दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट

2
7241

भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद आहे. ख्रिस्त पूर्व ६ व्या शतकापासून बाबिलोन व इतर पश्चिमेकडील राष्ट्र यांजबरोबर भारताचे दळणवळण होते, याचे उल्लेख बौद्ध जातकात (जातक – गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांचा ग्रंथसमूह ) आढळतात. भारतात रोमन नाणी सापडली, त्यावरून ‘ऑगस्टस’ { रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट, जन्म २३ सप्टेंबर इ.स.पू. ६३ – मृत्यू १९ ऑगस्ट इ.स. १४ } ते ‘नेरो’ {रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट, जन्म १५ डिसेंबर इ.स. ३७ – मृत्यू ९ जून इ.स. ६८ } पर्यंत ‘रोम व भारत’ यांजमध्ये मोठा व्यापार चालत असल्याचे सिद्ध होते.) यामुळेच भारतीय किनारपट्टीबरोबर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर अनेक व्यापारी बंदरे व नगरे उदयास आली.

या बंदराचा व नगरांचा उल्लेख इजिप्त, ग्रीस व रोमन प्रवाशांच्या वर्णनात मिळतो.  स्ट्रॅबी, प्लीनी, टॉलेमी यांच्या लिखाणातून कोकणातील बऱ्याच बंदरांचा उल्लेख आलेला आहे. ‘पेरीप्लस ऑफ युरेथ्रियन सी’ या साधनात सातवाहन काळात कोकणात किनारपट्टीवर परदेशी व्यापार चालत असे, अशी माहिती मिळते. प्राचीन कालखंडात चेऊल, सोपारा, ठाणे ही कोकण किनारपट्टीवरची महत्त्वाचे ची बंदरे होती. याबरोबरचं कलिअन (कल्याण), बर्यागाझा (भडोच), सेमुल्ल, चेमुली (चौलरेवदंडा), मंदागोरा (बाणकोट), मेलिझिगारा (सुवर्णदुर्ग – राजापूर), सेसेक्रियनाय (वेंगुर्ले), मुसोपोले (म्हसळ), आगिडी (गोवा) इत्यादि बंदरांचा उल्लेख प्राचीन साधनांमध्ये आढळतो. इ. स. ४० मध्ये ‘हिपॅलस’ या ग्रीक संशोधकाने मान्सूनचे वारे ठराविक वेळेत, ठराविक दिशेने वाहतात त्यावेळेस भारतात गलबते हाकारली तर जलदगतीने जातील असे शोधून काढले. त्यामुळे रोमन, ग्रीक, इराणी व्यापार भारतात मोठ्या प्रमाणावर वाढला. भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनी पश्चिम घाटातील बौद्धगुफांना भरघोस दाने दिली. सातवाहन काळात कोकण किनारपट्टीचा परदेशी व्यापार भरभराटीचा होता. सहाव्या- सातव्या शतकात उत्तर कोकणात मौर्यांनी राज्य केले. पुढे बदामीच्या चालुक्यांनी दक्षिण कोकणात राज्यविस्तार केला. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या काळात भारताचे परकियांशी मैत्रीचे संबंध होते. त्यावेळी घोड्यांची आयात मोठ्या प्रमाणात केली जात असे. राष्ट्रकूटांनीही  व्यापारात अग्रेसर असलेल्या अरबांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. एकंदरीत कोकण किनारपट्टीवरचा व्यापार समृद्ध होता.

Source: https://en.wikipedia.org/wiki/Roman_currency
Source: https://en.wikipedia.org/wiki/Roman_currency

