कोकणातील गणेशोत्सव, गौरीपूजन आणि ओवसा

1
8888

कोकणातील गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रासह जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सवातील पारंपारिक गौरीपूजन व पारंपारिक ओवसा सण खूप प्रसिद्ध आहे. गौरीपूजनाच्या अनेक पारंपारिक प्रथा व विधी कोकणात प्रचलित आहेत. दापोलीत गौरी-गणपती सणासाठी मुंबई, पुण्यातून अनेक चाकरमानी आपापल्या गावी येतात.

सर्वसाधारणपणे गणेशचतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरीच्या आगमनासाठीचे व पूजनासाठीचे विधी ठिकठीकाणी निराळे आहेत. गौरी व गणपती हे दोन्ही निसर्गदेवता मानण्यात येतात. अनादि काळापासून मानव निसर्गाची विविध रुपात पूजा व उपासना करत आला आहे. गौरी व गणेशपूजन हे देखील निसर्गपूजेचेच प्रतिक आहे. गौरी ही निसर्ग देवता असून तिचे वास्तव्य निसर्गातील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असते असे मानतात. गौरीपूजन हा प्रामुख्याने स्त्रियांचा सण आहे. कोकणातील स्त्रिया गौरीपूजनासाठी खूप तयारी करतात. गौरी आगमनादिवशी सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पारंपारिक व पीढीजात ठरलेल्या पाणवठ्यावर जातात. नदी, विहीर किंवा गावातील तळ्याकाठी गौरी आवाहन पूजा करण्याची पारंपारिक प्रथा आहे. गौरी आणण्यासाठी जाताना गावातल्याच पारंपारिक कारागिरांनी बांबूपासून बनवलेल्या रोवळीत हळद, तेरडा, आघाडा, यांचे एकेक रोपटे घेतात. या रोपट्यांनाच गौरीचे प्रतिक मानतात. रोवळी हे बांबूच्या बारीक व पातळ काड्यांपासून विणकाम केलेले सच्छिद्र उभट भांडे असते. पुर्वी या रोवळीचा दैनंदिन वापरात महत्वाचा वाटा होता. दररोजच्या जेवणाच्या भातासाठीचे तांदूळ धुण्यासाठी, भाकरीच्या कण्या धुण्यासाठी व इतर धान्य धुवून वाळविण्यासाठी अशा रोवळीचा वापर होत होता. मात्र आता कालौघात ही रोवळी कालबाह्य झाली असून गौरीचा सण , लग्नकार्य वगळता इतर वेळेस या रोवळीचा वापर आढळत नाही.

    

रोवळीत वर उल्लेख केलेली रोपे पानाचा विडा, शेण, अगरबत्ती, करंडा, रांगोळी, फुले, पाण्याचा तांब्या वगैरे साहित्य घेऊन सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पाणवठ्यावर जातात. सोबत छोटी मुले देवाची घंटी वाजवत जातात. या दिवशी पाणवठ्याचा परिसर सर्व मुलांच्या घंटीवादनाने दुमदुमून जातो. पाणवठ्यावर गेल्यावर सर्व स्त्रिया आपापली जागा ठरवून ती जागा गोलाकारात शेणाने सारवितात. सारविलेल्या गोलाकार जागेत छान वेलबुट्ट्यांची रांगोळी काढतात. यानंतर गौरी आगमनासाठीच्या पूजाविधिस सुरुवात होते. यावेळी सर्व स्त्रिया गौरीची सामुहिक गीते गातात. सारविलेल्या व रांगोळीने सजविलेल्या जागेत रोवळीतील रोपे ठेवून सर्व स्त्रिया या रोपट्यांची व विड्याची विधिवत पूजा करतात. पूजेनंतर सर्व स्त्रिया गौरी देवतेस आवाहन करून पूजा केलेल्या रोपट्यांमध्ये सूक्ष्म प्रवेश करण्याची प्रार्थना करतात. विधिवत पूजेनंतर गौरीने प्रवेश केलेली रोपटी रोवळीत परत श्रद्धापुर्वक ठेवून विडा पाणवठ्यावरील पाण्यात सोडतात. सर्व स्त्रियांनी पाण्यात सोडलेले पानाचे विडे पूर्वी सोबत गेलेली छोटी मुले गोळा करत असत. आता सर्रास असे विडे कोणी गोळा करत नाहीत. पानाचा विडा पाण्यात सोडल्यावर तेथील पाण्याची चूळ तोंडात भरून सर्व स्त्रिया आपापली गौरीची रोवळी घेऊन घराकडे निघतात. घराची पायरी चढेपर्यंत तोंडातली पाण्याची चूळ सोडायची नाही, वाटेत बोलण्यासाठी अजिबात तोंड उघडायचे नाही अशी पारंपारिक प्रथा आहे. घराच्या पायरीवरून घरात प्रवेश करताना मागे वळून ती चूळ बाहेर सोडून या स्त्रिया गौरीची रोवळी गणपती बाप्पाजवळ उजव्या बाजूस विधिवत ठेवतात. मध्यंतराच्या वाटेत पाणवठ्यावरून घरी येईपर्यंत सोबतच्या छोट्या मंडळींचे घंटीवादन सुरुच असते. गौराई देवी आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पास भेटावयास, त्याची खुशाली घेण्यासाठी आता आपल्या घरात अवतरली आहे, आता ती आपल्या गणेश बाळाचे लाड करण्यात मग्न होईल या श्रद्धेने सर्व स्त्रिया दुसर्‍या दिवशीच्या गौरीपूजनाच्या तयारीत रमून जातात.

