दापोलीतील रानमेवा

0
4960

कोकण प्रांतास ‘ अपरांत ‘ या नावाने पुर्वीपासून ओळखत असले तरी कोकण प्रांत अनादि काळापासून नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. वर्षभरातील कोणत्याही ऋतूमध्ये कोकणातील अगदी गरीबातली गरीब व्यक्ती केवळ परिसरातील रानावनात फिरून त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेली फळे, कंदमुळे खाऊन आणि निर्मळ झऱ्याचे पाणी पिऊन आरामात जीवंत व निरोगी राहू शकते इतका येथील निसर्ग समृद्ध आहे. दापोली तालुक्यातील निसर्गदेखील असाच नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असून येथील रानावनात फिरल्यावर असे दिसते की, येथील जंगले विपुल अशा रानमेव्यानेही समृद्ध आहेत. अशाच काही रानमेव्यांची ओळख आपण या लेखात करून घेणार आहोत.

कोकणात वर्षभरातील सर्वच ऋतुंमध्ये रानमेवा उपलब्ध असला तरी वसंत ऋतूत दापोलीतील जंगलांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रानमेव्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वसंत ऋतूत दापोली तालुक्यातील जंगल परिसरात आनेक प्रकारची फळे पाहावयास मिळतात. त्यांपैकी काही विशेष ओळख असलेली फळे खालीलप्रमाणे आहेत: 

१. जांभूळ:

जांभूळ ही दापोलीची विशेष ओळख आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या सुमारास जंगलात सर्वत्र उपलब्ध असलेली जांभळीची झाडे मोहरतात आणि पुढे महिन्या- दोन महिन्यांत फळांच्या घडांनी लगडतात. दापोलीतील जंगल परिसरात तीन ते चार प्रकारची जांभळांची झाडे दिसतात. मोठ्या व विस्तीर्ण जांभूळवृक्षांना फळेही मोठ्या व डगळ आकाराची येतात. वर्षभरात केवळ एकदाच फळे देणारे हे झाड आहे. जांभळाच्या फळांबरोबरच जांभळाची साल, पाने व बिया विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी आहेत. जांभळाची फळे लांबट व मध्यम आकाराची असतात. फळांचे घड फांद्यांना लगडतात. साधारण एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांत दापोलीतील जंगल परिसरात जांभळे विपुल प्रमाणात खाण्यासाठी उपलब्ध असतात. मोठ्या आकाराच्या जांभळांची झाडे उंच व विशाल असल्याने अनेक झाडांवरची जांभळे अशीच पिकून व गळून जातात. माणसांप्रमाणेच जंगलातील अनेक पक्षी व प्राणी झाडावरची तसेच खाली पडलेली जांभळे आवडीने खातात. जंगली व मोठ्या आकाराच्या जांभळांची कलमे करूनही आता बागेत लागवड केली जाते. मात्र जंगलात आढळणाऱ्या जांभळांची चव विलक्षण गोड असते. दापोलीतील जंगल परिसरात मध्यम व लहान आकाराची जांभळेही मिळतात. मध्यम आकाराची जांभळे लगडणाऱ्या जांभळीची झाडेही मध्यम आकाराचीच असतात. या जांभळीची पानेही लहान व मध्यम आकाराची असतात. या जांभळांच्या झाडांवरची जांभळे जंगलातील पक्षी जास्त करून खातात. या जांभळांची चवदेखील छान गोड असते. अगदी लहान आकाराची जांभळे जांभळीच्या छोट्या झंडुपांवर लगडतात. या झंडुपांवरील छोट्या आकाराची जांभळे आकाराने गोल असून आतील बी देखील गोल आकाराचीच असते. काही ठिकाणी या जांभळीच्या झुडुपास व जांभळांस ‘ भेडस ‘ असेही म्हणतात. जांभूळ हे आरोग्यवर्धक फळ असून जांभळांपासून सरबत, जाम, अर्क व मद्यही बनवितात. जांभळाच्या बियांपासून तयार केलेली पावडर मधुमेहादी विकारांवर गुणकारी आहे.

