फाल्गुनोत्सव व होळी

0
6411

फाल्गुनोत्सव व होळी

फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृष्णाप्रीत्यर्थ या महिन्यात गाई, तांदूळ व वस्त्रे यांची दाने करावी असे काही पौराणिक संदर्भ सांगतात. फाल्गुनी पौर्णिमा ही मन्वादि आहे. या तिथीला होलिका असे म्हणतात. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला जो सण साजरा केला जातो त्यास होलिकोत्सव असे म्हणतात. ‘होळी’ हा शब्द ‘होलिका’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. याशिवाय ‘होलाका’ असेही म्हणतात. होलाका म्हणजेच ‘वसंतमहोत्सव’. स्थानपरत्वे यास शिमगा, होलिकादहन, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा अशी नावे आहेत.( उत्तरेत दोलायात्रा, कोकण महाराष्ट्रात शिमगा व होळी आणि दक्षिणेत कामदहन. )

पौराणिक उल्लेख

हरीभक्तिविलासात वसंतोत्सवाचे वर्णन आलेले आहे. हरीभक्तमंडळींनी एकत्र यावयाचे व फाल्गुन पौर्णिमेचा दिवस विधीपूर्वक साजरा करावयाचा असा त्यात उल्लेख आहे.

कालिकापुराणात भगवान वसंत देवाच्या जन्माचे वर्णन आहे.

मीमांसाशास्त्रासारख्या प्राचीन ग्रंथातून या होलिकोत्सव सणाची चर्चा केलेली आढळून येते व वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ हा सण साजरा करण्यात येऊ लागला असा उल्लेख सापडतो.

भविष्यपुराण, गरुडपुराण यामधून तर या सणाचा महिमा गायलेला आहे.

कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्र’ या नाटकाची पार्श्वभूमि वसंतोत्सव नाटकावर आधारलेली आहे.

सातव्या शतकातील हर्ष देवाच्या ‘रत्नावली’ या सुप्रसिद्ध नाटकात व दंडीच्या दशकुमारचरितात सुद्धा तत्कालीन होलीकोत्सवाचे मोठे मजेदार वर्णन आढळते.

उपपत्ति कथा

नारदीय पुराण-

दैत्यराज हिरण्यकशिपूच्या बहिणीचे नाव होलिका. अग्नीपासून तुला मुळीसुद्धा भय राहणार नाही असा वर तिला मिळाला होता. या वराचा फाजील फायदा घेण्याचा तिने एकदा प्रयत्न केला. तिने दुष्टाव्याने आपला भाचा भक्त प्रल्हाद याला जिवंत जाळण्याचा उद्देशाने त्यास आपल्या मांडीवर घेऊन ती धडधडत्या अग्नीत जाऊन बसली. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की तीच स्वतः दग्ध होऊन बाल प्रल्हाद वाचला. निरपराध प्रल्हाद वाचल्यामुळे लोकांना अतिशय आनंद झाला व त्याप्रीत्यर्थ हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली.

भविष्योत्तर पुराण

युधिष्ठिराने श्रीकृष्णास प्रश्न केला की होळी का पेटीवली जाते आणि ढौंढा ही कोण आहे? त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात. कृतयुगात रघु नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात जनता अतिशय सुखी होती, परंतु एकदा मात्र लोकांनी राजाकडे येऊन त्राही त्राही करून सोडणाऱ्या व दिवसा आणि रात्री मुलांना त्रास देणाऱ्या ढौंढा नामक राक्षसीपासून संरक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा राजा अत्यंत विस्मित होऊन चिंताग्रस्त झाला व त्याने वशिष्ठ मुनीस तिच्या नाशासंबंधी एखादा उपाय शोधून काढण्याची विनंती केली. तेव्हा वशिष्ठ म्हणतात की, “ढौंढा राक्षसी ही माली नामक राक्षसाची मुलगी तिने आपल्या कठोर तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून घेतले व असा वर मागून घेतला की देव, दानव व मानवापासून व तिन्ही ऋतूत कोणत्याही शस्त्रापासून मरण येणार नाही. परंतु जाता जाता शंकरांनी एक अट मात्र लादली की तिला हिवाळ्याच्या अखेरीस आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस मुळापासून मात्र वचकून राहावे लागेल. तेव्हा आज फाल्गुन शुक्ल पौर्णिमा आहे. थंडी पळालेली आहे आणि उद्यापासून उन्हाळा सुरु होत आहे. याकरिता आजच आपण आपल्या प्रजाजनांना व मुलांना अभय राहण्याचे वचन देऊया की सर्व निःसंकोच इकडे तिकडे फिरतील. गुरूच्या कथनानुसार राज्यातील सर्वांनी बीभत्स (फाग) शिव्या देण्याची आणि जाळ पेटवून ढौंढेस हुसकावून लावण्याची युक्ती काढली. तीच ती होळी होय.

