अण्णा पटवर्धन – दापोली ‘ग्राहक चळवळीचे’ कोकणप्रांत सदस्य

    1
    3695

    दापोलीतील गिम्हवणे गावात राहणारे ‘श्री. अण्णा पटवर्धन’ (पांडुरंग श्रीराम पटवर्धन) गेली सोळा वर्षे दापोलीमध्ये ‘ग्राहक चळवळीचं’ काम करीत आहेत. ते शाळा, महविद्यालयात जाऊन मुलांना ग्राहक शिक्षणाचे धडे देतात. त्यांच्या या कार्याबद्दल आणि ग्राहक चळवळी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अण्णांशी केलेली खालील बातचीत.

     ग्राहक चळवळ म्हणजे नेमकं काय? आणि ती नेमकी कोणाच्या विरोधात आहे?

    ग्राहकांनी ग्राहकांसाठी आणि ग्राहकांच्या विरोधात चालवलेली चळवळ म्हणजे, ‘ग्राहक चळवळ.’ तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की, सबंध मनुष्य प्राणी हा ग्राहक आहे. तो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत गाहक असतो. तो भोक्ता असल्यामुळे आपल्या उपभोगासाठी किंवा अन्य कारणांसाठी मोबदला देऊन वस्तू घेत असतो. या खरेदी-विक्री व्यवहारात जी  ग्राहकाची व विक्रेत्याची कर्तव्ये आहेत ती कधी-कधी व्यवस्थितपणे पाळली जात नाहीत किंवा विक्रेत्याकडून जाणीवपूर्वक ग्राहकाची फसवणूक केली जाते, त्याला लुबाडलं जातं. ग्राहक चळवळ अशा गोष्टींविरुद्ध कार्य करते. ती ग्राहकाला त्याच्या अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव करून देते शिवाय लोभी विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीला, लुबाडणीला चाप कसा लावता येईल, याचे मार्गदर्शन करते.

    ग्राहक या शब्दाची कायदेशीर व्याख्या काय?

    ‘वस्तू किंवा सेवा’ मोबदला देऊन जो घेतो, तो ग्राहक. अशी सुरुवातीची व्याख्या होती. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यानंतर ‘वस्तू किंवा सेवा’ मोबदला देऊन जो स्वतःच्या उपभोगासाठी घेतो, तो ग्राहक. असा त्यात बदल करण्यात आला.

    भारतामध्ये ग्राहक चळवळीची सुरुवात केव्हा झाली?

    ग्राहक चळवळ ही भारतामध्ये हजारो वर्षांपासून आहे. ती काही अलिकडे आलेली नाही किंवा परदेशातून आयात केलेली नाही. आपल्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, कौटिल्य अर्थशास्त्रात ग्राहक संरक्षण कायदे किंवा तरतूदी आढळून येतात. पण या चळवळीचं पुनरुज्जीवन झालं १९७३ ला. तेव्हा महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडलेला आणि अन्न टंचाईचा फायदा घेऊन व्यापारी लोकांना म्हणजेच ग्राहकांना लुबाडत होते. त्यावेळेस पुण्यामध्ये बिंदुमाधव जोशी आणि काही विचारवंत पुढे आले, त्यांनी ग्राहक संरक्षणाचा विषय लावून धरला. लोकांची सुद्धा त्यांनी चांगली साथ मिळाली आणि राज्य-राज्यात ही चळवळ पोहचून भारतभर पसरली.

    आपल्या देशात ग्राहक चळवळ आहे तशी अन्य देशातही ती आहे. तर या जागतिक ग्राहक चळवळीची सुरुवात कशी झाली? आणि तिचा भारताला काय फायदा झाला?

    १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी अमेरिकन काँग्रेससमोर ग्राहकांच्या सुरक्षिततेचा, माहिती मिळण्याचा, निवडीचा आणि तक्रार मांडण्याचा असे चार हक्क प्रतिपादित केले आणि ग्राहक चळवळीस अमेरिकेत सुरूवात झाली. ९ एप्रिल १९८५ रोजी राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये ‘ग्राहक संरक्षण’ विषयावर सदस्य राष्ट्रांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर करून एकप्रकारे कायद्याचे प्रारूप देण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रसंघात केलेले कायदे हे सदस्य राष्ट्रांना पाळावेच लागतात. भारत देखील सदस्य राष्ट्र असल्यामुळे भारतातील ग्राहक चळवळ फोफावण्यास याची मदत झाली.

