नारदीय कीर्तन

1
6971

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात कीर्तन परंपरेला अनन्य साधारण स्थान आहे. ही परंपरा चंद्र-सूर्यासारखी प्राचीन, तेजस्वी, पवित्र आणि समृद्ध आहे. भागवत धर्मातील जवळपास सर्वच संतांनी भागवतधर्मध्वजा फडकती ठेवण्यासाठी कीर्तन परंपरा जोपासली. लो.टिळक देखील म्हणाले होते, “मी पत्रकार झालो नसतो तर कीर्तनकार झालो असतो.”

परंतु कीर्तन म्हणजे काय?

कीर्तन म्हणजे नवविधा भक्तीमधील एक भक्ती मार्ग. ( श्रवणम्, कीर्तनम्, विष्णूस्मरणम्, पादसेवनम्, वंदनम्, अर्चनम्, दास्यम्, सख्यम्, आत्मनिवेदनम् हे भक्तीचे नऊ मार्ग आहेत.) कीर्तन या शब्दातील कीर्त हा धातू आहे. याचा अर्थ होतो, ‘गुणगान करणे’. कशाचे गुणगान करणे? तर सद-आचार, विचार, प्रवृत्ती आणि प्रभू यांचे गुणगान करणे. जे विकृतींना आळा घालेल त्याचे गुणगान करणे.

श्रीमद् नारद (नारदमुनी) हे कीर्तन परंपरेचे मूळ पुरुष, आद्य कीर्तनकार. म्हणून कीर्तनकार ज्या ठिकाणी उभा राहून कीर्तन करतो त्या जागेला ‘नारदाची गादी’ असे म्हणतात. कीर्तनाचे तीन विभाग आहेत.( नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, स्वरूपसंकीर्तन ) आणि अनेक प्रयोगपद्धती आहेत. ( नारदीय, वारकरी, रामदासी, हरिदासी, कैकाडी, भरड, इ.) कोकणामध्ये आणि आपल्या दापोलीमध्ये प्रामुख्याने ‘नारदीय कीर्तन पद्धती’ प्रचलीत आहे.

नारदीय पद्धतीचे कीर्तन

नारदीय कीर्तन पद्धतीमध्ये सुरुवातीला मंगलाचरण म्हणजे इष्ट देवतेच (गणपती,राम,वैगेरे.) स्मरण. त्यानंतर नमन म्हणजेच सद्गुरूला वंदन. पुढे भजन, जयजयकार (हरिनामाचा) आणि पूर्व रंगास सुरुवात. हा पूर्व रंग जवळपास तासाभराचा असतो. यामध्ये पदयात व गद्यात अभंग किंवा श्लोक म्हटला जातो व त्या श्लोकाचे विवरण (स्पष्टीकरण) केले जाते. नतर छोटासा मध्यांतर होऊन उत्तर रंगास आरंभ होतो. या उत्तर रंगामध्ये पूर्व रंगातील अभंग किंवा श्लोकातील मर्म अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी आख्यान सांगितले जाते. आख्यानातील कथेला मजेदार करण्यासाठी कथेनुरूप पद, साक्या, दिंड्या, आर्या, ओव्या, कटाव, लावणी, पोवाडे म्हटले जातात.

कीर्तनाचा विषय हा नेहमीच प्रबोधनात्मक असतो. त्या विषयाचा उचित बोध करून देण्याचा प्रयत्न कीर्तनकार करत असतो. पूर्वरंगात तो एखादं तत्त्वज्ञान, कोडं सांगतो आणि उत्तर रंगात त्याची उकल करतो. ( म्हणून पूर्वरंग म्हणजे सिद्धांत आणि उत्तर रंग म्हणजे दृष्टांत असे म्हटले जाते.) नारदीय कीर्तन म्हणजे संपूर्ण एकपात्री प्रयोग आहे. त्यासाठी कीर्तनकार विशेष तयारीचा लागतो. त्याकडे वकृत्व, अभिनय, विनोद, गायन, पाठांतर आणि रासानुकुल वर्णन करण्याची उत्तम क्षमता लागते. शिवाय शास्त्र-पुराण, लोकजीवन व दैनंदिन घडामोडींचा पुरेपूर अभ्यास लागतो. पेटी, तबला यांच्या मधोमध उभे राहून, त्यांची साथ घेऊन कीर्तनकाराला आपले कीर्तन सादर करायचे असते म्हणून संगीत ज्ञान असणे देखील आवश्यक ठरते.

आपल्या महारष्ट्रात या कीर्तन परंपरेची शासनाने देखील दखल घेतल्यामुळे आज मुंबई, पुणे, नागपूर येथे कीर्तनाची महाविद्यालये आहेत, कीर्तनातून वेगवेगळ्या पदव्या प्राप्त करता येतात. शिवाय संपूर्ण आयुष्य हरी भक्त पारायण होऊन कीर्तन सेवा करणाऱ्यांच्या उतार वयाची देखील शासनाने तजवीज केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक कीर्तनाची शिबिरे, सम्मेलनं पार पडतात. भावी पिढी या सगळ्याची उचित दखल आज घेत आहे व अशीच कायम घेतली पाहिजे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here