प्राचीन कालखंडात दाभोळ बंदराचा फारसा उल्लेख आढळत नाही. काही इतिहासकारांनी ‘पलियपटामय’ म्हणजे दाभोळ असे म्हटले आहे. परंतु डेक्कन कॉलेजचे डॉ.गोगटे यांच्या मते ‘पलियपटामय’ म्हणजे कोकणातील गुहागर जवळील  पालशेत असावे. पण पन्हाळेकाझी येथील बौद्ध व नाथपंथीय लेणी पाहता दाभोळ हे प्राचीन बंदर असावे, असा अन्वयार्थ काढता येतो. कारण डॉ.म.ना.देशपांडे व इतर पुरातत्ववेत्यांच्या दृष्टिकोनातून येथील शैलगृहांची (लेण्यांची) सुरुवात साधरणतः  दुसऱ्या-तिसऱ्या शतकात सातवहनांच्या काळात झाली. लेण्यांचे ठिकाण व नदीमार्गे किंवा खुश्कीच्या रस्त्याने दाभोळपर्यंतचे अंतर सुमारे २०/२२ किलोमीटर आहे. यावरून तत्कालीन वाहतुकीची सोय विचारात घेता अंतर्गत व बाह्य जगात प्रवासासाठी ‘दाभोळ’ हे महत्त्वाचे पूर्ण असल्याचे दिसून येते.

https://en.wikipedia.org/wiki/Dabhol
Source: https://en.wikipedia.org/wiki/Dabhol

​मध्ययुगीन कालखंडात मात्र चौल व दाभोळ ही कोकण किनारपट्टीवरील प्रमुख बंदरे असल्याचे बरेच उल्लेख आढळतात. यावरून दाभोळ बंदराचे व्यापारी महत्त्व मध्ययुगात वाढलेले दिसते व त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दाभोळ बंदरात अरबस्थानातून होणारी घोड्यांची आयात हे म्हणता येईल.

Source: https://en.wikipedia.org/wiki/Dabhol
Source: https://en.wikipedia.org/wiki/Dabhol

दाभोळ हे १७‍‌॰ ३५ उत्तर अक्षांश व ७०१० पूर्व रेखांशावर कोकणातील दापोली तालुक्यात ( जिल्हा रत्नागिरी ) वसले आहे. अंजनवेल किंवा वशिष्ठी नदीच्या उत्तर काठावर टेकड्यांच्या पायथ्याशी दाभोळ शहर समुद्रापासून दोन मैल आत आहे. मुंबईच्या आग्नेय दिशेस सुमारे ८५ मैलावर ‘दाभोळ बंदर’ आहे. दाभोळचे नाव दाभिलेश्वराच्या म्हणजेच शिवाच्या (दाभोळात दाभिलेश्वराचे जुने मंदिर आहे ) किंवा वनदेवता दाभ्यावरून पडले असावे, असे मानले जाते. प्राचीन काळी दाभोळ हे दालभ्यवती नावाने ओळखले जात होते. दालभ्य ऋषींच्या वास्तव्यावरून पडलेल्या या नावाचा कालांतराने दाभोळ असा अपभ्रंश झाला, असेही म्हटले जाते.

दाभोळच्या इतिहासाचा मागोवा घेताना दाभोळमधील प्रसिद्ध भूमिगत चंडिकादेवीचे मंदिर मि. क्रॉफर्ड यांच्या म्हणण्यानुसार बदामी शैलगृहे मंदिराच्या काळातील (चालुक्य कालीन) इ. स. ५५० ते ५७८ मधील आहे. क्रॅकोर्डच्या मते आणि एका स्थानिक बखरी नुसार दाभोळ हे अकराव्या शतकात एका शक्तिशाली जैन राजाचे राज्य होते आणि त्यास पुरावा म्हणून इ. स. ११५६ (वैशाखाचा ३ रा दिवस, १०७८ शालीवाहन) चा शिलालेखही सापडला आहे. पुढे यादवांच्या काळात दाभोळ हे एक महत्त्वाचे बंदर होते. यादव काळात उद्योग-व्यापार उदित(भरभराटीचा) होता. गोवा, दाभोळ व चौल बंदरातून परदेशात पैठणी, देवगिरी व दख्खनी कापड निर्यात केले जात असे. परदेशातून सुवर्णाचा मोठा ओघ भारताकडे असल्याचे त्या काळात नमूद आहे. व्यापारामध्ये अरबांचे वर्चस्व होते. अल मसुदी, अल इताकरी, इब्न हौकल या अरब प्रवाशांच्या लिखाणातून, तसेच आलेखांमधील माहितीनुसार तुर्की आक्रमणापुर्वीच कोकण किनारपट्टीवर मलबार पासून ते उत्तरेस संजान पर्यंत अरबांनी आपले बस्तान बसविले होते. आलेखांमध्ये त्याचा ‘नवायत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. सिराफ, ओमान, बसरा व बगदाद इ. ठिकाणांहून अरब व्यापारासाठी येथे येत असत.

