श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. समस्त कोळी बांधवांचा मोठा सण. हा सण ते पारंपारिक पद्धतीने सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करून साजरा करतात. हा नारळ अर्पण करताना दर्याची मनोभावे पूजा केली जाते आणि दर्याला गाऱ्हाणी घातली जातात. “हे दर्या राजा आम्हाला हे नवीन मासेमारीचे वर्ष सुख-समृद्धीचे जाऊदे. तसेच वादळ, वारा व इतर आपत्तींपासून आमचे रक्षण कर”. मग दोन-तीन महिने पावसाळ्यामुळे थांबवलेल्या मासेमारीला पुन्हा सुरूवात होते.
आपल्या दापोलीत हर्णे येथील फत्तेहगड येथील कोळी बांधव नटून-थटून राधाकृष्ण मंदिरात एकत्र जमतात. नारळाची साग्रसंगीत पूजा करतात आणि वाद्य वाजंत्रीं सोबत मिरवणूक दर्याकडे निघते. दर्याला नारळ अर्पण केल्यावर देवाची आरती केली जाते. आरतीचा प्रसाद घेऊन लोकं आपापल्या घरी परततात.
असे अनेक वाडयांचे नारळ, वैयक्तिक नारळ या दिवशी दर्यावर येतात आणि दर्याला अर्पण होतात. या सणाला कोळी बांधवांमध्ये आनंद दर्या इतकाच विशाल असतो.
टीम तालुका दापोलीने हर्णे बंदरावर जाऊन कोळी बांधवांसोबत नारळी पौर्णिमेच्या सणाचा आनंद लुटला आणि हा सण कसा साजरा केला जातो याचा आढावा ही घेतला. तालुका दापोली प्रस्तुत ‘सण नारळी पौर्णिमेचा’ (दापोली-हर्णे बंदर) हा विडिओ जरूर पहा.