लेणे पन्हाळेकाजी

4
9791

१९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले. त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला. अण्णांनी हे पत्रे म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले. आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका ‘शोभनाताई गोखले’ यांच्या समोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला. अभ्यासातून ताम्रपट शिलाहार कालीन असल्याचे आढळले. १९७२ साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला २८ लेण्यांचा समूह समोर आला. ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ म.न.देशपांडे (मधुसूदन नरहर देशपांडे) यांनी या लेण्यांचा अभ्यास करून The caves of Panhale-kaji  हा प्रबंध लिहिला. या प्रबंधाकरिता त्यांना १९८६ चे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ वेस्ट बंगाल’ सर्वोत्कृष्ट कार्यपदक मिळाले. पन्हाळेकाजीचा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने केली. छापिल माध्यमांमधून त्यांच्या मुलाखती झाल्या. हायडेलबर्ग (प.जर्मनी) येथे झालेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती व समाज’ या अंतरराष्ट्रीय सम्मेलनात देखील म.न.नी पन्हाळेकाजीचा उल्लेख केला होता.

..देशपांडे पन्हाळेकाजी संदर्भात म्हणतात की….

सातवाहन  राजवंशात कोकणामध्ये ‘हीनयान’ बौद्ध पंथाचा प्रसार झाला. कोकणामध्ये अनेक विहार-संघाराम, चैत्यगृहे स्थापली गेली. पन्हाळे येथील संघाराम खेडमधील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची  प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते. कारण खेडमध्ये स्तूपयुक्त विहार व काही पूर्णअपूर्ण लेणी आहेत. आणि खेड या व्यापारी स्थळमार्गापासून पन्हाळेकाजी जवळच्या टप्प्यात येते. कोटजाई आणि दाभोळ बंदरामार्फत येथे व्यापारी मचव्यांची ये-जा असावी. २८ लेण्यांपैकी ४,५,६ व ७,८,९ क्रमांकाच्या लेण्या मिळून जो गट तयार होतो. तो या समूहातील सर्वात जुना गाभा आहे. ७,८,९ हा वेगळा गट असला तरी तो काळाच्या दृष्टीने ४,५,६ च्या जवळचा आहे.

४,५,६ या गटात ४ व ५ क्रमांकाच्या गुहा लहान भिक्षुगृहाप्रमाणे आहेत. ५ क्रमांकाच्या लेणीमध्ये स्तूप संस्थापना दिसते. हा स्तूप अर्धोत्कीर्ण असून पाठीमागचे भिंतीत, तेथे नंतर खोदल्या गेलेल्या गर्भगृहाच्या द्वाराच्या उजव्या बाजूस आहे. अश्याच तऱ्हेचा स्तूप चौल येथील हिंगळाजदेवी लेणीसमूहात आहे. या दोन्ही स्तूपांचा काळ साधारणतः दुसरे-तिसरे शतक आहे. यावरून असे अनुमान करता येते की पन्हाळेकाजी येथील बौद्ध संघारामाची सुरुवात २–३ शतकात झाली. सहा क्रमांकाचे लेणे विहार असल्याचे दिसते. या लेणीच्या पडवीत पश्चिम बाजूच्या भिंतीवर एक ब्राह्मी लेख होता. पण उत्तर कालात तो छिन्नीने इतका खरडून टाकला आहे की, त्यामधील दोनचार अक्षरेच संदर्भाशिवाय दिसतात. त्या अक्षरांवरून (विशेषतः म च्या अक्षर वाटिकेवरून)  हा लेख दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील असावा, असा अंदाज करता येतो.

