पंडित खावर स्मृतिदिन

0
1050

मराठी गजल क्षेत्रात केवळ ११३ गजलांच्या बळावर आपले विशिष्ठ स्थान निर्माण करणारे ‘पंडित बदीउज्जमा खावर’ यांचा आज स्मृतिदिन. माधव ज्युलीयन, सुरेश भट आणि बदीउज्जमा खावर ही मराठी गजल क्षेत्रातील तीन महत्त्वपूर्ण नावे. ज्युलियन यांनी गजल हा काव्यप्रकार अरबी फारसी वृत्तांसह मराठीत आणला (म्हणजे एकप्रकारे बाह्यांग, रचना सांगितली.) आणि सुरेश भट व खावर यांनी त्यात गजलियत ओतली, मराठी भाषा आणली. त्यामुळे मराठी गजलवर खावरांचे जे ऋण आहेत ते विशेष आहेत. मराठीतील नामवंत साहित्यकार पु.ल.देशपांडे, वसंत बापट, कुसुमाग्रज, सेतू माधवराव पगडी, बा.भ.बोरकर, रा.भि.जोशी, वि.दा.करंदीकर, मंगेश पाडगावकर, वा.रा.कान्त, इंदिरा संत, संजीवनी मराठे, गंगाधर पानतावणे इ.नी खावर यांच्या मराठी गजलेची अगदी मुक्तकंठाने भरभरून प्रशंसा केली आहे.

मराठीत गजल रचना करण्यापूर्वी खावर हे उर्दूचे प्रख्यात कवि होते. उर्दूमध्ये मज्म व गजलचे संग्रह ‘हुरुफ’ (१९७२), ‘मेरा वतन हिंदोस्तान’ (१९७३), ‘बयाज’ (१९७३), ‘अमराई’ (१९७६), ‘लफजों का एैम्हन’ (१९७७), ‘सात समुंदर’ (१९८२), ‘नन्ही किताब’ (१९८३), ‘मोती फुल सितारे’(१९८४) व ‘सब्जो ताजा निहालो के अम्बोह में’ (१९८६) असे त्यांचे नऊ संग्रह प्रकाशित झाले होते. सुमारे १९८३ नंतर ते मराठी गजल लेखनाकडे वळले. उर्दू गजल लेखनातून त्यांचा यथोचित बहुमान त्यांना मिळाला; पण आपला संपूर्ण वेळ ते मराठी गजलला देऊ शकले असते तर मराठी गजलचे भांडार निश्चितच आज अधिक समृध्द असते.

कवी खावर यांचे मूळ घराणे परकार. परंतु त्यांनी आपले पारंपारिक आडनाव बदलून ‘बदीउज्जमा खावर’ हे साहित्यिक नावच, पूर्ण नाव म्हणून धारण केले. हे नाव त्यांनी रीतसर राजपत्रित (गॅझेट) करून घेतले. ‘खावर’ या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. आणि खावर यांचे उर्दू व मराठी भाषेतील साहित्यिक कार्य सूर्य तेजासारखे तळपणारे आहे.

कवी खावर यांचा जन्म १० जानेवारी १९३८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ह्या गावी झाला. त्यांचे वडील ‘महमद इब्राहिम परकार’ हे ‘सूफी बाणकोटी’ नावाने प्रख्यात कोकणातील सुप्रसिद्ध उर्दू शायर होते. त्यांचा काव्यसंग्रह ‘बाद ए साफी’ या नावाने प्रकाशित झाला होता व महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीकडून त्यांना मरणोपरांत पुरस्कारही मिळाला होता. खावर यांचे प्राथमिक शिक्षण बाणकोटला व पुढील शिक्षण श्रीवर्धन मधील ‘कोकण एज्युकेशन सोसायटी विद्यालय’ मध्ये झाले. शाळेत त्यांनी उर्दू बरोबर मराठीवर उत्तम प्रभुत्त्व मिळवले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणादरम्यान बागमांडला, जिल्हा रायगड येथील एका विद्यालयात शिक्षकाची नोकरी करत होते. ती त्यांनी चार महिने केली व आपला शायरी मिजाज, साहित्यिक तहान भागवण्यासाठी ते दिल्लीला गेले. त्यावेळी दिल्ली मध्ये नामवंत कवि आणि साहित्यिकांच्या साहित्य मैफिली होत असत, ज्यातून शायरी आणि साहित्य यावर विचारविनिमय होत असे. दिल्लीत राहून खावर यांनी आपले काव्य ज्ञान अधिक वृद्धिंगत केले. कोकणात परत आल्यानंतर १९६२ ते अखेर पर्यंत १९९० नेशनल हायस्कूल, दापोली येथे अध्यापक होते.