गौरी आगमनाच्या दुसर्‍या दिवशी पारंपारिक गौरीपूजन सोहळा साजरा होतो. कोकणातील घराघरात प्रत्येक गणपतीकडे अशी गौराई येत असली तरी काही अपवादात्मक गणपतींकडे गौराई आगमन व पूजन होत नाही. अशा घरांमध्ये गौरी आगमन न होण्याच्या अनेक दंतकथा, आख्यायिका, समज व गैरसमज प्रचलित आहेत. गौरीपूजनादिवशी सकाळपासून गौरीपूजनाची तयारी सुरु होते. गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू दागदागिने, कपडे घालून गौरीला अतिशय आकर्षक रुपात सजविण्याची पद्धत आहे. पुर्वी या गौरींचे मुखवटे सर्वत्र लाकडाचे असत. अतिशय रेखीव व सुबक कोरीवकाम करून शेकडो वर्षांपुर्वी कारागिरांनी घडविलेले लाकडी मुखवटे आजही अनेक घरांमध्ये वापरले जातात. गणपतीच्या कारखान्यातून असे लाकडी मुखवटे दरवर्षी रंगवून घेतले जात असत. आता चांदी, पितळ व इतर धातूंपासून घडविलेले आकर्षक मुखवटे सर्रास वापरले जातात. तिरड्यात बांबूची काठी घट्ट उभी करुन तिला केवनीच्या सालीच्या दोरांनी पुर्वी गवताच्या पेंढ्यापासून विणलेले हात बनवून बांधले जात असत. प्रत्येक घरात असे हात बनवणारी बुजुर्ग माणसे होती. मात्र आता पुठ्ठ्याचे व काही ठिकाणी धातूचे हात वापरतात. काही ठिकाणी बाजारात तर संपूर्ण सजवलेली गौराईची मूर्ती उपलब्ध आहे. गौरीचे हात म्हणून काही ठिकाणी कळलावी या वेलीची फुले किंवा तेरड्याची रोपटी वापरतात. कळलावीची फुले अतिशय सुंदर व रंगीत असतात. त्यांना खूप लांब देठ असतो. कळलावी ही वनस्पती नैसर्गिकरीत्याच अति जहाल विषारी वनस्पती आहे. मात्र ही वनस्पती अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. बिषबाधेच्या अनेक विकारांवर व सर्पदंशावरील विषबाधा उतरविण्यासाठी या वनस्पतीच्या मुळ्यांचा वापर करतात. ठेवणीतली साडी चोळी व ठेवणीतल्या अलंकारांनी या गौराईस सजवतात. काही ठिकाणी लाकडाचे तिरडे न वापरता लाकडी खुर्चीत गौराई सजवतात.

     