    भारतात ग्राहक संघटना किती आहेत? आणि त्या काय कार्य करतात?

    भारतात अनेक ग्राहक संघटना आहेत, बिंदुमाधव जोशींनी स्थापन केलेली अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कन्झ्यूमर ग्राहक सो., मुंबई ग्राहक पंचायत, इ.इ. या संघटना ग्राहकाच प्रबोधन आणि मार्गदर्शन करतात. ग्राहक शिक्षण लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

    ग्राहक संरक्षण कायदा १९८६, ग्राहकाचे संरक्षण कसे करतो?

    ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला ६ अधिकार मिळालेले आहेत. त्यात पहिला अधिकार आहे, सुरक्षिततेचा. जो विशेषतः खाद्यपदार्थाच्या बाबतीत आवश्यक आहे. उदा- पाकीटबंद अन्नपदार्थ आपण घेतो त्यावर उत्पादनाचे नाव, उत्पादकाचे नाव, पदार्थात वापरलेल्या जिन्नसाचे प्रमाण आणि रिटेल किंमत छापणे या कायद्यानुसार बंधनकारक आहे. कारण इथे केवळ ग्राहकाच्या आर्थिक नुकसानीचा नव्हे तर शारीरिक नुकसानीचा देखील विचार केला जातो. दुसरा आहे माहितीचा हक्क. एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. पुढे निवड करण्याचा आणि नाकारण्याचा. वस्तूची निवड हा संपूर्णता ग्राहकाचा अधिकार आहे, विक्रेता त्यास जबरदस्ती करू शकत नाही. तसेच वस्तू पसंत न पडल्यास तो ती नाकारूही शकतो. शिवाय आपलं म्हणणं मांडण्याचा, तक्रार करण्याचा व ग्राहक शिक्षणाचा अधिकार आहे.

    ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दाद मागायची असेल, तर ती कोठे मागावी?

    नुकसान भरपाईच्या रकमेनुसार ग्राहकाने दाद मागायची असते. नुकसान रक्कम कमी असेल तर जिल्हा पातळीवरील ग्राहक न्यायालयात. थोडी अधिक असेल तर राज्य आयोग. आणि एकदमच जास्त असेल तर राष्ट्रीय आयोगाकडे.

    ग्राहक न्यायालयाकडे तक्रार नेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? आणि ग्राहक न्यायालयीन व्यवस्था कशी आहे.

    ग्राहक न्यायालयात जाण्यापूर्वी तुम्हाला विक्रेत्याकडे आणि उत्पादकाकडे दाद मागावी लागते. त्यांनी जर ती दिली नाही, तर रीतसर तुम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागते की, ‘आम्ही तुमच्या विरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करीत आहोत व पुढील सगळ्या परिणामांसाठी आपणच  जबाबदार असाल.’ त्या नोटीसची देखील दखल घेतली गेली नाही, तर ग्राहक न्यायालयात निवाड्यासाठी तक्रार उभी राहते. तिथे तीन न्यायाधीश असतात, त्यापैकी एक महिला असते. साधरणतः तीन महिने (९० दिवस) तक्रार निवारणाचा कालावधी असतो.

    ग्राहक संघटनांची कार्यरचना कशाप्रकारची असते?

    मी अखिल भारतीय ग्राहक संघटनेचा सभासद आहे. ही संघटना राष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. तिची दर वर्षी दोन अधिवेशने  होतात. या अधिवेशनांमधून ग्राहक चळवळ लोकांपर्यंत प्रभावीपणे कशी पोहचवावी, याच प्रशिक्षण दिलं जातं. कार्य सोयीसाठी केंद्र, प्रांत, जिल्हा, तालुका अशी विभागणी केलेली आहे. गाव तेथे ग्राहक पंचायत हे संघटनेचे धोरण आहे; परंतु सध्या  तालुका पातळीपर्यंतचं मर्यादित आहोत. शिवाय शिबीरं घेणं, व्याख्यान लावणं, कार्यकर्ते वाढवणं या गोष्टी चालूच असतात.

