दापोली शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपारिकेतचा वारसा जपत अनेक सण-उत्सव पार पडत असतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या जोग नदीमुळे शहराचे सण-उत्सवाकरता पूर्वापार दोन विभाग झालेले आहेत. यामध्ये पिंपळे नाका ते बुरोंडी नाका, पोस्ट लेन ते लाला परब नाका, कोकंबाआळी, झरी आळी, मारुती आळी धरून एक बाजारपेठ विभाग. तर रमा रेळेकर यांचे घरापासून केळस्कर नाका, एस.टी.स्टँड, मच्छी मार्केट, पोलीस लाईन, गाडीतळ ते प्रभुआळी धरून प्रभुआळी विभाग. या प्रभुआळीची खरी ओळख होते ती श्रीराम मंदिरामुळे.
या मंदिराला सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे. आल्फ्रेड ग्रॅडने, साने गुरुजी व इतर काही नामांकित लोकांनी या मंदिराला भेटी दिलेल्या आहेत, असे तेथील काही जुनेजाणते लोक सांगतात. पूर्वी मंदिरात सर्व मूर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या. त्या जीर्ण झाल्यानंतर संगमरवरी मूर्तींची स्थापना करण्यात आली. सन १९५३ मध्ये स्थापन झालेल्या विश्वस्त मंडळामध्ये त्यावेळी कै.अनंत प्रधान, कै.शिवप्रताप मालू, कै.काळूशेट मालू, त्यानंतर कै.रामचंद्र खटावकर, कै.शांताराम सपकाळ, कै. शांताराम पडळकर, कै.हरिश्चंद्र सणस या मंडळीनीं काम केले. त्यानंतर १९९८ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या समितीमध्ये श्री.उमेशचंद्र बुटाला, श्री.शांतीशेठ जैन, कै.रमेश सकपाळ, कै.संदीप सुवरे इ. मंडळींनी काम केले. स्थानिक समिती बरोबरच मुंबई येथील मंडळींची समिती देखील कार्यरत होती. यात कै.गजानन सपकाळ, कै. कृष्णा तेटांबे, संतोष खटावकर, सुरेश प्रधान इ. मंडळी काम करीत होती.
सन १९६६ या वर्षी श्रीराम मित्र मंडळ, मुंबई या नावाने कै.गजानन सकपाळ यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने श्रीराम जन्मोत्सवाकरिता श्रीरामाची चांदीची मूर्ती विश्वस्त मंडळाकडे सुपूर्त केली. आजही तीच मूर्ती मिरवणुकीत पालखीमध्ये विराजमान असते.
श्रीरामनवमी हा प्रभुआळीतील सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवाचे यजमानपद प्रभुआळीकरांकडेच असते. या उत्सवाची तयारी साधारणतः दोन महिने आधीपासून केली जाते. गुढीपाडव्यापासूनच कीर्तन, वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ, भक्तिगीते इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्याला मंदिरासमोर मोठी गुढी उभारण्याची प्रथा आहे. ही प्रथा कै.रामचंद्र खटावकर यांनी सुरु केली. त्यांच्या पश्चात पुत्र कै. शेखर खटावकर आणि त्यानंतर त्यांचे बंधू संतोष आणि संजय खटावकर यांनी ती प्रथा आजतागायत सुरु ठेवली आहे. श्रीरामनवमी दिवशी पाळणा झाल्यानंतर साधारणतः दुपारी दोनच्या सुमारास प्रभू रामचंद्राची भव्य मिरवणूक निघते. ही मिरवणूक पूर्वी पूर्ण दापोली शहर फिरत असे. परंतु वाढत्या लोकवस्तीमुळे आता ती फक्त ठराविक भागातूनच फिरवून रात्री १च्या सुमारास पुन्हा मंदिरामध्ये आणली जाते. दुसऱ्या दिवशी लळीताचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. या महाप्रसादाची सुरुवात सन १९९२ पासून झाली.
मंदिराकडून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राकेश कोटिया व उपाध्यक्ष प्रविण मोरे यांच्या देखरेखीखाली मंदिराचे सर्व कामकाज पाहिले जाते. शेखर प्रधान, राकेश विचारे, संजय शिंदे, निखिलेश प्रधान असे अनेक सदस्य मंदिराकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळीत आहेत.
प्रभुआळीतील राममंदिर हे दापोली शहराचे श्रद्धास्थान, शोभास्थान आहे आणि रामनवमीचा उत्सव हा दापोली शहराच्या उत्सवांपैकी मानाचा उत्सव आहे.