२. तोरणे:

तोरणाची फळे दरवर्षी वसंत ऋतूत पिकून तयार होतात. दापोलीतील अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात तोरणाच्या झुडूपवजा वेली दिसतात. इतर ऋतूत या वेलींकडे माणसाचे सहसा लक्ष जात नाही. मात्र वसंत ऋतूत पांढऱ्या मोहराने फुललेल्या तोरणीच्या वेली खूप सुंदर दिसतात. सुरुवातीस हिरव्या रंगाची असलेली तोरणाची बारीक व गोलाकार फळे पिकल्यावर पांढरीशुभ्र व किंचित गुलाबी होतात. फळे पिकून तयार झाली की माणसांचे त्या वेलींकडे आपोआपच लक्ष जाते. तोरणीची पाने बोरीच्या आकाराची, पण आकाराने मोठी असतात. तोरणीच्या वेलीला वाघनखांच्या आकाराचे काटे असतात. अशा काट्यांपासून बचाव करीत वेलीच्या टोकावरची पिकलेली तोरणे काढणे हे फार मोठे कसबच असते. पिकलेली तोरणे खूप गोड व पिठुळ लागतात. तोरणाच्या फळांबरोबरच तोरणीची पाने, पानांचा रस, मुळ्या अनेक मानवी विकारांवर गुणकारी आहेत.

३. करवंद:

करवंदाला ‘ कोकणची काळी मैना ‘ असेही म्हणतात. करवंदीची झुडुपे वसंताच्या आगमनाबरोबरच पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरतात. मोगऱ्यासारखा सौम्य सुगंध असलेली फुले दुरूनही छान दिसतात. सुरुवातीला हिरव्या रंगाची असलेली करवंदे तयार झाल्यावर लालसर आणि पिकल्यावर काळी दिसतात. करवंदाचे फळ बारीक व मध्यम आकाराचे असून त्याचा आकार गोल आणि लांबटगोलही असतो. फळात थोड्याशा प्रयत्नाने दोन समान डाळी होणारी गोलाकार बी असते. साधारण एप्रिल ते जून या काळात करवंदे पिकून तयार होतात. करवंदांची चव गोड, आंबटगोड, तुरट, किंचित कडूही असते. पिकलेली करवंदे काढून ती मीठात मिसळून वाळविल्यावर वर्षभर टिकतात. करवंदांचे सरबत, लोणचेही वर्षभर टिकते. करवंदाच्या जाळीला मोठे व टोकदार काटे असल्याने करवंदे जपून काढावी लागतात. करवंदांपासून अर्क व मद्यनिर्मितीही केली जाते. करवंद हे दापोलीच्या रानमेव्यातील प्रमुख फळ आहे.

४. आंबा:

हापूस आंबा हा फळांचा राजा आहे. याशिवाय हापूस आंबा ही कोकणची विशेष व अभिमानास्पद ओळख असली तरी कोकणातील जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या रुजलेल्या व वाढलेल्या रायवळ आंब्यांची मुबलक झाडे आहेत. शेकडो वर्षे जुने असलेले अनेक आम्रवृक्ष दापोलीत स्वतःची खास ओळख राखून आहेत. दापोलीतील जंगल परिसरात सर्वत्र मोठमोठे आम्रवृक्ष आहेत. साधारण जानेवारीच्या सुरुवातीस मोहरलेले असे आम्रवृक्ष एप्रिल ते जून या काळात फळांनी लगडतात. मधुर ,गोड, आंबट चवीचे आंबे या काळात माणसाला भुरळ घालतात. याशिवाय माकड, खारकुंड्या यांसारखे प्राणी आणि अनेक रानपक्षी या आंब्यांवर ताव मारतात. रायवळ आंब्यांच्या कैरीपासून लोणचे, पन्हे यांसारखे वर्षभर टिकणारे पदार्थ बनवितात. याशिवाय अख्ख्या कैऱ्या मीठात खारवून, कापून मीठात वाळवून वर्षभरासाठी वापरता येतात. पिकलेल्या आंब्यांपासून आमरस, आंबापोळी, आंबावडी यांसारखे पदार्थ बनवितात. रायवळ आंब्यामध्ये छोट्या आकाराच्या आंब्यांना ‘ लिटी ‘ म्हणतात. लिटीचे आंबे सर्रास मधुर व गोड अस्तात. हे आबे लहान थोर फार आवडीने खातात. दापोलीतील जंगल परिसरात आढळणारा रायवळ आंबा हा एक प्रमुख रानमेवा आहे असे म्हणता येईल.