    शासनाकडून ग्राहक शिक्षण किंवा ग्राहक चळवळ लोकांपर्यंत कशी पोहचवली जाते?

    पूर्वी शासनाने ग्राहक शिक्षण किंवा चळवळ शाळा, महाविद्यालय आणि इतर माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला; परंतु क्लिष्ट कारभारापायी शक्य होत नसल्याने ज्या सेवाभावी (NGO) आहेत, त्यांवर हे काम सोपवलं. या संस्थाना शासनाकडून अनुदान प्राप्त होतं. शिवाय ‘केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये’ तक्रार निवारणाचे कायदे करण्यासाठी व न्यायदान व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण मंत्रालय’ आहे. याखेरीज जिल्हा पातळीवर ‘ग्राहक संरक्षण परिषद’ स्थापन केलेली असते. ज्यामध्ये १२ शासकीय आणि २८ अशासकीय असे एकूण चाळीस सभासद असतात. २८ सभासद हे कृषि, आरोग्य, शिक्षण, व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात. या परिषदेचे अध्यक्ष स्वतः जिल्हाध्यक्ष असतात.

    महानगरातील ग्राहक आणि ग्रामीण ग्राहक यात काय फरक आहे?

    महानगरातील ग्राहक हा काही प्रमाणात जागरूक तरी आहे; पण ग्रामीण भागातील ग्राहकाला आपली लूट होते याचा थांगपत्ता पण नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे.

    तुम्ही ग्राहक चळवळीच्या कार्यात केव्हा पासून सहभागी झालात?

    मला पाहिल्यापासूनच समाज कार्याची आवड. त्यामुळे मुंबईस नोकरीत असतानाच मी ग्राहक चळवळीच काम सुरु केलं आणि निवृत्तीनंतर तेच काम आता दापोलीत चालू आहे.

    तुम्ही अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे प्रांतीय सभासद आहात, तर तुमच्यावर कोणती जबाबदारी आहे?

    मी कोकण प्रांताचा सभासद आहे. या प्रांतात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. आम्ही तालुका आणि जिल्हा पातळीवरील कार्यकारणीशी समन्वय साधून नवे उपक्रम कसे राबवता येतील, चळवळ कशी पुढे नेता येईल, लोकांच्या आणि कार्यकारणीच्या अडचणी कशाप्रकारे सोडवता येतील हे पाहतो.

     सध्या दापोली तालुका कार्यकारणीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण आहेत? व ही कार्यकारणी कशाप्रकारे कार्यरत आहे.

    श्री. हसमुख जैन हे अध्यक्ष आहेत आणि श्री. संदेश राऊत हे  अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका कार्यकारणीचे उपाध्क्ष आहेत. तालुका कार्यकारणी वर्षाला पाच किंवा सात शाळा आणि महविद्यालय निवडते. तिथे महिन्यातून एकदा तीस मिनिटांचा पन्नास ते साठ मुलांचा वर्ग घेतला जातो. त्यात त्यांना ग्राहक शिक्षण दिलं जातं. या व्यतिरिक्त जागतिक व राष्ट्रीय ग्राहक दिनाच औचित्य साधून  नाट्य, निबंध, चित्र अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवाय ग्रामीण भागात चळवळ पोहचविण्यासाठी ग्रामसभेंमधून विशेष वेळ मागून घेण्यात येतो व तिथे प्रबोधन केलं जातं. ग्राहकांच्या तक्रार जाणून घेण्यासाठी दापोली एस.टी.स्टँड व दापोली केळस्कर नाका (कामगार गल्ली) येथे तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. त्यातील तक्रारी नेहमी पहिल्या जातात.

     तुम्ही लावलेल्या तक्रार पेट्यांमधील तक्रारीची संख्या केवढी आहे?

