कोकणातील वाद्यवृंदामध्ये एक पारंपरिक वाद्यकला म्हणजे खालूबाजा. समारंभ, मिरवणूका, सण – उत्सव अशा मंगल प्रसंगी खालूबाजा प्रामुख्याने आढळून येतो, अर्थात वाजविला जातो. एक ढोल, एक टिमकी आणि एक सनई या त्री वाद्यांचा संच खालूबाजात असतो. हे वाद्यन किती वर्षे जुने आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक खालूबाजा स्पर्धांतून परीक्षण करणाऱ्या श्री. प्रभाकर चोरगे व अन्य काही खालूबाजा वाजंत्रीना भेटलो. त्यातून खालील माहिती प्राप्त झाली.
प्रथम खालूबाजाची सुरुवात कुठून, कशी झाली हे सांगणे कठीण असले तरी सुमारे पाचशे वर्ष कोकणात आनंद व दुःखाच्या प्रसंगी खालूबाजा वाजविला जातो. खालूबाजाच्या वाद्यवृंदामध्ये ढोल, टिमकी हे चर्मवाद्य असल्यामुळे पूर्वी कातडी सोडविणारा, कमावणारा समाजच खालूबाजा वाजवीत असे. कालांतराने कुणबी, मराठा व अन्य जातसमाजांनी ही वाद्यकला स्वीकारली आणि जोपासली. त्यामुळे वाद्यसंगीतात प्रयोगशीलता आली आणि खालूबाज्यात वल्हारी बाजा, नाईक बाजा, कच्छी बाजा असे उपप्रकार आले.
सध्याच्या आधुनिक काळाला अनुसरून दिवसेंदिवस या वाद्यकलेत, वाद्यसंगीतात बदल होत आहेत. पण याचा लोकमागणीवर कोणताही परिणाम नाही. उलट लोकमागणी वाढत आहे. खालूबाजाविषयी अधिक आणि संपूर्ण माहितीसाठी हा खालील माहितीपट पहा.