Chandika Devi Mandir Dabhol
Chandika Devi Mandir Dabhol

इ. स. १३१२ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या तुर्की आक्रमणाला कोकण बळी पडले. यादवांचे राज्य नष्ट केल्यानंतर मलिक यकलाखी या सरदाराची दख्खनचा राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्या कक्षेत कोकण किनारपट्टीही होती. त्याच्याच कारकिर्दीत मलिक कफूर याने राज्यविस्तारासाठी दक्षिण भारतावर केलेल्या चौथ्या स्वारीत दाभोळ व चौलवर धडक मारली आणि मोठी लुट संपादन केली. दाभोळचे नाव एकदा ‘खिजराबाद’ असे पडले होते. अल्लाउद्दीनचा वडील  मुलगा ‘खिजरखान’ होता. त्याच्या नावावरून हे नाव पडले असावे.

दाभोळ मध्ययुगात ‘मुस्तफाबाद’ म्हणून ओळखले जात होते. पण इथे ‘मुस्तफाबाद’ या नामकरणावरून बरीच गफलत आढळते. फेरीश्तानुसार तेराव्या शतकाच्या मध्यात समुद्रापलीकडून रत्नागिरीस आलेल्या नसरुद्दिन शाह उर्फ आझम खान याने दाभोळ जिंकून घेतले. तेव्हा दाभोळचा हिंदू प्रमुख नागोजीरावाने त्यास जमिनीवरून व समुद्रातून प्रतिकार केला; पण तो व्यर्थ ठरला आणि आझमखानाच्या एका मुलाच्या नावावरून दाभोळला मुस्तफाबाद व दुसऱ्या एका वसाहतीस दुसऱ्या मुलाच्या नावावरून हमजाबाद अशी नावे देण्यात आली.  इ.स. १३४७ ते १५०० या बहामनिंच्या कालावधीत मुस्लिम सुभेदारांच्या नावावरून दाभोळ व इतर ठिकाणांना नावे देण्यात आली असावीत, असा एक अंदाज व्यक्त होतो. तर युसुफ आदिलशहाचा सरदार मुस्तफाखान याच्या नावावरून दाभोळास मुस्तफाबाद  हे नाव पडले असे म्हटले जाते. मुस्तफाखान १४९७ मध्ये दाभोळास होता व दाभोळ सुभा पूर्वी विजयानगरच्या अमलाखाली होता. मग विजयानगरचे राज्य मोडल्यावर तो आदिलशाहीत आला. परंतु आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल खान समुद्रमार्गे पहिल्यांदा दाभोळला आला.( इथे कालावधी बाबतीत इ.स. १४३९ (हिजरी ८६४) व इ.स. १४६० अशी एक गफलत आढळते.) तेव्हा तो दाभोळचा उल्लेख मुस्तफाबाद किंवा खिजराबाद असा करून दाभोळचे वर्णन स्वर्गीय आनंद देणारे ठिकाण बहामनी सुलतान महुमूदशाह दुसरा (इ. स. १४८२ ते १५१८ ) याच्या राज्यातील मोठ्या शहरांमधील एक असे करतो.

