आजच्या अत्याधुनिक काळाला अनुसरून जग बदलत आहे, या परिवर्तनाला ‘दापोली तालुका’ काही अपवाद नाही. इथे देखील मोठ्या प्रमाणावर आधुनिकतेच वारं वाहत आहे आणि झपाट्याने बदल घडत आहेत. हे बदल योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा असला तरी पारंपारिक जीवनशैली हरवत चाललेय ही गोष्ट निश्चित. आणि याच जीवनशैलीचा लोकांना पुरेपूर विसर पडू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत; दापोली जालगावात राहणारे ‘श्री. प्रशांत परांजपे.’
त्यांनी दाभोळकडे जाणाऱ्या रस्त्याला लागूनच एक वस्तू संग्रहालय उभे केले आहे, जे दापोली जालगावमध्ये आहे. या संग्रहालयात त्यांनी जुन्या जीवनशैलीच दर्शन घडेल अशी चित्र लावली आहेत, काही प्रतिकृती उभारल्या आहेत आणि बऱ्याच वस्तूचा संग्रह केला आहे. ज्यामध्ये ‘काठवती’ ( लाकडी परात ), ‘ओगराळ’ ( लाह्या फोडण्याचे भांडे), ‘माथ्या’ (मसाल्यांचा लाकडी डबा), लाकडी पुरण यंत्र, शेक शेगडी ( बाळंतिणीसाठी वापरली जाणारी) अशा घरगुती वापरातल्या व रहाट, डालगं, झारणं, इरलं, दगडी द्रोण अशा शेतीच्या वापरातल्या अनेक वस्तू संग्रहीत केलेल्या आहेत. शिवाय दापोलीतल्या नररत्नांची व साहित्यिकांची आठवण राहील या दृष्टीने त्यांच्या काही स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.
( उदा: श्री.ना.पेंडसेच्या ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतील खोताच्या घराची प्रतिकृती.)
या वस्तू संग्रहालयाला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, पत्रकार श्री जोगळेकर आणि अनेक थोरामोठ्यांनी भेटी दिल्या आहेत. शिवाय पर्यटक देखील इथे चांगल्या संख्येत येतात. पण हे वस्तू संग्रहालय खऱ्या अर्थाने आहे ‘दापोलीकरांसाठी.’ आधुनिकतेची कास धरताना पारंपारिकतेकडे पूर्णपणे पाठ फिरवू नका, हा संदेश देण्यासाठी. ‘प्रगती बरोबरच संस्कृती हवी’, हे सांगण्यासाठी. इथे नामशेष झालेल्या वस्तूंचा संग्रह नाही तर नामशेषाच्या वाटेवर असलेल्या वस्तूंचा संग्रह आहे. जो भविष्याकडे चालताना भूतकाळ बघायला सांगतो, सिंहावलोकन करायला सांगतो. नव्या पिढीला जुन्याची ओळख ठेवायला सांगतो.