५. काजू:

दापोलीतील नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक पद्धतीने रुजलेली व वाढलेली काजूची असंख्य झाडे आहेत. काही झाडे झूडुपांसारखी तर काही मोठी व विशाल व जुनाट आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब अशाच झाडांवरील काजुबिया बाजारात विकून बेगमीची खरेदी करतात. जंगलातील माकडे, खारकुंड्या, साळींदर यांसारखे प्राणीही अशा काजुबोंडे व काजुबिया खाऊन पोट भरतात. काजूबोंडांच्या रसापासून सरबत, मद्यार्क बनवितात. काजुबियांपासून काजूगर काढतात. काजू हा रानमेव्यातील अतिशय लोकप्रिय घटक आहे.

६. आळू:

दापोलीतील जंगल परिसरात आळूची झाडे सर्वत्र आढळतात. पानाचा अळू आणि याच्यात काही साम्य नाही. या आळूची झाडे मध्यम उंचीची असतात. फळे मध्यम आकाराची व गोलाकार असतात. कच्च्या फळाची चव तीव्र आंबट तर पिकलेल्या फळाची चव आंबटगोड असते. फळात चिकूसारख्या लांबट बिया असतात. कच्च्या आळूचे तुकडे करून ते उन्हात वाळवून ‘ उसरी ‘ बनवितात. कच्च्या आळूचे सारही फार चवदार होते. पावसाळ्यात अशा वाळलेल्या उसरीची चटणी भाकरीबरोबर खातात. पिकलेले आळू अनेकजण चवीने खातात. स्थानिक बाजारातही असे आळू विक्रीस येतात. आळूच्या झाडास लांब व टोकदार सुळ्यांसारखे काटे असतात. काटे असल्याने आळूची फळे जपून काढावी लागतात. आळूच्या कच्च्या फळाचा रंग पोपटी हिरवा तर पिकलेल्या फळाचा रंग गडद तपकिरी, चिकूसारखा असतो. आळू हे रानमेव्यातील अतिशय लोकप्रिय फळ आहे.

७. वट (कवठ):

 वटाचे झाड आणि फळ दोन्ही आळूच्या झाडासारखे असते. मात्र वटाचे झाड आळूच्या झाडापेक्षा खूप मोठे व उंच असते आणि वटाचे फळ सुरुवातीपासूनच तपकिरी रंगांचेअसते. वटाच्या झाडास काही ठिकाणी ‘ कवठ ‘ असेही म्हणतात. वटाचे फळही आळूपेक्षा किंचित मोठे असते. आळूप्रमाणेच वटाची फळेही एप्रिल ते जून  या काळात तयार होतात. मध्यम व गोलाकार आकाराच्या कच्च्या फळांपासून सार बनवितात. कच्च्या वटाचे तुकडे उन्हात वाळवून आळूप्रमाणेच उसरी बनवितात. पिकलेले वटाचे फळही आळूप्रमाणे चवीला आंबटगोड असते. मात्र दापोलीतील जंगल परिसरात वटाची झाडे अतिशय तुरळक प्रमाणात दिसतात. तरीही वट हे येथील रानमेव्यातील महत्वाचे फळ आहे.

८. आवळा:

जंगली आवळा हा अतिशय बहुगुणी असाच आहे. दापोलीतील जंगल परिसरात सर्वत्र जंगली आवळ्याची झाडे मुबलक प्रमाणात आढळतात. काही ठिकाणी आवळ्याच्या झाडाचे मोठे वृक्ष दिसतात तर अनेक ठिकाणी आवळ्याची झुडुपे दिसतात. डिसेंबर ते जून या काळात आवळे खाण्यासाठी योग्य असतात. आवळ्याची चव तुरट, आंबट व किंचित गोड असते. आवळा हे बारीक व मध्यम आकाराचे गोलाकार फळ असून फळात एकच बी असते. कच्चे आवळे खाणे हे आरोग्यासाठी फार उपयोगी समजले जाते. याशिवाय जंगली आवळे मीठात खारवूनही टिकवून ठेवता येतात. आवळ्यापासून लोणचे, चटणी, मोरावळा, सरबत, आवळा सुपारी, आवळापेठा, आवळाकीस यांसारखे पदार्थ बनवितात. च्यवनप्राश सारख्या आरोग्यवर्धक औषधात आवळ्याचा वापर सर्वाधिक असतो. आवळा पित्तनाशक व शक्तिवर्धक असून अनेक शारीरिक व्याधींवर गुणकारी आहे.