विष्णूपुराण व भागवतपुराण

दुष्ट कंसमामाने कृष्णाला मारण्याकरिता पाठवलेली मायावी पुतना राक्षसी, तरुण स्त्रीचे रूप धारण करून घेऊन नंदाचे घरी गेली आणि कृष्णाला आपले विषारी स्तन पाजू लागली. पण कृष्णाने तिचे कपट ओळखून तिचे दुग्धप्राशन केल्यामुळे असह्य त्रास होऊन ती मृत झाली ति याच फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला. या आनंदानिमित्ताने कृष्णाचा हा उत्सव सुरु झाला.

शिवलीलामृत

तारकासुर नावाचा एका राक्षसाने सर्व देवांस जिंकून त्यांच्या पत्नी आपल्या दासी केल्या होत्या. अशा रीतीने सर्व देव त्रासून गेले. शेवटी ते परमेश्वरास शरण गेले. परमेश्वराने सांगितले की, श्रीशंकरास षडानन नावाचा मुलगा होईल व तो तारकासुरास ठार मारील. इकडे सर्व देव श्रीशंकरास पुत्र केव्हा होतो याची वात पाहत बसले. पुष्कळ दिवस झाले तरी श्रीशंकरास पुत्र होईना. आता युक्ति काय करावी, यांतच सर्व देव गढून गेले. शेवटी कामदेव याने आपल्या स्त्रीसह (रति) जाऊन श्रीशंकराच्या शरीरात प्रवेश करावा असे ठरले. ठरल्याप्रमाणे कामदेव रतीसह शंकराकडे गेला. रतीने पार्वतीच्या शरीरात प्रवेश केला आणि कामदेव  (मदन) शंकराच्या शरीरात प्रवेश करणार तोच शंकराने त्याला पहिले. आपल्या तपश्चर्येत विघ्न केल्याबद्दल तृतीय नेत्र उघडून क्रोधाने अवलोकन केले. त्याबरोबर तो मदन जाळून भस्म झाला. नंतर मोठमोठ्या अपशब्दांनीं ते शिवगण कामदेवाचा उपहास करू लागले. तेव्हा शंकराने सांगितले की, फाल्गुन शु||०१५ च्या दिवशी मि मदनास जाळिले आहे. सबब दरसाल या दिवशीच तुम्ही सर्वांनी होळी करावी. याकरता शंकराच्या आज्ञेप्रमाणे दरसाल फाल्गुन शु||०१५ ला होळी करण्याची चाल पडली.

होळीचा धार्मिक विधि

शास्त्राप्रमाणे हा सण तीन दिवसाचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सांयकाळी आपल्या अंगणासमोर सारवून रांगोळी घालून त्या ठिकाणी गोवऱ्या लाकडे पेटवून होळी करावी. होळीची पूजा झाल्यानंतर आंत नारळ टाकावा. या दिवशी अपशब्द बोलण्याची मुभा आहे. नंतर गायनवादन वगैरे प्रकार करावे. तसेच इतर खेळ खेळून रात्र आनंदात घालवावी. दुसरे दिवशी सकाळी चांडाळास शिवून स्नान करावे. त्या दिवसाला धुळवड म्हणतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी गावांतील सर्व लोकांनी एकत्र जमून नृत्य, गायनवादन करावे. तसेच बुक्का, गुलाल उधळावा. अशाप्रकारे हुतशानीचा उत्सव तीन दिवस साजरा करावा.

 

ऐतिहासिक टिपणे

कर्नल टॉड यांनी राजपुतांच्या रीतीभातींचे जे सुरस वर्णन लिहिले आहे, त्यात वसंतपंचमीपासून चाळीस दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या होळीचे सविस्तर वर्णन आहे.