सजवलेल्या गौराईला गणपतीच्या उजव्या बाजूस उभी करुन तिच्या साडीचा पदर गणपतीच्या डोक्यात ठेवतात. त्यानंतर गौरीपूजनास विधिवत सुरुवात होते. गौरीसमोर दिवाबत्ती लावतात. रानफुले व रानफळे वापरून गौरीजवळ सजावट व आरास करतात. रानभेंडी व तीळाच्या फुलांच्या माळा गौराईला घालतात. गौराईच्या पूजनासाठी दूर्वा, बेल, शमि, आघाडा, धोतरा,तुळस, बोर, माका, कण्हेर, रुई (मंदार ), अर्जुन, पिपळ, डाळिंब, अगस्ति, केवडा, जाई, डोरली, मालती यांसारख्या वनस्पतींची पाने व फुले वापरतात. तसे पाहिल्यास गौराईपूजनासाठी कोणतेही पूजासाहित्य बाजारातून विकत आणावे लागत नाही. रानावनात,आढळणारी फूलपत्रीच गौराईस अधिक प्रिय आहे. या फूलपत्रीमधील सर्वच वनस्पती विविध औषधी गुणांनी युक्त आहेत. फूलपत्रीमधील दूर्वा ही गवतसदृश वनस्पती उष्णता, व पित्त नाशक आहे. याशिवाय बद्धकोष्ठ निवारक व रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. माका ही वनस्पती छोट्या रोपट्याच्या स्वरुपात कोकणात सर्वत्र सहज उपलब्ध होते. माका ही वनस्पती बहुपयोगी आहे. माका केसवर्धक व केस संवर्धक आहे. काविळ व मूळव्याध या विकारांवर माका अतिशय गुणकारी आहे. आघाडा ही सहज दिसणारी व उपलब्ध होणारी वनस्पती स्त्रियांच्या विविध आजारांवर गुणकारी आहे. याशिवाय आघाडा कफनाशक व विषहारक आहे. धोतरा ही जहाल विषारी वनस्पती आहे. याची पाने व फुले गौराईच्या पुजेसाठी वापरतात. धोतऱ्याच्या मुळ्या विषबाधा कमी करण्यासाठी सर्रास वापरल्या जातात. तुळस ही वनस्पती प्रत्येक घराच्या परसात असतेच. ती कधी लावली जाते तर कधी आपोआपच रुजते व वाढते. तुळस कफनाशक, पित्तनाशक व उष्णतानाशक आहे. अगस्ति ही वनस्पती छोट्या वृक्षाच्या स्वरुपात आढळते.

पुर्वी प्रत्येक घरासमोरील अंगणात तुळशीवृंदावनाजवळ अगस्त्याचे एक तरी झाड असायचेच. या झाडाची पांढरीशुभ्र फुले गौराईस वाहतात. अगस्ति या झाडाची कडक निगा व स्वच्छता राखली जाते. अगस्ति हा अतिशय पवित्र वृक्ष समजला जातो. पूर्वी सकाळी अंघोळीनंतर शुचिर्भूत होऊनच अगस्तिची फुले तोडली जात असत. आता आधुनिक बागेत अगस्तिच्या झाडाचे अस्तित्व खूप दुर्मिळ झाले आहे. गौराई पूजेसाठी लागणारी सर्व फूलपत्री कोकणात सर्वत्र सहज उपलब्ध होणारी आहेच पण विविध मानवी विकारांवर अनेक औषधी गुणधर्म असणारी आहे. निसर्गपूजेसोबतच निसर्गातील विविध वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्व अधिक गडद करणारा गौरीपूजन सण आहे.

दुपारी गौराईची विधिवत पूजा आटोपल्यावर घरातील सर्व सुवासिनी गौराईसमोर ओवसा भरतात. आपल्या धन्याला सुख व ऐश्वर्य लाभावे, निरामय आरोग्य लाभावे, वंश वारसा सुदृढ व्हावा यासाठी पतीच्या नावाने सुवासिनी गौराईसमोर ओवसा भरतात. ओवश्यात वाण म्हणून वापरण्यात येणारी संपूर्ण सामग्री ही प्रत्येक घराच्या परसात सहज उपलब्ध होणारी असते. गावातील पारंपारिक स्थानिक कारागीर ओवश्यासाठी लागणारी बांबूची सूपे पुरवितात. आता ही सूपे रोख रक्कम देऊन विकत घेतली जातात. पूर्वी हे कारागीर सूपे, सूपल्या व रोवळी गावातील ठरलेल्या प्रत्येक घरात देऊन जायचे. या सामग्रीचा वस्तुरुप मोबदला म्हणून पावसाळ्यानंतर दिवाळीत शेतकरी भात किंवा भुईमूगाच्या वस्तुरुपात देत असत. आता अशा स्थानिक कारागिरांनीही हा लघुउद्योग कधीच बंद केला आहे. ओवश्यासाठी लागणारी सूपे, सूपल्या, रोवळी आता बाजारात विकत मिळतात. ओवश्यात भरण्यासाठी वाण म्हणून परसातल्या भाज्यांची पाने प्रामुख्याने वापरतात. पडवळ, भोपळा, काकडी, करांदा यांसारख्या भाज्यांच्या वेलांची पाने चटईवर मांडून प्रत्येक पानाला खोबरेल तेलाचे एकेक बोट लावतात. नंतर त्या पानाला हळद व कुंकवाचे बोट लावतात. या वाणाच्या प्रत्येक पानात पडवळ, भेंडी, दोडका, करांदा, काकडी यांची एकेक फोड ठेवतात. अशी भरलेली वाणाची पाने ओवशाच्या सूपात व्यवस्थित मांडतात. सूपात मध्यभागी एक नारळ व पानाचा विडा ठेवतात. ओवशाच्या सूपालाही कापसाचा दोरा बांधून व हळद, पिंजर लावून मानवतात.