९. चारोळी:

चारोळीची झाडे दक्षिण कोकणात सर्रास आढळतात. दापोलीतही काही ठिकाणच्या जंगल परिसरात चारोळीची जंगली झाडे दिसतात. मध्यम उंचीचे व मध्येच भक्कम खोड असलेले चारोळीचे झाड खुप रुबाबदार दिसते. चारोळीच्या झाडाची पाने लांबट व जाड असतात. चारोळीच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनवितात. चारोळीस जानेवारीच्या सुमारास पांढरट बारीक फुलांचा मोहर येतो. बारीक व गोलाकार बोराच्या आकाराचे फळांचे घड एप्रिल ते जून  दरम्यान तयार होतात. कच्ची फळे पोपटी रंगाची असतात. ती तयार झाल्यावर तांबूस रंगाची होतात तर पिकल्यावर गर्द काळी दिसतात. चारोळीची पिकलेली फळे चवीला मधुर व मधासारखी गोड असतात. फळात एकच मोठी बी असते. फळे खाल्ल्यावर बिया सुकवितात. नंतर सुकविलेल्या बिया कोयतीच्या पाठीने अलगद फोडून आतला गर काढतात. चारोळीच्या गरांना बाजारात फार मोठी मागणी आहे. मिठाई, शिरा, खीर, बासुंदी आदि अनेक पदार्थांत चारोळीचा वापर होतो. चारोळी हे रानमेव्यातील एक महत्वाचे फळ व बी आहे.

१०. बिब्बा:

हे चारोळीसारखेच व तशाच आकाराचे झाड दापोलीतील जंगल परिसरात सर्वत्र आढळते. एप्रिल ते मे या काळात बिब्ब्याच्या झाडावर फळांचे घड तयार होतात. बिब्ब्याच्या झाडासही सुरुवातीस पांढरट रंगाचा मोहर येतो. काजूप्रमाणेच बिब्ब्याची बी फळाच्या बाहेर असते. बिब्ब्याचे बोंड पिकल्यावर काजूप्रमाणेच पिवळेधमक बनते. बी काळी दिसते. बिब्ब्याची काळी बी चपटी व किंचित लांबट असून ती फार औषधी आहे. रंग, रसायने, औषधे आदि उत्पादनांत बिब्ब्याच्या बी चा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो. बिब्ब्याचे पिकलेले बोंड चवीला किंचित तुरट व गोड असते. दापोलीत हे बोंड दरवर्षी आवडीने खाल्ले जाते. ही बोंडे दोऱ्यात ओवून सुकवितात व नंतर ती वर्षभर टिकतात. सुकविलेली बोंडेही पुढे आवडीने खाल्ली जातात. अनेक औषधी गुणांनी युक्त असलेला बिब्बा येथील रानमेव्यातील प्रमुख घटक आहे.

११. ओवळदोडा:

ओवळदोडा हा बकुळवृक्ष वर्गातील मादीवृक्ष आहे. एप्रिल ते जून या काळात या झाडावर बारीक व मध्यम आकाराची लांबट व टोकदार फळे तयार होतात. कच्ची फळे हिरव्या रंगाची तर पिकलेली फळे पिवळी, पिवळी लालसर व लाल असतात. फळात एकच चपटी लांबट व कडक बी असते. फळ चवीला गोड व पिठुळ असते. हे फळ लहान मुलांच्या खूप आवडीचे फळ आहे. ओवळदोड्याच्या झाडावर फळे सुटी सुटी तर घडांनीही येतात. ओवळदोड्याची फळे अनेक पक्षी फार आवडीने खातात. बकुळीला काही ठिकाणी ‘ ओवळ ‘ असेही म्हणतात. यामुळेच या फळाला ‘ ओवळदोडा ‘ हे नाव पडले असावे. ओवळदोड्याचे झाडही मोठ्या आकाराचे असून ते दीर्घायुषी असते. दापोलीतील जंगल परिसरात ओवळदोड्याची अशी असंख्य झाडे आहेत.

१२. वावडींग:

वावडींगाची फळे औषधी व बहुपयोगी आहेत. वावडींगाचे झाड झुडूप वर्गात मोडते. वावडींगाची पाने लांबट, खोलगट असून पोपटी पिवळसर रंगाची असतात. जानेवारीच्या सुरुवातीस वावडींगास पांढरट रंगाचा मोहर येतो. पुढे बारीक, गोलाकार व सफरचंदाच्या आकाराची फळे घडांनी लगडतात. ही फळे खूप बारीक व मिरीच्या आकाराएवढी असतात. एप्रिल ते जून दरम्यान ही फळे पिकून तयार होतात. कच्ची फळे हिरव्या रंगाची तर पिकलेली फळे गर्द गुलाबी रंगाची असतात. वावडींगाची पिकलेली फळे चवीला अतिशय गोड असून फळात एक बारीक बी असते. पिकलेली फळे खाण्यास गोड असून पुढे पिकलेली फळे आठवडाभर उन्हात वाळवून बाजारात विकतात. वावडींगाच्या वाळवलेल्या बियांना बाजारात चांगला दर आहे. वावडींग हे छोट्या मुलांच्या विविध आजारांवर बहुपयोगी असून रंग, रसायने व अनेक औषधी उत्पादनांमध्ये वावडींगाचा वापर होतो.