महाराज दौलतराव शिंदे यांच्या दरबारात घडलेल्या होळीच्या उत्सवाचे मेजर बौटन यांनी एका पत्रात मजेदार वर्णन केले आहे.

बंगालचा नवाब सुराज उद्द्वला हा होळीच्या दिवशी खोटे निरोप पाठवून त्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सरदारांस हांसे असे कर्नल पियर्स यांनी लिहून ठेवले आहे. ही पद्धती इंग्रजी APRIL  FOOL पद्धतीप्रमाणे विनोदात्मक होय.

अकराव्या शतकात भारतात आलेल्या अल्बेरुनी या प्रवाशाने हा होलिकोत्सव धुमधडाक्याने नि नाच तमाशादि कार्यक्रमाने येथे साजरा होतो. असे आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे.

मराठ्यांच्या कारकिर्दीत हा सण मोठ्या थाटाने साजरा करीत असत. या सणप्रसंगीच भरलेल्या दरबारात लखुजी जाधवांची छोटी मुलगी जिजाबाई हिने पाच वर्षाच्या शहाजी भोसल्यावर गुलाल उधळला व ते पाहून वडील मंडळींनी तिथल्या तिथे त्यांचे लग्न जमवून टाकले. या गंमतीदार प्रसंगातूनच त्यांच्यात पतीपत्नीचे नाते निर्माण होऊन शिवरायांसारखे नररत्न जन्मास आले.

 भारतभर होलिकोत्सव

भगवान श्रीकृष्णाची लीलाभूमी बरसाना, नांदगाव, दाऊजी, वृंदावन या ठिकाणी साजरा होणारा हा सण अत्यंत प्रसिद्ध आहे. दूरदूरचे लोक तेथला हा उत्सव पाहण्याकरता जातात. अर्ध्या फाल्गुनपासून तो अर्ध्या चैत्रापर्यंत एक एक महिना हा उत्सव तिथे चालतो. नंदगाव हे श्रीकृष्णाचे व बरसाना हे राधेचे गाव असल्यामुळे नंदगावचे पुरुष व बरसाना मधील स्त्रियांना शिव्या देण्यास सुरुवात करतात. त्या ऐकून त्या स्त्रिया हातात लाठी घेऊन त्या शिव्या देणाऱ्या पुरुषांना चोपण्याचा यत्न करतात. पुरुष आपल्या हातातील ढालीने लाठ्यांच्या प्रहारापासून स्वतःला वाचवतात.

रामपूर, उमरी इ. ठिकाणच्या जाट स्त्रिया या सणप्रसंगी हातात मशाली घेऊन नृत्य करतात. या नृत्याचे नाव आहे चरकला नृत्य. या नृत्यात मुख्य स्त्रीच्या माथ्यावर एक वजनदार मडके ठेवलेले असते व त्यावर अनेक पणत्या पेटत ठेवलेल्या असतात. घुंघट घेऊन ती स्त्री तासंतास नाच करते,परंतु आश्चर्याची गोष्ट की तिच्या माथ्यावरील एकही पणती विझत नाही.

बुंदेलखंडात तर या सणप्रसंगी और मजाच पाहायला मिळते. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी एक उंच गुळगुळीत खांब रोवण्यात येतो. त्या खांबास तेल वगैरे लावून आणखीन गुळगुळीत करतात. खांबाच्या शेंड्यास गूळ व पैसे टाकून एक थैली बांधलेली असते. त्या खांबाभोवती स्त्रिया हातात छड्या घेऊन उभ्या राहतात. पुरुषाने त्या गुळगुळीत खांबावर चढून थैली काढून घ्यावयाची असते. परंतु गंमत अशी की खांबावर चढता चढता स्त्रियांकडून बेदम चोप त्यास खावा लागतो व तशा परिस्थितीत त्याचा यत्न यशस्वी झाला तर त्यास त्या थैलीतील रक्कम इनाम मिळते.

