दापोलीतील बालवाङ्मयकार ‘श्री. विद्यालंकार घारपुरे’

  0
  1272

  आदरणीय, श्री. विद्यालंकार घारपुरे सरांचा जन्म मुंबई मध्ये चेंबूर येथे झाला. पण त्याचं प्राथमिक शिक्षण (१ ते ४ पर्यंतच) वडगाव बारामती येथे झालं. कारण त्यांची आजी शिक्षिका होती व नातवाचं सुरूवातीचं शिक्षण आपल्याच शाळेत व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. पुढे पाचवी ते बी.कॉम.पदवी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. १९८० ला स्टेट बँकेच्या गोवा शाखेत नोकरी मिळाली. गोव्यात राहत असताना साधारणतः ८१ वा ८२ सालात त्यांनी पहिली ‘आठवण’ ही कथा लिहली. जी ८४-८५ दरम्यान महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाली. पुढे गोव्यातून म्हापसा, खेड व लव्हेल येथे सरांची बदली झाली. त्यावेळी लेखन चालू होते; पण अगदी फुटकळ स्वरूपात. ८४ साली त्यांनी दापोलीमध्ये घरासाठी जागा घेतली. ( दापोलीची निवड एवढ्यासाठी केली की, दापोलीतील वातावरण शांत, सुंदर, आल्हाददायक आणि दापोली मुंबई-पुण्यापासून तितकीच जवळ.) ८६ साली डॉ. नरेंद्र दाभोळकरांशी सरांचा अगदी निकटचा संबंध आला.

  दाभोळकरांच्या कार्यात सहयोग किंवा योगदान म्हणून त्यांनी १० वर्षे (९६ पर्यंत) अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्य केले. त्यावेळी समितीसाठी आणि दै.सागरमधे प्रबोधनात्मक आणि प्रचारात्मक भरपूरसे लिखाण केले. ९६ नंतर नोकरीत बढती मिळाल्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीसाठी आणि लिखाणासाठी वेळ देणे त्यांना कठीण झाले. २००८ ला त्यांनी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली.( त्यावेळी ते डेप्युटी मॅनेजर होते.) त्यानंतर सागर, लोकसत्ता, सकाळ, परिवर्तनाचा वाटसरू साप्ताहिक, पत्री सरकार मासिक, कोकणराजा, पुरुष उवाच व अन्य छोट्या छोट्या साप्ताहिकातून वगैरे नियमित लिखाण केले. सोबतच बँक कर्मचारी स्पर्धा परीक्षा व लहान मुलांच्या शालेय परीक्षा यांच्या अभ्यासाचे क्लासेस सुरु केले. क्लासच्या निमित्ताने मुलांच्या सान्निध्यात अधिक वेळ राहिल्यामुळे त्यांच्या लिखाणाचा रोख बदलला. अंगणवनातील कथा, बबडूच्या गोष्टी, लिंबू-टिंबू, छोटा डॉन, बेटू, बदल अशी सात ते आठ त्यांनी बालसाहित्याची पुस्तके लिहली. यापैकी पाच अक्षरमानव या संस्थेने आणि दोन कोल्हापूरच्या प्रत्यय प्रकाशनाने प्रसिद्ध केली. त्यांच्या ‘बदल’ या बालकादंबरीला इचलकरंजीच्या आपटे वाचनालयाकडून २०१५ साली ‘बालसाहित्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार’ मिळाला. या व्यतिरिक्त सरांना चालना मासिकाकडून प्रबोधनात्मक साहित्य लेखनासाठी आणि शांताबाई सहस्रबुद्धेंकडून लेखन व सामाजिक सेवेसाठी पुरस्कार प्राप्त झाले. सर राजन इंदूलकरांच्या ‘श्रमिक’ संस्थेमार्फत आदिवासी व भटक्या जमातींसाठी काम करत आहेत. गेली चार वर्ष चिपळूण व इतर भागात जाऊन ते आदिवासी पाड्यातील मुलांना शालेय शिक्षण देतात.( बेसिक एज्युकेशन हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. या उपक्रमा अंतर्गत.) शिवाय अभय बंगाल आणि MKCL  चे CEO विवेक सावंत यांनी सुरु केलेल्या ‘कुमार निर्माण’ या उपक्रमाचे दापोलीत कार्य करतात.( सजग, सुजाण व कार्यक्षम कुमार तयार करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे.)

  सरांना लेखनाबरोबरच वाचनाची आणि चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड आहे. शन्ना नवरे, नरहर कुरंदीकर, रावसाहेब कसबे, विंदा करंदीकर हे त्यांचे आवडते लेखक आहेत. चित्रपटांमध्ये त्यांना चार्ली चापलीनचा ‘मॉर्डन टाईम्स’ आणि नसिरुद्दीन शहा यांचा अभिनय असलेला ‘मंथन’ सिनेमा खूप आवडतो.

  सरांनी बालसाहित्याप्रमाणे मोठ्यांसाठीही अनेक कथा व कविता लिहिल्या आहेत. काही कथा ‘अखेरपर्यंत’ या कथासंग्रहातून प्रकाशित झाल्या, काही अप्रकाशितचं आहेत. सरांच्या साहित्याचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्याचं साहित्य हे बऱ्याच अंशी दापोलीच्या समाजजीवनावर बेतलेलं आहे. ‘बदल’ या कादंबरीतून तर दाभोळकरांसोबत दापोलीत केलेल्या कार्याचं प्रतिबिंब उमटलं आहे.

  घारपुरे सरांनी लिहलेली बाल कविता लहान मुले हसत-खेळत म्हणताना –

   

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here