१३. बोर: 

बोरीची झाडे दापोलीत सर्वत्र आढळतात. उंच आणि झूडुप अशी दोन्ही प्रकारची झाडे वसंतात फळांनी भरून जातात. त्याआधी बारीक  पांढरट फुलांनी बहरलेली बोरीची झाडे सुंदर दिसतात. बोरीची पाने व फळे गोलाकार असून फांद्यांवर अनेक काटे असतात. कच्ची बोरे पोपटी रंगाची असतात तर पिकल्यावर ती लालबुंद होतात. फळात एकच गोल व कडक बी असते. बोरे चवीला गोड व किंचित आंबट असतात. बोर हे लहान मुलांचे आवडते फळ आहे. पिकलेली बोरे मीठात मिसळून उन्हात वाळवून ठेवल्यास वर्षभर टिकतात आणि चविष्ट लागतात. बोरीची पाने अनेक शारीरिक विकारांवर उपयोगी आहेत. बोरांचा हंगाम मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत असतो. दापोलीतील जंगल परिसरात अशी बोरीची अनेक झाडे पहावयास मिळतात.

१४. आसना:

दापोलीतील जंगल परिसरात काटेआसनाची झाडे सर्वत्र दिसतात. सरळसोट उंच वाढणारी किंवा आडव्या फांद्यांनी विस्तारलेल्या आसनाच्या खोडावर खूप लांब, निमुळते व टोकदार सुळे असल्याने या झाडावर चढणे तसे कठीणच. मात्र गोलाकार व बारीक फळांनी ही झाडे देखील वसंतात बहरास येतात. कच्ची फळे हिरव्या रंगाची असतात तर पिकल्यावर ती गर्द काळी दिसतात. करवंदाप्रमाणे आसनाच्या फळात एक बी असते जिच्या नंतर दोन डाळी होतात. आसनाचे फळ खूप बारीक असते आणि ते चवीला गोड असते. मात्र आसनाला वर उल्लेख केल्याप्रमाणे काटे असल्याने आसनाच्या झाडाखाली पडलेलीच फळे खाण्यापासून गत्यंतर नाही. लहान मुले, परिसरातील पक्षी यांचे हे आवडते फळ आहे.

१५. चिकना:

काटे आसनासारखीच फळे असलेले व दापोलीतील जंगल परिसरात सर्वत्र आढळणारे हे झाड आहे. मात्र हे झाड फार उंच नसून ते  झूडुपवजा असते. वसंत ऋतूत या झाडावर बारीक व गोलाकार फळे येतात. फांदीवर टोकाला ही फळे दुतर्फा रांगेत असतात. या फळाची चव गोड असून लहान मुले व परिसरातील अनेक पक्षी या फळांवर अगदी तुटून पडतात.

 १६. फणस:

दापोलीतील नैसर्गिक अधिवासात फणसाची झाडे सर्वत्र आढळतात. फणसाचे झाड उंच व फाद्यांनी विस्तारलेले असते. साधारण जानेवारीच्या सुरुवातीस या झाडावर छोटे फणस ( कुवऱ्या ) येतात. त्यांचेच पुढे मोठे फणस होतात. फणसाचे फळ आकाराने मोठे व लांबट गोल, किंचित ओबडधोबड असते. फळास बाहेरून टोकदार पण नरम काटे असतात. फळाच्या आत गोड व मधुर गरे असतात. कापा व बरका अशा दोन्ही जातींचे फणस येथील जंगल परिसरात आढळतात. पिकलेल्या फणसाचे गरे खाण्याबरोबरच बरक्या फणसाच्या रसापासून फणसपोळी करतात. याशिवाय फणसापासून भाजी, सांदण, वडे यांसारखे पदार्थही बनवितात. कच्च्या फणसापासून तळलेले गरे करतात. असे तळलेले गरे पुढे वर्षभर टिकत असून तळलेले गरे, फणसपोळी या पदार्थांना बाजारात फार मोठी मागणी आहे. फणसाचे झाड सदाहरित असून ते अनेक वाटसरूंना सावलीदेखील देते. फणस ही अवघ्या कोकणबरोबरच दापोलीची खास ओळख आहे.

