नौका पूजन

1
8718

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण जर कुठे दुमदुमतो, तर तो फक्त कोकणात. कोकणातला शिमगा म्हणजे निव्वळ होलिकादहन नव्हे तर देवाधिकांचे मानपान, पालख्या, गाऱ्हाणी, लोककला अशा बऱ्याच गोष्टी. त्यात डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत निरनिराळ्या पद्धती आणि निरनिराळ्या परंपरा त्यामुळे भरपूरसं वैविध्य. किनारपट्टीवरील शिमगा तो तर अगदीच निराळा. या शिमग्यात कोळी बांधवांचा अत्यंत महत्वाचा सण असतो तो नौका पूजनाचा.

 

नारळी पौर्णिमेला नारळ वाहून जसा सागराचा मान केला जातो तसाच या दिवशी पूजाअर्चा करून नौकेला मान दिला जातो. फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन झाले की प्रतिपदेला हा सण साजरा होतो. या दिवशी रंगीत कापडी पताकांनी नौका सजवून मोठ्या आनंद, उत्साहाने नाखवा आपल्या कुटुंबाला, नात्यागोत्याच्या लोकांना नौकेवर घेऊन येतो. छान पारंपारिक वेशभूषा, अलंकार वगैरे परिधान करून सगळे खूप हौसेने त्यासोबत येतात. येताना गाणी म्हटली जातात. चेष्टामस्करी केली जाते. आई एकविरेचा जयघोष केला जातो.

  

मग नौकेवर आल्यानंतर नाखवाची पत्नी आणि इतर स्त्रिया त्या नावेची पूजा करतात. ऊन, वारा, पाऊस  सागरात राहणाऱ्या नाखावांचा सांभाळ कर अशी प्रार्थना करतात. नौकेला मानाचा नारळ ठेवला जातो, नैवेद्य दाखवला जातो. मग एक समुद्राची मोठी सफर केली जाते. ही सफर होताना नाचगाणी केली जातात, खाण्यापिण्याचा आनंद लुटला जातो ( अगदी लाडू, करंजा, मिठाईपासून कोंबडीच्या रश्यापर्यंत आणि सरबतापासून अमृताच्या(मद्याच्या) घोटापर्यंत ) लहान मुलांना किंवा घरातल्या स्त्रियांना नौका चालवायला दिली जाते. अशी भरपुरशी मौज केली जाते.

 

हा नौका पूजनाचा सण संपूर्ण कोकण किनारपट्टीवर साजरा केला जातो. कुलाबा, वर्सोवा, मढ, दांडा, पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत. फाल्गुन पौर्णिमेला होळ्या पेटल्यानंतर प्रतिपदेला नौकापूजन आणि द्वितीयेला भेटीगाठी व शिमग्याच्या शुभेच्छा असा कार्यक्रम कोळीवाड्यांतून असतो. त्यामुळे फाल्गुन पौर्णिमा ते द्वितीया तीन दिवस सबंध कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद असते. दापोलीतील हर्णे बंदरावर मोठमोठ्या नौका असल्याकारणाने येथील नौका पूजन कार्यक्रमाचा थाट वेगळाच असतो. खूपसे मुंबईकर कोळी बांधव या नौका पूजन कार्यक्रमासाठी आवर्जून हर्णेस येतात. कोळी बांधवांचा हा सण त्यांच्या इतर गोष्टींप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

 

Previous articleफाल्गुनोत्सव व होळी
Next articleकेशवराज मंदिर | दापोली
कु. सतीश शिरीष भोसले. २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्याची बी.ए.ची पदवी प्राप्त. २०१० पासून ‘प्रेमाचा अर्थ कळू दे’, ‘भटकंती’, ‘मनातला क्रांतिकारी’, ‘सेर सिवराज’, ‘पुडकं’, ‘परमपूज्य बाबसाहेब’ अशा अनेक कवितांचे लेखन. २०१४ मध्ये ‘अबोध’ या लघुपटासाठी पटकथा व संवाद लेखन. २०१४ ते २०१७ ‘एक चुंबनाची गोष्ट’, ‘जीवश्च कंठश्च’, ‘ऑफिसची पहिली पार्टी’, ‘वस्त्रधारण’, ‘मोबाईल’, ‘पेच’, ‘फेसबूक’, ‘सेल्फी’, ‘हर्षा भाभी’, ‘योगायोग’, ‘आमचा कॅप्टन’ या लघुकथांच लेखन. २०१७ पासून ‘मोठ्या जगातल्या छोट्या गोष्टी’ या नावाखाली ब्लॉग लेखन.

1 COMMENT

  1. Great post Satish. Nice meeting you. Please come to our village again. I also take this opportunity to invite you and your team to our village ‘Paj Pandhari’ for our upcoming festival ‘Ram Navami’. See you there. Thanks once again for posting our tradition and culture on social media so that it reaches everyone.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here