बहामनी सत्तेचा अंमल दख्खनमध्ये इ.स.१३४७ साली सुरु झाला. बहामनी राज्याचा संस्थापक अल्लाउद्दीन बहामनशाहने दाभोळ काबीज केल्यानंतर दाभोळला बहामनी राज्याचे मुख्य बंदर बनवले. त्यामुळे अंतर्गत भागात सत्ता स्थानिकांचीच असली तरी, बंदर व व्यापार यावर मुस्लिमांचे वर्चस्व होते. जवळच असणारे गोवा हे विजयानगरच्या साम्राज्यात होते व स्थानिक राजे विजयानगरशी जवळीक साधून होते. पंधराव्या शतकात बहामनी सुलतानांनी दक्षिण कोकणवर पूर्ण वर्चस्व प्राप्त करण्याच्या उद्दिष्टाने तीन मोहिमा काढल्या. इ. स. १४२९ मध्ये मलिक–अल–तूज्जारने दक्षिण कोकणवर स्वारी करून तेथील शासकांना नमवले. परंतु प्रशासकीय व्यवस्था लावण्यात तो अपयशी ठरला. इ. स. १४३८ मध्ये दुसरी मोहीम उघडण्यात आली; परंतु त्या मोहिमेत फारसे यश आले नाही.  इ. स. १४५३ मध्ये तिसरी मोहीम करताना खलप हसनच्या नेतृत्वाखाली बहामनी सैन्य पूर्ण तयारीनिशी कोकणात उतरले; पण शिर्क्यांनी या सैन्याचा दारूण पराभव केला. ७००० बहामनी सैन्य मारले गेले. खलप हसनचा पराभव बहामनी राजवटीला नामुष्की आणणारा ठरला. खेळण्याचे राजे व संगमेश्वरचा राजा बहामनी राजवटीचे विरोधक होते. त्यांच्याकडून खुश्कीच्या मार्गाने जाणारे तांडे व दाभोळ जवळील जहाजे लुटली जात असत. दाभोळ बंदराचा परिसर सोडल्यास दाक्षिण कोकणात बहामनी सत्ता अगदी नाममात्र होती.

https://wikibio.in/alauddin-khilji/
https://wikibio.in/alauddin-khilji/

बहामनी वजीर ख्वाजा जहान महमूद गवाणने पुन्हा कोकणात बहामनी सत्तेचा जरब बसविण्याच्या उद्दिष्टाने पश्चिम किनारपट्टीवर मोहिमा उघडल्या. परंतु त्याच्या लवकरच लक्षात आले की, या डोंगराळ व उंचसखल भागात घोडदळाचा काही उपयोग नाही. त्याने लाच, कपटवृत्तीने तर कधी मुत्सद्देगिरीचा वापर करून या प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण केले. यानंतर त्याने आपले लक्ष विजयानगरच्या साम्राज्यात असणाऱ्या गोवा बंदराकडे वळविले व इ.स. १४७२ मध्ये गोवा काबीज केले.

या काळात महमूद गवाणने आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या मित्रांना पाठविलेली पत्रे उपलब्ध आहेत.  ही पत्रे अत्यंत बोलकी आहेत. मौलाना जामी या धार्मिक व्यक्तीला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, “आतापर्यंत कुठल्याही मुसलमान राज्यकर्त्याने या भागावर कायमस्वरूपी निश्चित असे प्रभुत्व मिळवलेले नाही. इथली उंचच उंच शिखरे, गडकिल्ले बांधून सुरक्षित करण्यात आलेली आहेत. खुश्कीच्या किंवा सागरी मार्गाने येणाऱ्या मुसलमानांना यामुळे  सतत लुटण्यात येते. हा भाग आपल्या कब्जात आणणे व वर्चस्व बसविणे हेच आपले धोरण असले पाहीजे.” महमूद गवाणने दाभोळ व इथल्या सागरी महत्त्वाबद्दल अनेक पत्र लिहिलेली आहेत. त्यांचे संकलन ‘रियाझ उल इन्शा’ या पत्रसंग्रहात आहे. सन १४७२ नंतर दाभोळ व गोवा ही बहामनी राज्याची प्रमुख बंदरे होती.

बहामनी राजवटीच्या काळात अनेक अरब, तुर्की, येमेनी, हबशी तरुण नशीब उघडण्यासाठी सागरीमार्गाने भारतात येत असत. ख्वाजा जहान महमूद गवान, युसुफ आदिलशाह, कवी निशात पूरी व असंख्य विद्वान आणि संत  बंदरात उतरले. महमूद गवाण हा गिलानचा रहिवासी स्वकर्तुत्वावर बहामनी राज्याचा वजीर बनला. त्याच्या कारकिर्दीत बहामनी राज्याची पर्शियन आखाताबरोबर व्यापार वृध्दी झाली. घोड्यांचा व्यापारी हलाफ–अल्–हासो हा देखील वजीर झाला. विजयानगरच्या राज्यातही गिलानी मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत असत व सुमारे ३०० ते ५०० टक्के नफा मिळवत असत. वरील सर्व उल्लेखांवरून दाभोळ हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्त्वाचे बंदर होते हे स्पष्ट होते. तसेच विविध वस्तूंची आयात-निर्यात होत असली तरी मोठा व्यापार अरबी घोड्यांचा होता. बहामनी, विजयानगर व पुढे आदिलशाही, कुतुबशाही  इ. शाह्यांच्या काळात घोड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असून तेथून ते विविध राज्यात पाठविले जात असत.