१७. हसोळी:

हसोळीची कमी उंचीची झाडे इतर झुडुपांच्या आधाराने व त्यांच्याच सहवासात वाढतात. वसंताच्या सुरुवातीस या झाडावर पांढरट फुलांचा मोहर येतो. पुढे हसोळीच्या छोट्या फळांचे घड झाडावर लगडतात. हसोळीची पाने लांबट व मध्यम आकाराची असतात. फळे बारीक असून त्यांचा आकार फुगविलेल्या छोट्या फुग्यासारखा असतो. कच्ची फळे पोपटी रंगाची असून पिकल्यावर ती गर्द काळी होतात. हसोळीची फळे चघळून खाल्ल्यावर चवीला खूप गोड लागतात. फळ खाल्ल्यावर फळातील केसाळ भाग व एकच कडक बी उरते. दापोलीतील जंगल परिसरात ही झाडे मुबलक प्रमाणात आढळतात आणि हसोळीची फळे लहान मुले आणि जंगलातील अनेक पक्ष्यांना फार आवडतात. दापोलीतील रानमेव्यातील हसोळी हे एक महत्वाचे व आवडते फळ आहे.

१८. तुडतुडे:

हसो॓ळीप्रमाणेच छोट्या झंडुपांच्या आधाराने वाढणारे तुडतुडा हे कमी उंचीचे झाड दापोली परिसरात सर्वत्र आढळते. लांबट, गोलाकार व निमुळते टोक असलेल्या पानांच्या प्रत्येक देठाशी छोटी फुले येऊन पुढे त्या ठिकाणी छोले चण्याच्या आकाराची फळे येतात. कच्ची असताना हिरवट तांबूस दिसणारी फळे पिकल्यावर काळी दिसतात. चण्याप्रमाणेच दोन डाळी होणारे बी फळामध्ये असते. पिकलेली फळे किंचित गोड व तुरट लागतात. विशेषतः लहान मुले व जंगलातील पक्षी ही फळे आवडीने खातात. साधारणपणे एप्रिल ते जून दरम्यान ही फळे झाडावर उपलब्ध असून रानमेवा प्रकारातील हे एक महत्वाचे असे फळ आहे असे म्हणावयास हरकत नाही.

१९. पेंडखळी:

दापोली परिसरात या झाडाला ‘ देव्हारा ‘ असेही म्हणतात. कोकणातील जंगलात सर्वत्र आढळणारे व जंगलाची शोभा वाढवणारे हे झाड आहे. छोट्या झुडुपांच्या सहवासात किंवा डोंगर उतारावर स्वतंत्रपणेही पेंडखळीची झाडे वाढतात. साधारण दोन ते तीन फूट उंचीची झाडे वर्षभर फुले व फळांनी लगडलेली दिसतात. चांदणीच्या आकाराच्या व लांब बारीक देठ असलेल्या लालबुंद रंगाच्या पेंडखळीच्या फुलांचे गुच्छ जंगलातून फिरताना कोणाचेही लक्ष वेधून घेतात. याच फुलांच्या जागी बारीक व गोल फळे येतात. कच्ची फळे हिरव्या रंगाची असतात तर पिकल्यावर ती लालबुंद होतात. लालबुंद फळांचे घडही खूप आकर्षक दिसतात. फुले व फळांचे हे चक्र अविरत सुरू असते. पेंडखळीची लालबुंद फळे चवीला गोड असतात. फळामध्ये एकच बारीक बी असते. लहान थोर माणसे आणि जंगलातील अनेक पक्षी ही फळे आवडीने खातात.

