रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील थोरली – धाकटी कोटजाई नदीजवळ “पन्हाळेकाजी” हे गाव आहे. हे गाव अत्यंत निसर्गरम्य असून गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या प्राचीन अशा भारतीय संस्कृतीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थोरल्या- धाकट्या कोटजाई नदीला उत्तराभिमुख असलेल्या डोंगरांत एक प्राचीन लेणी समूह आहे. या समूहात एकूण 28 शैलगृहे आहेत व 29 वे बागवाडी या ठिकाणी आहे.
या लेण्यांमध्ये भिक्षू गृहे,स्तूप, सभामंडप, मूर्ती व अनेक शिल्पे कोरलेली आढळतात.हीमयान, वज्रयान, नाथ संप्रदाय यांच्या निवासाच्या आणि शिलाहार साम्राज्याच्या अनेक खुणा येथे प्राप्त होतात. इतिहासकारांसाठी, अभ्यासकांसाठी पन्हाळेकाजी हे तर सर्वतोपरी आकर्षण आहे, येथे येणारा मार्ग अडचणीचा असला तरी पर्यटक येथे आवर्जून येतात. पुरातत्व खात्याने नेमलेले मार्गदर्शक या ठिकाणची माहिती पर्यटकांना अतिशय उत्तम रित्या देतात. त्यामुळे दापोली तालुक्यात आलेला पर्यटक या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय निश्चितच राहत नाही.