मोहरम हा इस्लामिक पंचांगातील प्रथम महिना आहे. हा महिना रमजान इतकाच पवित्र मानला जातो. या महिन्यात भांडणतंटा, लढाई करणे निषिद्ध आहे. मोहरमच्या महिन्यातील दहावा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या दिवसाला ‘अशूरा’ असे म्हणतात. चंद्रकोर दर्शनानंतरचा दहावा दिवस हा अशुराचा असतो. या दिवशी करबला युद्धात शहादत प्राप्त झालेल्या मोहम्मद पैगंबरांचे नातू (मुलगी फातिमाह व अली यांचा पुत्र ) इमाम हुसेन व त्यांचे कुटुंबीय – अनुयायांची आठवण केली जाते. त्याच बरोबर मोहम्मद पैगंबरांचे जावई अली व अलींचा मोठा मुलगा हसन यांचेही स्मरण केले जाते. कारण या युद्धाच्या दरम्यान त्यांनाही फार त्रास सहन करावा लागलेला आणि हे युद्ध मुस्लिम समुदायाच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढण्यात आलेलं.
( करबला हे एक इराणमधील स्थान आहे. १० ऑक्टोबर ६८० [ इस्लामिक पंचांगानुसार १० मोहरम ६१ AH] ला ‘उमय्यद खलीफा यझीद’ आणि ‘इमाम हुसेन इब्न अली ‘ यांच्यामध्ये करबला येथे युद्ध झालं. या युद्धात यझीद खलिफाची सुमारे ४००० ते ३०००० पर्यंतची फौज होती. आणि इमाम हुसेन त्यांच्या अनुयायांसहीत १४५ च्या संख्येत होते. या संख्येत महिलांचा आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. करबलाचं युद्ध हे अन्याय, अत्याचाराविरोधी युद्ध होतं. त्यात इमाम हुसेन आणि त्यांच्या सर्व लोकांना शहादत प्राप्त झाली.)
संपूर्ण देशाप्रमाणे दापोलीत देखील मोहरम मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. येथे देखील चंद्र दर्शनानंतर दुसऱ्या -तिसऱ्या दिवशी ताजिया बनविण्यात येतो. हा ताजिया दोन दिवस मंडपात ठेवून आठव्या, नवव्या दिवशी मिरवणूक काढली जाते आणि दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर तो विसर्जित करण्यात येतो. मिरवणुकीला ढोल-ताशे, सनई ही वाद्ये असतात. हा ताजिया पूर्वी बांबूच्या काठ्यांपासून तयार करण्यात येत असे. आता साग लाकडाचा बनविण्यात येतो. रंगीत कागद वापरून त्याला सुशोभित करण्यात येते. त्यात काही ठिकाणी इमाम हसन- हुसेनचे पंजे ठेवण्यात येतात,तर काही ठिकाणी केवळ त्यांची नावे लिहली जातात. ताजिया मिरवणुकी दरम्यान पंजे नाचवले जातात. हे पंजे बऱ्याचदा धातूचे असतात. मिरवणुकी आधी त्यांचे पूजन केले जाते. (दाभोळमध्ये तांबडे मोहल्ला येथे दर्ग्यामध्ये ५ पंजे पूजले जातात.) हे पंजे प्राप्त होण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. दाभोळमधील लोक तेथील पंजे एका खेकड्याच्या पोटी सापडले सांगतात तर दापोलीत काही ठिकाणी ते समुद्रात संदूक पेटीतून वाहत आलेले सांगतात. काही ठिकाणी ताजिया मोहम्मद पैगंबरांच्या मजारची प्रतिकृती म्हणून मानण्यात येते. दापोलीत ताजिया मिरवणुकीत मुस्लिम लोकांबरोबर हिंदू लोकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
मुस्लिम समुदायातील काही लोक मोहरमचा संपूर्ण महिना उपवास करतात. हा उपवास अनिवार्य नाही; परंतु मोहरम महिना पवित्र म्हणून हा उपवास केला जातो.
संदर्भ
Wikipedia
दिलदार वणकर, दाभोळ
वाहिद बालाभाई, दाभोळ
शाकिर शेख, दापोली