२०. चिंच:

लहान थोर अशा सर्वांनाच चिंच फार आवडते. चिंच पाहिली की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतेच. दापोलीतील जंगल परिसरात चिंचेची पुष्कळ झाडे आढळतात. बारीक पाने असलेली चिंचेची झाडे फार मोठी असतात. सदाहरीत असलेली चिंचेची झाडे पावसाळ्यात पिवळ्या व लालसर बारीक फुलांनी बहरतात तेव्हा खूप आकर्षक दिसतात. साधारण डिसेंबरनंतर चिंचा खाण्यास योग्य असतात. चिंचेचे फळ लाबट गोल व शेंगसदृश असते. फळात अंतराअंतरावर एकेक कठीण बी असते. चिंचेच्या बीस ‘ चिंचोका ‘ म्हणतात. चिंचोके भाजून, सोलून व नंतर उकडून खाल्ल्यास चवदार लागतात. फक्त भाजलेले चिंचोकेही चवदार असतात. चिंचेचे कच्चे व पक्के असे दोन्ही प्रकारचे फळ सर्वजण आवडीने खातात. चिंचेचे कच्चे फळ तीव्र आंबट तर पिकलेले फळ आंबटगोड असते. चिचेचे पिकलेले फळ वर्षभर टिकते. चिंचेचा वापर अनेक पदार्थांच्या उत्पादनात करतात. अनेक पदार्थ चवदार होण्यासाठी चिंच वापरतात. चिंचेच्या रसालाही बाजारात फार मोठी मागणी आहे. परिपक्व झालेल्या चिंचा मार्च ते जून महिन्यापर्यंत झाडावर उपलब्ध असतात. दापोलीतील रानमेव्याच्या यादीत चिंचेचे स्थान फार वरचे आहे.

२१. कोकम:

कोकमाच्या फळाला व झाडाला कोकणातील काही भागांत ‘ रातांबा ‘ म्हणतात. दापोलीतही कोकमाची झाडे विपुल प्रमाणात आढळतात. दापोलीतील जंगल परिसरात कोकमाची मध्यम व उंच आकाराची कोकमाची झाडे दिसतात. कोकमाच्या झाडाचे मुख्य खोड मजबूत व गोलाकार असते. खोडाला चहूबाजूंनी आडव्या व पसरट फांद्या असतात. जानेवारीपासून कोकमाच्या झाडावर फुलोरा येण्यास सुरुवात होते. मध्यम व गोलाकार कोकम फळे मार्च महिन्यापासून झाडांवर दिसू लागतात. कच्ची कोकम फळे पोपटी रंगाची असतात तर पिकल्यावर ती लालबुंद, गर्द गुलाबी व सफरचंदाच्या रंगाची होतात. फळात संत्र्याच्या आतील भागाप्रमाणे रसाळ बिया असतात. फळातील रसापासून आगळ बनवितात. अनेक पदार्थांच्या निर्मितीत कोकम आगळाचा वापर करतात. कोकमाच्या सालीला बाजारात फार मोठी मागणी आहे. कोकमाच्या फळाच्या सालींपासून ‘ आमसूल ‘ व ‘ सोल ‘ बनवितात. कोकमापासून बनविण्यात येणारे सरबत खूप गुणकारी असून ते बाजारात सर्वत्र उपलब्ध असते. कोकमाच्या बिया उन्हात वाळवून व त्या फोडून आतील गर बाजारात विकतात. रंग, रसायन, औषधनिर्मितीत या गरांना मोठी मागणी आहे. कोकमाच्या गराचे तेल व ‘ मुटेल ‘ यांनाही औषध निर्मिती उद्योगांमध्ये फार मोठी मागणी आहे. याशिवाय कच्चे कापलेले व उन्हात वाळवून सुकविलेल्या कोकमालाही बाजारात मोठी मागणी आहे. या कोकमांना ‘ दोडा ‘ असेही म्हणतात. या दोड्याचा वापरही रंग, रसायन व औषधनिर्मितीत करतात. पिकलेले कोकमही अनेकजण आवडीने खातात. आंबटगोड चवीचे पिकलेले कोकम हे दापोलीतील जंगल परिसरात आढळणारे प्रमुख फळ आहे.

२२. ऊंबर:

अंजीरासरखे दिसणारे ऊंबराचे झाड दापोली परिसरात सर्वत्र आढळते. छोट्या घाटात किंवा डोंगर उतारावर ऊंबराची झाडे आवर्जून दिसतात. ऊंबराचे झाड कमी ऊंचीचेही असते आणि विशाल वृक्षासारखेही असते. ऊंबरावर तशी वर्षभर फळे दिसत असली तरी एप्रिल ते जून या काळात ऊंबर फळांनी बहरतात. ऊंबराचे फूल सहसा दिसत नाही मात्र त्याच्या खोडावर छोटे देठ असलेले फळांचे घड लगडतात. ऊंबराचे फळ गोल व मध्यम आकाराचे असते. फळात अंजीराप्रमाणेच बारीक व नरम बियांसारखा भाग असतो. ऊंबराची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची असतात. ऊंबराचे फळ पिकल्यावर गर्द गुलाबी किंवा लाल रंगाचे दिसते. ऊंबराच्या पिकलेल्या फळाची चव अंजीराप्रमाणेच खूप गोड असते. हे फळ फार गोड असल्याने पिकलेल्या फळात मुंग्या शिरतात. एकदा पिकलेले ऊंबराचे फळ साधारण दहा ते पंधरा दिवस खोडावर टिकते. लहान मुले, मोठी माणसे, जंगलातील पशु पक्षी असे सर्वच ऊंबराचे फळ आवडीने खातात.