गौराई, गणपती व घरातल्या इतर देवतांसमोर सूपातील एकेक वाणाचे पान ठेवून पतीच्या, मुलांच्या व घरातील सर्वांच्याच कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. घरातील कुमारिका मुली सुपलीत ओवसा भरतात. लग्नानंतर हा ओवसा त्यांच्या सासरी सुपूर्द केला जातो. घराण्याची वंशवेल वाढण्यासाठी, घराण्याच्या कल्याणासाठी ही गौराईसमोर ओवसा भरण्याची पारंपारिक प्रथा आहे. याशिवाय आपल्या घराच्या परसात तयार होणारी भाजी व इतर फळे आधी निसर्गदेवतेस अर्पण करून नंतरच ती कुटुंबासाठी वापरण्याची कृतज्ञ भावनाही या प्रथेमागे आहे. गौराईसमोर व इतर देवतांसमोर ओवश्याचे वाण अर्पण केल्यावर आपल्या घरातील, शेजारील, नातेवाईक, गावातील ज्येष्ठ व बुजुर्ग व्यक्तिंना आदरपूर्वक ओवश्याचे वाण देऊन या सुवासिनी त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. लग्नानंतर पहिलाच ओवसा असेल तर पती व पत्नी असे जोडपे ओवसा पूजून अशा बुजुर्ग व ज्येष्ठ व्यक्तिंसमोर नतमस्तक होऊन त्यांचे मंगल आशीर्वाद घेतात. गावातील व जवळपासच्या सर्व नातेवाईकांकडे फिरून ओवश्यातली वाणे देऊन अशी जोडपी वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होतात. ओवसणे या क्रियापदाचा अर्थही ‘ गावभर फिरणे ‘ असाच आहे. वडीलधारी व बुजुर्ग व्यक्तिंसमोर नतमस्तक होऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे ही आपली संस्कृती या सणाच्या निमित्ताने जपली जाते.

गौराईपूजनानंतर रात्री गौरी गणपतीसमोर भजन, आरती व बायकांच्या फुगड्या होतात. पारंपारिक फुगडीगीते गातानाच फुगडीनृत्य करून प्रत्येक घरातील स्त्रिया रात्रभर जागरण करून गौराईपूजनाचा हा संपूर्ण दिवसभराचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. दुसर्‍या दिवशी गोरी गणपतीला गोडधोड नैवेद्य दाखवून व विधिवत पूजा करून गौरी गणपतीचे ठरलेल्या ठिकाणी विसर्जन केले जाते. अनेक ठिकाणी ज्या पाणवठ्यावरून गौराईला आणतात त्याच पाणवठ्यावर गौरीचे विसर्जनही करतात. काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या ठिकाणीच गौराईचेही विसर्जन करतात. अनेक ठिकाणी पुरुष मंडळी गणपती विसर्जनासाठी नदीवर तर सुवासिनी स्त्रिया पाणवठ्यावर गौराईचे विसर्जन करतात. गौरी विसर्जन केल्यावर विसर्जनासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना तांदळाची, नाचणीची भाकरी किंवा वडे आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी प्रसाद म्हणून वाटली जाते. गौरी गणपतीची यथाशक्ति सेवा केल्याच्या आनंदात, मात्र आपल्या घरातील कोणी प्रिय व्यक्ती निघून गेल्याची हुरहुर मनात आणत किंचित डबडबल्या डोळ्यांनी सर्वजण जड मनाने आपापल्या घरांकडे परततात.

1 COMMENT

  1. आपल्या कोकणातील गौरी गणपती सणाची खूप चांगल्या प्रकारे,छान आणि सविस्तरपण माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार…..तसेच मला गौराई मातेच्या पुढ्यात रात्री लक्ष्मी ठेवतो आणि सकाळी घेतो त्यानंतर अनंत चतुर्दशीला किंवा त्यानंतर ‘लक्ष्मी उजवणे’ या प्रथेची माहिती हवी होती. 😊धन्यवाद 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here