बंगालमध्ये या सणप्रसंगी घराघरातून हरिनामाचा प्रचार करणाऱ्या चैतन्य महाप्रभूंची मूर्ती पालखीत ठेऊन मिरवली जाते. घरचा यजमान होळीच्या दिवशी उपवास करतो व कृष्णाची व अग्नीची पूजा करतो. ती आटोपल्यावर कृष्णमूर्तीवर फल्गु (गुलाल) उधळून जमलेल्या मांडलीस तो वाटण्यात येतो. नंतर घराबाहेर एक मोठी गवताची राक्षस मूर्ती जाळण्यात येते. होळी पौर्णिमेला झोपाळ्यावर कृष्णाची मूर्ती ठेऊन तिला अधून मधून आळीपाळीने सर्वजन झोके देतात. झोपाळ्याच्या वैशिष्ट्यामुळे या उत्सवाला ‘दोलोत्सव’ असे नाव पडले आहे.

ओडिसा प्रांतात बंगालप्रमाणेच दोलोत्सव चालतो. फक्त होलिकादहनविधी मात्र होत नसतो. तेथे चैतन्यसंप्रदायी लोकांचा विशेष भरणा आहे. या पंथाचे गोसावी व ब्राह्मण कृष्णमूर्तीस पालखीतून मिरवीत घरोघर नेत असतात. सर्वांस अत्तर व गुलाल वाटल्यावर वस्त्रप्रावरणे व दक्षिणा देऊन घरच्या यजमानाकडून त्या मंडळींची संभावना केली जाते. गोपलोकास हा उत्सव विशेष प्रिय आहे. या दिवशी ते नवीन पोशाख धारण करतात व गुराढोरासाठी दावी वगैरे लागणारे सामान आणतात. ठिकठिकाणी हे गोप आपल्यातील एकाचा कृष्ण वेष देऊन त्याच्या प्रमुख्याखाली मेळे काढतात व काही दिवस टिपऱ्यांचा नाच करतात.

मद्रास मधे मंदिरासमोर होळी पेटविली जाते. नेपाळात तर या सणाप्रसंगी पशुपतिनाथाच्या मंदिरात मोठा मेळावा भरतो. भारतात वावणारी मुंडा ही आदिवासी जमात होळीला फगु पर्व या नावाने ओळखते. वसंतऋतू सूर्य भगवान व पृथ्वी यांचा विवाह झाला असा त्यांचा समज आहे. यामुळे सूर्याचे नावाने लाल व पृथ्वीच्या नावाने काळी कोंबडी बली देऊन ते मोठ्या आनंदाने नाचतात. संताळाचे हंटा, खासी जमातीचे नौंगेक्रेम व गोंडाचे नृत्य ही या सणप्रसंगीची मोठी गमतीदार नृत्ये आहे.

महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातल्या होळीच वैशिष्ट्य निराळच आहे. कोकणातील सर्व जातीतील लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. वर कोकणापासून तळ कोकणापर्यंत शिमग्याचा आपआपल्या रीतवैशिष्ट्यानुसार जल्लोष असतो. सुरमाड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्या रुपात होळी सजते. तासे, कर्णे, ढोल, सनई वगैरे वाद्यांसह नृत्यगायन कौशल्य वारांगना बाहेर पडतात. त्यांना खेळे असे म्हणतात. देवाच्या पालखीसह हे खेळे लोकांच्या घरोघरी जातात आणि आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करतात. पालखी घरी येणार, देव आपल्या घरी येणार म्हणून सारवून, गेरूने रंगवून, चुना-रांगोळीची नक्षीचित्रे काढून, गोडधोडाचा नैवेद्य करून, आनंदी मनाने घर तयार असते. पालखीसोबत आलेल्या गावकऱ्यांच्या चहापाण्याची, पानविड्याची, अगदी जेवणाची सुद्धा सोय असते. या दिवसात देवळात उत्सवी, जत्रेमय वातावरण असते. गोंधळ, दशावतार, नमन, जाखडी नृत्य, राधा नाच, गोमू अशा विविध लोककला त्यावेळी सादर होतात. देवाचा उदोउदो केला जातो, कौल लावले जातात, गाऱ्हाणी घातली जातात, त्याच्याकडून सुखाचा आशीर्वाद घेतला जातो व याकरताच कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्यावेळी कोकणात येतो.

अन्य देशी

भारताप्रमाणेच अन्य देशातूनही होळीसारखा उत्सव साजरा केला जातो. झेकोस्लोव्हेकिया मधे अशा या सणास ‘वेलीकोनोत्से’ असे नाव आहे. तर इंग्लंड, बेल्जम, फ्रान्स येथे या सणास ‘फूल्स फेस्टीव्हल’ असे म्हणतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here