खावर यांनी शंभरहून अधिक निवडक मराठी कवितांचे उर्दू अनुवाद केले असून यातील बहुतेक अनुवाद त्यांच्या ‘खुशबू’(१९७४), सबील(१९७८) आणि मराठी रंग (१९८५) या तीन संग्रहात प्रसिद्ध झाले आहेत. या अनुवादाशिवाय त्यांनी निरंजन उजगरे कृत ‘दिनार’ व बापूराव जगतापकृत ‘निळ्या पहाडाच्या कविता’ हे दोन मराठी संग्रह अनुवादित केले आहेत. ते अनुक्रमे ‘दिनार’ आणि नीले पहाडीके जन्मे नावाने प्रकाशित झालेल्या आहेत. याशिवाय त्यांनी हरी नारयण आपटे, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, शांता शेळके, चि.त्र्य.खानोलकर यांच्या काही मराठी कथाही विविध नियतकालिकांसाठी उर्दू रुपांतरीत केल्या. ‘महराष्ट्र की तहजीबी और अदबी कदरे’ हे त्यांचे उर्दू पुस्तक विख्यात आहे.

कवी खावर यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि ठोस साहित्य सेवेसाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, उत्तर प्रदेश उर्दू अकादमी, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी व अन्य काही संस्था मार्फत एकूण चौदा पारितोषिके मिळाली. लखनौ येथील ऑल इंडिया मीर अकादमीने त्यांना १९८५ साली ‘इमतियाझे मीर सनद’ हा उर्दूतील उच्च साहित्यिक बहुमान बहाल करून गौरव केला होता. २७ सप्टेंबर १९९० रोजी खावरांचे देहावसान झाले.

खावरांचे मराठीत तीन गजल संग्रह आहेत.

  • गजलात रंग माझा (१९८५)  २८ गजल
  • माझिया गजला मराठी (१९८६)  ४२ गजल
  • चार माझी अक्षरे (१९९८) ४२ गजल

अंतिम गजलांचा संग्रह खावरांच्या पश्चात २७ सप्टेंबर १९९८ रोजी श्री. भाटकर यांनी प्रकाशित केला. खावरांवरील अत्याधिक प्रेमापोटीत्यांनी ते वर्ष ‘खावर वर्ष’ देखील घोषित केले आणि खावरांना ‘पंडित’ ही उपाधी बहाल केली. गजल सागर प्रतिष्ठान तर्फे गजलनवाज भीमराव पांचाळे द्वारा प्रकाशित ‘खावर यांच्या समग्र गजला’ पुस्तकाची पहिली आवृत्ती २००३ ला प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे प्रकाशन दापोलीत झाले आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुशायरा व गजल गायनाच्या जल्लोषात संपन्न झाला होता.

गजल क्षेत्रातील खावरांचं योगदान सांगणारा त्यांचाच एक शेर

  • पाहून सर्व खावर गझलात रंग माझा
  • म्हणतात मी गझलचा आहे कवि निराळा

खावरांच्या मराठी आणि उर्दू साहित्य सेवेसाठी त्यांना श्रद्धापूर्वक सलाम, विनम्र अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here