२३. बोकर:

बोकराची झाडे दापोली जंगल परिसरात क्वचित आढळतात. वसंत ऋतूत सुरुवातीस बोकराच्या झाडावर पांढरट पिवळा मोहर येतो. पुढे गोलाकर फळांचे घड खोडाला लगडतात. बोकराच्या फळाला लांबट देठ असतो. कच्ची बोकरे रंगाने पोपटी तर ती पिकल्यावर पिवळसर तांबूस दिसतात. कच्च्या बोकरांपासून लोणचे बनवितात. पिकलेली बोकरे आतून रसाळ, पण फार बुळबुळीत असतात. ती चवीला आंबटगोड असतात. लहान मुले व जंगलातील काही पशुपक्षी पिकलेली बोकरे आवडीने खातात. लहान मुले पिकलेली बोकरे बाटलीत साठवून त्यांची गोंदही बनवितात.

२४. घाणेरी:

घाणेरीची झूडुपे येथे सर्वत्र आढळतात. घाणेरीच्या खोडावर वाघनखाच्या आकाराचे छोटे काटे असतात. पान गोलाकार व कात्र्याकात्र्याचे असते. घाणेरीच्या झंडुपांवर तशी वर्षभर फुले व फळे येतात. बारीक बारीक फुलांचे लालबुंद व नारिंगी रंगाचे फुलांचे गोलाकार घोस असतात. फुले सुकून गेल्यावर त्या जागी बारीक व गोल फळांचे तसेच गोलाकार घड लगडतात. ही फळे खूप बारीक व कच्ची असताना हिरव्या रंगाची असतात. पिकल्यावर ती काळ्या रंगाची होतात. पिकलेल्या फळाची चव किंचित तुरट व गोड असते. लहान थोर असे सर्वच आणि जंगलातील काही पशुपक्षी घाणेरीची फळे आवडीने खातात.

२५. हेळा (भेला):

हेळ्याची झाडे बर्‍याच अंशी बदामासारखी दिसतात व ती दापोलीतील जंगल परिसरात सर्वत्र आढळतात. भेळ्यास जानेवारीपासूनच पांढरट बारीक फुलांचा मोहर येतो व पुढे बदामासारखी गोल मात्र किंचित लहान आकाराची फळे येतात. कच्ची फळे हिरव्या रंगाची तर पिकलेली फळे लाल रंगाची दिसतात. पिकून खाली पडलेली फळे फोडून किंवा जंगलातील पशुपक्ष्यांनी खाऊन झाडाखाली टाकलेले हेळ्याचे अख्ख्या बदामासारखे बी फोडून आतील गोलाकार व पांढरट रंगाचा गर बाहेर काढता येतो. हा गर खूप चविष्ट व बदामाच्या गरासारखाच गोड लागतो. हेळ्याच्या सुकलेल्या अशा बिया दगडानेही फोडता येतात. लहान मुले असे हेळ्याचे गर आवडीने खातात. मात्र हे गर जास्त खाल्ले तर त्यांची अंमली पदार्थाप्रमाणे नशा चढते असे म्हणतात.

        अनादि काळापासून स्थानिक जंगल परिसरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या अशा रानमेव्याचा आस्वाद त्या त्या काळातील माणूस घेत आला आहे. नैसर्गिक अधिवासात आपोआपच वाढणाऱ्या आणि कोणत्याही विषारी व हानिकारक मानवी रसायनांपासून मुक्त असलेल्या अशा रानमेव्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायला हवा असे वाटते. रानमेव्यातील सर्वच फळे औषधी गुणांनी युक्त असून निरामय व नैसर्गिक आरोग्यासाठी आताच्या माणसाने निसर्गाकडे आणि पर्यायाने रानमेव्याकडे वळण्याची गरज आहे असे या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here