दापोली तालुक्यातील गावतळे येथे गावातील मुख्य लोकवस्तीपासून खूप दूर व निर्जन वनराईत झोलाई देवीचे मंदिर आहे. गावावर येणारे कोणतेही संकट, कोणतीही आपत्ती बाहेरच आटोपून ठेवण्यासाठी व गावावर लक्ष ठेवण्यासाठी खूप वर्षांपुर्वी ही झोलाई देवी गावाच्या सीमेवर जाऊन राहिली असे सांगितले जाते. गावातील ज्येष्ठ व बुजुर्ग जाणकारांच्या मते झोलाई देवीचे पुरातन मंदिर इ.स. सतराव्या शतकात बांधले असावे अशी माहिती मिळते. मुघल राजवटीत महाराष्ट्रातील अनेक देवदेवतांच्या मंदिरांची वाताहात व विटंबना होत होती. आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराची अशी तोडफोड होऊ नये यासाठीही हे मंदिर मुख्य लोकवस्तीपासून दूर व दुर्गम परिसरात बांधले असावे अशी शक्यताही येथील जाणकार व्यक्त करतात.
झोलाई मंदिराचा परिसर दाट वनसंपदेने समृद्ध आहे. आता येथील वनराई थोडी कमी झाली असली तरी काही वर्षांपुर्वी येथे अवाढव्य जुनाट वृक्ष होते. कालौघात या वनराईतील अनेक जुनाट वृक्ष जीर्ण झाल्याने व वादळांच्या तडाख्यात जमीनदोस्त झाल्याने येथील दाट वनराई आता थोडी विरळ झाली आहे. या मंदिराच्या आवारात अशाच एका जुनाट व जीर्ण होऊन पडलेल्या पायरी जातीच्या वृक्षाचे अवशेष आहेत. या एकाच झाडाच्या पडलेल्या खोडावर शे दोनशे माणसे सहज बसू शकतात. या परिसरात पूर्वी दिवसाढवळ्या वाघासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर होता. त्यामुळे अनेकजण या परिसराकडे एकटेदुकटे जाण्यास धजावत नसत. वाघाची या परिसरात दहशत असली तरी या गावात वाघाबद्दल श्रद्धादेखील आहे. झोलाई मंदिराच्या आवारातच जी इतर देवतांची मंदिरे आहेत त्यांपैकीच एक वाघजाई देवीचे मंदिर आहे. याच वाघजाई मंदिराच्या पायरीवर वाघ नेहमी येऊन बसत असत. या गावात कधीही वाघाने गायी गुरे किंवा इतर पाळीव जनावरांची शिकार केली नाही असे झोलाई मंदिराचे मुख्य मानकरी असलेले पवार सांगतात.
सन २००५ मध्ये पुरातन व जीर्ण असलेल्या झोलाई मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यापुर्वीचे मंदिर लाकडाचा जास्त वापर करून सतराव्या शतकात बांधले होते. सागासारखे मजबूत, टिकाऊ व अवजड लाकडाचे मंदिराचे बार होते. हे बार भरपूर जाडजूड होते. हे भार व वासे जोडताना लोखंडी खिळ्यांऐवजी लाकडी खिळ्यांचाच वापर केला होता. सर्व वासे व बार अप्रतिम कोरीव काम करून जोडण्यात आले होते. मंदिराचे छप्पर लाकडी वासे व मातीच्या नळ्यांनी शाकारलेले होते. शेकडो वर्षे जुने असलेले हे बार व वासे कालौघात जीर्ण झाल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. झोलाई मंदिराचे एकसंध पुरातन दगडी कोरीव खांब तसेच कायम ठेवून मंदिराचे डिझाईन न बदलता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. झोलाई मंदिराची रचना अतिशय देखणी आहे. सभामंडप, गाभारा व प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची सोपी व सुटसुटीत रचना आहे. मंदिराच्या आवारात आता आधुनिक सिमेंटच्या फरशांची फरसबंदी केली आहे. मंदिरातील गाभाऱ्यात देवी झोलाईची पाषाणमूर्ती आहे. मूर्ती खूप देखणी व पुरातन आहे. मूर्ती बैठी व महिषासूरमर्दीनी रुपात आहे. मंदिराच्या गाभाऱ्याजवळच्या खिडकीत चोडकरीण देवीची मूर्ती ठेवली आहे. ही चोडकरीण देवी पूर्वी गावकऱ्यांना खूप त्रास देत असे. त्यामुळेच झोलाई देवीने तिची रवानगी तिच्या देखरेखीखाली असलेल्या खिडकीत केली आहे अशी एक आख्यायिका आहे.
झोलाई मंदिर परिसरात वाघजाई, भैरवनाथ, मानाई, चमकाई, वळजाई, नवलाई, काळकाई अशा देवतांची मंदिरे आहेत.यापैकी भैरवनाथ हे येथील प्रमुख मानकरी असलेल्या पवार घराण्याचे कुलदैवत आहे. यांपैकी सर्वच मंदिरांचा आता जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी सर्व मंदिरांची रचना मात्र जशी पुर्वी होती तशीच ठेवली आहे.
