महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नवरात्री दरम्यान ‘रासगरबा’ पाहायला मिळत असला तरी; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणामध्ये हादगा भोंडल्याची पारंपारीक लोककला जोपासलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीमध्ये जालगाव, आंजर्ले, दाभोळ अशा अनेक गावांमधून या लोककलेची परंपरा अविरत चालू आहे. अश्विन महिन्याला सुरुवात झाली की स्त्रिया अंगणात किंवा एखाद्या मोकळ्या जागेत एकत्र जमून हादगा भोंडला खेळतात. यामध्ये मधोमध हत्तीची प्रतिमा स्थापन करून त्याची आरास व पूजा केली जाते. मग त्याभोवती गोल फेर धरून गाणी म्हणत भोंडला खेळला जातो. आता हत्तीचीचं प्रतिमा का? तर त्यावेळी वर्षा ऋतू संपून शरद ऋतूचे आगमन झालेले असते. सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश झालेला असतो. त्यामुळे निसर्ग अतिशय सुंदर झालेला असतो. फुलांची, पानाची, धान्याची समृद्धी आलेली असते. या समृद्धीचं प्रतीक म्हणून हत्तीची पूजा केली जाते. शिवाय नवरात्रीत शक्तिपूजा होते. हत्ती हा शक्तीचं,बलाचं प्रतीक आहे.
या भोंडल्यामधून एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली पारंपारिक गाणी गायली जातात. या गाण्यांमध्ये गणपती, सरस्वती, अंबा, राम-कृष्ण अशा देवाधिकांची आणि नणंद-भावजय, सासू-सून इ. विविध नात्यांवर आधारलेली असतात. काही काही गाण्यांमध्ये खोडकरपणा, चेष्टा तर ओतप्रोत भरलेल्या दुःखी भावना देखील असतात.
भोंडल्याच्या समाप्तीला खिरापत वाटली जाते. ही खिरापत भोंडल्यातल्या स्त्रिया घरी करून आणतात. यामध्ये गोड,तिखट,कडू,आंबट कोणत्याही चवीचा पदार्थ असतो. पण हा पदार्थ लपवून आणला जातो. खिरापतीला आणलेला पदार्थ कोणता आहे? हे आणणाऱ्या स्त्रीशिवाय कोणालाही माहीत नसते. इतरांनी तो पदार्थ ओळखायचा असतो. ओळखल्यावरच खिरापत वाटली जाते. या खिरापतीची सुद्धा गाणी आहेत.
उदा.
सर्प म्हणे मी एकूला, दारी आंबा पिकूला
दारी आंब्याची कोय गं, खिरापतीला काय गं
सांगलीचा गणपती आहे सोन्याचा
त्याला बाई पांघरून भरजरी शेला
त्याच्या बाई नैवेद्याला खडीसाखर
दोन्ही बाजूस दोन आहेत काळे उंदीर
त्याच्या बाई नैवेद्याला केशरी आंबा
दोन्ही बाजूस दोन आहेत नाचत्या रंभा
त्याच्या बाई नैवेद्याला मोडकी ताट
दोन्ही बाजूस दोन आहेत चंदनी पाट
त्याच्या बाई नैवेद्याला केशरी वड्या
दोन्ही बाजूस दोन आहेत नागाच्या फण्या
हादगा देव
हस्त हा दिन्याचा राजा
तयासी नमस्कार माझा
नमस्कार सरशी आला वारा
आधी आल्या मेघधारा
मागून आल्या गर्जत गारा
वाजे गं चौघडा रुणझुण
आला गं हादगा पाहुणा
जाई, जुई, शेवंती
पुष्पे ही नाना परी
हार गुंफिते कुसरी
वाहते मी हादग्या
वरीदूध,पेढे, नैवेद्य दाविते
हादगा देव मी पुजिते