहेत.

taluka dapoli te

महामाई मंदिरात दरवर्षी विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. पुर्वी महामाईची पालखी मुस्लिम मोहल्ल्यातही फिरत असे. काही मुस्लिम बांधव महामाईच्या पालखीपुढे नवसही करत व फेडत असत. आता गेल्या काही वर्षांपासून ही पालखी मुस्लिम मोहल्ल्यात फिरत नाही. मात्र दरवर्षी साजरा होणारा शिमगोत्सव टेटवली गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या देवराई परिसरात असलेल्या या श्री देवी महामाई मंदिराबाबत असेही सांगितले जाते की, सुमारे दीडशे वर्षांपुर्वी श्री देवी महामाई मंदिरातील मूर्तींची परकीय आक्रमणात विटंबना होऊ नये यासाठी या सर्व प्राचीन पाषाणी मूर्ती देवराईसारख्या निर्जन व निबिड जंगलातील एका विशाल नांदरुखाच्या झाडाच्या ढोलीत सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ” मला याच जागेत कायमचे राहायचे आहे. माझे मंदिर इथेच बांधा.” असा साक्षात महिमाई देवीने साक्षात्कार व कौल दिल्याने याच देवराईत श्री देवी महामाईचे मंदिर बांधण्यात आले. पुर्वी ही देवराई खूप दाट व गच्च होती. आता कालौघात या देवराईतील अनेक जुनाट वृक्ष नामशेष झाले आहेत. पुर्वीच्या नांदरुखाच्या झाडाजवळच सध्याचे मंदिर बांधले असून गाभाऱ्यातील सर्व मूर्ती मात्र त्याच पुरातन व प्राचीन ठेवा म्हणून मोठ्या श्रद्धेने जीर्णोद्धारीत मंदिरात प्राणप्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.
श्री देवी महामाई मंदिराचे पुजारी दत्तात्रय सदाशिव नानटेकर असून तेच वडिलोपार्जित वारश्याने मंदिरातील सर्व दैवतांची पूजाअर्चा करतात. देवीला कौल लावण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. देवीचा कौल घेतल्याखेरीज दरवर्षी गावात पालेजत्रा व लागवट लागत नाही. शिमगोत्सवातही देवीचा कौल मिळाल्यावरच देवीची पालखी गावात फिरण्यासाठी बाहेर पडते. देवीला कौल लावण्यासाठी देव्हाऱ्याच्या कळ्या किंवा पुरुष जातीच्या पपईच्या फुलांचे कळे लावतात. देवीला कौल लावण्याचे काम पाटीलही करतात. देवीचा कौल घेतल्याखेरीज गावात भाजण, लाकूडफाटा, कवळतोडणी, पालेजत्रा यांसारख्या कामांची सुरुवात करीत नाहीत.

नवरात्रोत्सव , शिमगोत्सव व गणेशोत्सव काळात श्री देवी महामाई व इतर देवतांना रुपे चढवून सजवतात. रुपे लावण्याच्या विधीला देवीस लेणे चढवणे असेही म्हणतात. उत्सव काळात देवीला चांदीच्या अशा रुप्यांनी सजविले जाते. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात देवीचा विजयादशमीपर्यंत जागर केला जातो. नवरात्रोत्सव काळात महामाई मंदिरात दररात्री जागर करण्याच्या पाळ्या गावातील सर्व वाड्यांमध्ये वाटून दिलेल्या आहेत. प्रत्येक वाडी नवरात्रोत्सवात ठरलेल्या रात्री भजन, कीर्तन, जाखडीनृत्य, दांडीया किंवा गरबा यांसारखे कार्यक्रम आयोजित करून रात्रभर देवीचा जागर करते. दसऱ्यादिवशी महामाई मंदिरात मोठा धार्मिक कार्यक्रम होतो. सगळे गावकरी मंदिरात जमतात व देवतांना सोने वाहून झाल्यावर एकमेकांना सोने वाटून प्रेमभावना व बंधुभावाची देवाण-घेवाण करतात.

येथून जवळच असलेल्या गावतळे येथील श्री देवी झोलाई व टेटवलीची श्री देवी महामाई यांचे नातेसंबंध असल्याचे मानले जाते. याच नातेसंबंधांचा एक मुख्य भाग म्हणून श्री देवी महामाई दर तीन वर्षानी एकदा माहेरी म्हणजे गावतळे येथील श्री देवी झोलाईकडे माहेरपणासाठी जाते. श्री देवी महामाईचे माहेरी प्रस्थान होणे व तिचे परत गावात आगमन होणे हा टेटवलीवासियांसाठी एक खूप मोठा सोहळाच असतो. श्री देवी महामाई तिच्या माहेरी पाच दिवस राहते. या कार्यक्रमासाठी मुंबई व पुण्यासारख्या शहरांतूनही अनेक भाविक हजेरी लावतात. श्री देवी महामाईला माहेरी पठवताना खूप छान स्वरुपात सजवून विधिपूर्वक पाठविले जाते. पाचव्या दिवशी तिला तसेच मोठ्या सन्मानाने व वाजतगाजत परत मंदिरात आणले जाते. पाच दिवसांचे माहेरपण मनसोक्त साजरे करून परत आलेली श्री देवी महामाई मग तिच्या लेकरांच्या रक्षणासाठी तत्पर होते अशी श्रद्धा आहे.

टेटवली येथील श्री देवी महामाई मंदिरातील पुरातन व प्राचीन पाषाणी मूर्ती ही या मंदिराची विशेष ओळख आहे. या पुरातन मूर्ती पाहण्यासाठी व नवसाला पावणाऱ्या महामाई देवीच्या दर्शनासाठी खूप दूरवरून हजारो भक्तजन महामाई मंदिरास भेट देतात. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात अनेक माहेरवासिणी देवीसमोर नतमस्तक होऊन देवीची मोठ्या श्रद्धेने ओटी भरतात, नवस करतात. देवीसमोर सुख,समाधानाचे मागणे मागतात. याशिवाय बाहेरगावचे व दुरदूरचे हजारो भक्तजन दरवर्षी श्री देवी महामाई देवीच्या दर्शनासाठी टेटवली येथे येतात. श्री देवी महामाई मंदिराच्या परिसरातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतात. टेटवली येथील श्री देवी महामाई मंदिरास भेट देण्यासाठी दापोली व खेड येथून नियमित बससेवा उपलब्ध आहे. टेटवली गावात मुख्य रस्त्यालगतच हे मंदिर व देवस्थान असल्याने खाजगी वाहनानेही या मंदिरापर्यंत अगदी सहज पोहोचता येते. दापोली – खेड मुख्य मार्गावरील वाकवली येथून टेटवली गावात जाण्यासाठी पक्की सडक आहे. हा मार्ग पुढे उन्हवरे येथील गरम पाण्याची कुंडे व पन्हाळेकाझी येथील प्रसिद्ध बौद्धकालीन लेण्यांकडेही जातो. याच मुख्य रस्त्यालगतच श्री देवी महामाईचे मंदिर असून अनेक भक्तजन या मंदिरात श्री देवी महामाईचे दर्शन घेऊनच पुढे जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here