    संख्या तशी कमी आहे; पण अजिबात नाही असं नाही.

    ग्राहक दिन कोणते आहेत ?

    १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन आणि २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे.

    ग्राहक चळवळ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे?

    ग्राहक चळवळ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी चळवळीत लोकसहभाग आवश्यक आहे. शिवाय ‘स्वतः जागृत होऊन जनजागृती करणे’ हे खूप अत्यावश्यक आहे.

    देशातील राष्ट्रपतींपासून सामान्य नागरीकापर्यंत प्रत्येकजण हा ग्राहक असतो. ग्राहक हा अर्थ व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शिवाय तो या व्यवस्थेतला राजा आहे. पण तो राजा तेव्हाच आहे, जेव्हा त्याला त्याच्या कर्तव्यांची आणि अधिकारांची माहिती आहे, जेव्हा त्याची फसवणूक होत नाहीये. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने जागरूक असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राहक शिक्षण आत्मसाद केलं पाहिजे.

    1 COMMENT

    1. आण्णाचा मी आभारी आहे. खर तर मी पुज्य साने गुरूजी विद्या मंदिर पालगड इयत्ता ९ मध्ये शिकत असताना आण्णा आमच्या शाळेत येत आसत आणि आम्हा सर्वांना ग्राहक संरक्षण कायदा,ग्राहक तक्रार निवारण कायदा. ग्राहकी फसवणूक केली तर काय काय करावे असे अनेक प्रकार आणि उदाहरण आण्णा आम्हाला ते देत असत ते आले की आम्ही आनंदी होत असु कारण आम्हाला प्रयत्न वेळी नवीन पान आणि नवीन गोष्टी ते सांगत असत त्यांनी आम्हाला पेन आणि वही सुद्धा दिली होती. मला चांगलेच आठवणीत आहे एके दिवशी विज्ञानचा तास होता वर्ग शिक्षकांनी माला उभ केल आणि बोले एक नाटक करणार आहोत नाटक मी शांतच झालो हातात ४ ते ५ पाने नाटक लिहिलेलिहिलेले स्क्रिप्ट हातात दिली. सरांनी वाचण्यास सांगितले वाचुन तुम्ही कोणता रोल करणार हे ठरवा आण्णा खूप छान असे नाटक लिहिले होते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद होता ग्राहक मंच काय काम करतो. फसवणूक झाली की काय कारवाई करावी कोठे न्याय मिळवून दिला जातो आशा अनेक गोष्टी त्यात होत्या नाटक बसल सराव सुरू झाला एक दिवशी आण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आम्ही अमच नाटक सादर केल. काही दिवसांनी आम्हाला समजले की आम्ही तालुतालु प्रथम आलो. आमची निवड मुंबई मध्ये नाटक स्पर्धेत झाली. आमच्या काही विद्यार्थीनी मुंबई सुद्धा पाहिली नव्हती मुंबई दाखवारे आण्णा होते काराण आम्ही त्याच्यामुळे तथे पोचलो होतो. आम्हि पालगड वरुन सकाळी निघालो दुपारी मुंबई दादर ला पोचलो नाटकी स्पर्धे ज्या ठिकाणी होनार होती तिथे आलो आण्णा तिकडे हजर होते आम्ही तर उंच उडी मारली होती काराण गावातून डायरेक्ट मुंबई आशी आमच्या शाळेच नाव गेतल गेले आण्णा आणि आमचे सांगात होते काही घाबरू नका. आम्हि नाटकाला सुरू केले नाटक सुंदर झाले आसे बोलू लागले आम्ही मात्र घाबरून गेलो होतो सर्व नवीन होते आमच्यासाठी माग आम्ही जेवण झाल्यावर निकालासाठी थांबलो निकाला मध्ये आमचा नंबर नाही आला आण्णा पण थोडे वाइट वाटले तिथे आम्हाला सहभाग प्रमाणात देण्यात अले. ते माझ्याकडे माझ्या फाईल मध्ये आहे ते पाहिल्यावर मला माझी शाळा माझे नाटकात होते य ते मित्र आमचे शिक्षक आणि आण्णा आठवतात.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here