झोलाई मंदिर परिसरात अनेक पुरातन व भग्न दगडी मूर्त्या इतस्ततः पडलेल्या दिसतात. यांतील अनेक मूर्त्या चांगल्या अवस्थेत आहेत. या सर्व मूर्त्यांची योग्य देखभाल केली तर एक पुरातन व अनमोल ठेवा जतन केल्याचे समाधान मिळेल. झोलाई मंदिर परिसरात एक पुरातन व विस्तीर्ण तळे आहे. गावतळे गावात अशी अनेक तळी आहेत. या तळ्यांमुळेच गावाचे नावही ‘ गावतळे ‘ असे पडले असावे असे येथील मानकरी असलेले पवार सांगतात. या तळ्यातील पाणी स्वच्छ व चवदार आहे. हे तळे पाण्याने बारमाही भरलेले असते. या तळ्यात सर्व प्रकारचे जलचर व कमळे आहेत. या तळ्यात अनेक मगरींचा फार पूर्वीपासून वावर आहे. मात्र आजपर्यंत कधीच एखाद्या मगरीने पाळीव जनावरांवर किंवा गावकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. या मगरी बहुतेक वेळेस पाण्यातच असतात. क्वचित प्रसंगी तळ्याबाहेर येऊन तेथील गवतात सुस्त पडलेल्या दिसतात. या तळ्याच्या बाजूला पायवाटेजवळ एक ‘ कासारणीचा चोंडा ‘ प्रसिद्ध आहे. फार पुर्वी एक कासारीण येथून जाताना न चुकता झोलाई देवीसाठी बांगड्या मोठ्या श्रद्धेने या चोंड्यात ठेवत होती. त्यामुळेच हे ठिकाण कासारणीचा चोंडा या नावाने प्रसिद्ध झाले.
झोलाई देवी नवसाला पावणारी स्वयंभू देवी म्हणून पंचक्रोशीतील प्रसिद्ध आहे. झोलाई मंदिरात होळी, नवरात्र, महिषासूरमर्दन, वाघबारशी, पालेजत्रा यांसारखे उत्सव साजरे होतात. महिषासूरमर्दन हा उत्सव दर तीन वर्षांतून एकदा झोलाई मंदिरात साजरा होतो. मानाच्या बोकडाला सजवून गावातून त्याची मिरवणूक काढत झोलाई मंदिरात आणतात. नंतर या बोकडाचा बळी देऊन त्याचे मुंडके व खूर देवीला अर्पण करून ठरलेल्या ठिकाणी पुरतात. बोकडाच्या मटणाचा प्रसाद मोठ्या श्रद्धेने गावाला वाटला जातो. या प्रसादासाठी लागणाऱ्या भाकऱ्या गावातूनच गोळा केलेल्या तांदळांपासून बनवतात. पुर्वी या कार्यक्रमात स्रिया येत नसत. आता हा उत्सव सर्वांसाठीच खुला आहे. वाघ बारशी हा कार्यक्रम वाघाला गावातून हद्दपार करण्याचा पारंपारिक कार्यक्रम आहे. वाघाच्या रुपात गावातील दुष्ट शक्ति हद्दपार करणे ही या कार्यक्रमामागील मुख्य कल्पना आहे. गावातीलच एका व्यक्तीला वाघ बनवून त्याच्यावर शेण, दगड यांचा वर्षाव करीत त्याला गावाच्या सीमेबाहेर हाकलून लावले जाते. नंतर गावातून वाघ हद्दपार झाल्याच्या आनंदात आधीच गावातील शेतांतून पडलेले भाताचे धान्य गोळा करुन रानातच चूल पेटवून त्याची खीर करतात व तिथेच आपसात वाटून सहभोजन करण्याची प्रथा आहे.
पालेजत्रा हा तसा गावातील शेतकऱ्यांचा प्रमुख सण आहे. मात्र हा सण येथील झोलाई मंदिरात साजरा केला जातो. भातलावणीस सुरुवात करण्याआधी हा सण साजरा होतो. या सणानंतर गावात भातलावणीस सुरुवात होते. दर तीन वर्षांतून एकदा नवरात्रोत्सवात झोलाई मंदिरात पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम होतो. पुर्वापार प्रथेनुसार पश्चिम महाराष्ट्रातील ठरलेले गोंधळी या कार्यक्रमासाठी झोलाई मंदिरात येतात. गोंधळाचा कार्यक्रम कधी तीन दिवसांचा असतो तर कधी एक दिवसाचा असतो.
झोलाई देवस्थान हे जागृत देवस्थान मानले जाते. झोलाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. गावतळे गावात बाजारपेठ व इतर आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध आहेत. झोलाई मंदिरासारख्या निसर्गरम्य व निवांत ठिकाणासह एकदा तरी आवर्जून भेट द्यावी असा हा नितांत सुंदर परिसर आहे.