रशियन प्रवासी अथानासिएस निकितीनने इ.स. १४७० च्या दरम्यान दख्खनला भेट दिली होती. इजिप्त, अरबस्थान, खोरासान, तुर्कस्थान येथून मोठ्या प्रमाणात घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असून ते एक मोठे सागरी बंदर आहे असे वर्णन निकितीन करतो. अरबी घोड्यांचा दर्जा चांगला असल्यामुळे एका घोड्याची किंमत साधारणतः ८०० पोर्तुगीज पारदोस होती. घोड्याच्या आयातीवरील कर हे पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांचे महत्त्वाचे उत्पन्न होते. असे असले तरी अश्वांचे आर्थिक महत्त्व लष्करी महत्त्वापेक्षा कमी नव्हते. दक्षिणेकडील सत्तासंघर्षात युद्धासाठी चांगल्या घोड्यांची गरज सर्वच राज्यांना भासत होती.

दाभोळच्या विकासाच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाची बाब होती ती दाभोळच्या जवळ असलेले ‘संगमेश्वर’ जहाज बांधणीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध होते. युद्धकाळासाठी व गस्त घालण्यासाठी जलद गती असणारी संगमेश्वरी जहाजे प्रसिद्ध होती. त्याकाळी व्यापाराची देवाणघेवाण सागरी मार्गाशिवाय घाटमार्गे देशावरून पुरी होत असे. या दोन प्रदेशांमध्ये उभ्या असलेल्या सह्याद्रीला छेद देणारे घाटमार्ग पंधराव्या शतकात कोकण व दख्खन मधील वाढत्या व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. गाढवांचे, बैलांचे तांडे व हमाल या घाटमार्गातून ये-जा करीत असत. दाभोळहून कऱ्हाडला जाण्यासाठी ‘कुंभार्ली’ घाटाचा उपयोग केला जात असे. डच प्रवाशी वॅन ट्विस्ट याने दाभोळ ते विजापूर पर्यंतच्या मार्गांचा उल्लेख केलेला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीहून अंबेघाट मार्गे व विजदुर्गहून फोंडाघाट मार्गे कोल्हापूला जात-येत असत. राजापूर व खारेपाटण अनासकुरा घाटमार्गे कोल्हापूरला जोडलेले होते. तर सावंतवाडी व वेंगुर्ला बंदरातून व्यापारी तांडे आंबोल घाटातून कोल्हापूर व पुढे बेळगांव आणि रायबागच्या बाजारपेठेकडे वळत असत. दाभोळ व गोवा बंदराकडून कर्नाटकाकडे जाणारे मार्गही काही विशिष्ट ठिकाणी जोडले गेले होते. काही मार्ग गुलबर्गा व हैदराबादकडे जात असत. बेजवाडा व मुसूलीपटनम महत्त्वाची बाजारपेठ होती. मुसूलीपटनम व वारंगळचे कापड तसेच गोवळकोंड्याहून हिरे दाभोळ मार्गे परदेशात जात असत. खुश्कीच्या मार्गावर वंजारी व लमाणी वाहतूक करत असत.

दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)

संदर्भ :

  • गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
  • किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
  • मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
  • लेख डॉ. दाऊद दळवी.
  • लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
  • लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

2 COMMENTS

  1. Nasruddin shaa ( aazam Khan) he Guhagar taluka madhe tavsal gao la aazam Khan ani hamza aashe don mazar (kabar) aahet Peer hazrat aazam aani hamza Peer hyancha urus urdu mahina rabbiul aawal chaa 13th aani 14th la motya utsahat hote sarv dharmache lok aastat chuti shi mahiti dili aahe aaplya upyogi aali Tar thik aahe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here