दापोली तालुक्यातील शिरसोली गावचे पांडुरंग जाधव मुंबईत खाजगी व्यवसाय संभाळून गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्र व नियतकालिकांतून त्यांचे लेखन नियमित प्रसिद्ध होत असते. ‘ साप्ताहिक कोकणदीप ‘ या नियतकालिकाचे संपादन करतानाच ते मुंबईत ‘ मित्रांच्या कविता ‘ ही साहित्य विषयक संस्थाही चालवतात. नुकतेच पांडुरंग जाधव यांच्या ‘नैवेद्य’ या लघुकथासंग्रहाचे आणि ‘ गंधमोगरी ‘ या कवितासंग्रहाचे दापोली येथील न. का. वराडकर कला व रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालात समारंभपूर्वक प्रकाशन झाले आहे. या प्रकाशन समारंभाचे औचित्य साधून ‘ मित्रांच्या कविता ‘ आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम हे होते.
या प्रकाशन समारंभात निलेश उजाळ, निलेश पवार, जागृती सारंग, मनोहर जाधव, प्रसाद महाडिक, प्रसाद गोठणकर, भावेश लोंढे, विनया कवठकर आणि इतर नवोदित कवींनी आपापल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी प्राचार्य सुरेश निंबाळकर, डाॅ. रमिला गायकवाड, प्रा. उत्तम पाटील, सुशांत वाघमारे, श्रीमती सुनीता बेलोसे, प्रा. सिद्राया शिंदे, प्रा. व्ही. टी. कमळकर, प्रा. एल. पी. पाटील, प्रा. नंदकुमार गारडे, प्रा. बी. पी. गुंजाळ, मंगेश जाधव, साप्ताहिक कोकणदीप चे प्रकाशक दिलीप शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते. पांडुरंग जाधव हे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या वाढदिवशी याच महाविद्यालयात व्हावे अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन नियोजित ठिकाणी झाल्याने आपले मनोगत व्यक्त करताना पांडुरंग जाधव यांनी मनातली इच्छा व पुस्तक प्रकाशनाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.