सहाव्या – सातव्या शतकात महाराष्ट्रात चालुक्यांचा प्रभाव वाढू लागला आणि महाराष्ट्रातील बौद्ध संघारामाचे महत्व कमी होऊ लागले. वेरूळ व कान्हेरी अशा काही स्थानांव्यतिरीक्त नवीन बौद्ध धर्मीय गुहा, स्मारके खोदल्याचे दिसत नाही. चालुक्य हे शैवपंथी होते. आठव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांचा प्रभाव कमी झाला आणि बौद्ध धर्मातील तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हे वर्चस्व साधारणतः ११ व्या शतकापर्यंत होते. त्यामुळे हीनयान पंथीय लेण्यांच्या स्थापत्य वैशिष्ट्यात वज्रयान पंथीयांकडून फेरबदल झाले. सहाव्या लेणीतील गर्भगृह वाढून भिक्षुगृहाचे रुपांतर अक्षोभ्य मंदिरात केलेले आढळते.

गट १,२,३

या गटातील २ क्रमांकाची लेणी विहार म्हणून खोदली गेली होती व जवळपास तिची योजना क्र. सहाच्या लेण्याप्रमाणेच आहे. या लेणीतील मंडपाचे छतावर मध्यभागी अर्धोत्कीर्ण व एकमेकास काटकोनाने छेदणाऱ्या उन्नत लगींनी १६ चौकोन केले आहेत, अशा तऱ्हेने  छतावर लाकडी तुळया व लगी यांचा वापर दाखविण्याची प्रथा ही जुनीच आहे. या स्तंभ विरहीत मंडपात भिंतीलगत कठडा (Rock Bench) आहे. या सर्व लक्षणांवरून ती लेणी मुळात दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील आहे; पण १० व्या शतकात तिच्यात बदल झाले आहेत, हे कळून येते. १० व्या शतकातील बदलानुसार दर्शनी स्तंभ शिर्षात नागबंध आला. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस सात उभे मानुषी बुद्ध कोरले गेले. या लेणीच्या मंडपाचे प्रवेशद्वार थोडेफार अलंकृत शाखायुक्त होते. पण नंतर ते अलंकरण खोडून काढून साधे केले. यावरून असे लक्षात येते की, तांत्रिक वज्रयान पंथीयांनी ही लेणी आपलीशी केली होती.

गट ७, ८, ९

७,८,९ हा गट ६ क्रमांकाला जोडूनच आहे. व येथेही वज्रयान पंथीयांनी केलेले बदल दिसून येतात. ७,८,९ क्रमांकाची लेणी ही मुळातच भिक्षुगृहे होती. पण पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तीची स्थापना झाली. ७ क्रमांकाच्या लेण्याखाली खालच्या थरात एक क्षतिग्रस्त व अपूर्ण लेणे आहे. ७ क्रमांकाच्या उमऱ्यावर मधील पुढे आलेला भाग सोडून दोन्ही बाजूस पुष्पयुक्त हिराकृति आहेत. लेणी क्र. आठ मध्ये गर्भगृहात शिरविरहित अक्षोभ्याची मूर्ती आहे. ५ आणि ६ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर  स्तूप बसविलेला होता.  अशा काही खुणा आढळतात. व तेथेच पडलेले काही स्तूप दिसून येतात. त्यावरून ५, ६ बरोबर ७ क्रमांक लेणीवर देखील स्तूप असावा, असे वाटते.

गट १०, ११, १२ व १३

या गटातील १२  क्रमांकाच्या  लेण्याचे योजनाचित्र जवळपास २ व ६ प्रमाणेच आहे. मुळतः विहार म्हणून खोदल्या गेलेल्या या स्तंभांना चौकोनी अधिष्ठान दिले आहे. पण तरीसुद्धा ते  पँरापेट (कठडा)  पासून अभिन्न आहेत. मंडपाचे  पाठीमागचे भिंतीत मुळात असलेल्या तीन भिक्षूगृहांपैकी मधल्या भिक्षुगृहाचा उपयोग अक्षोभ्याच्या मूर्ती स्थापनेसाठी झाला असावा. तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची लेणी म्हणजे क्रमांक दहाची लेणी. कारण या लेणीत हत्ती व सिंह असलेल्या सप्तरत अधिष्ठानावर स्थित असलेली महाचंडरोषणाची मूर्ती आढळते. आणि तिच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा अगदीच  विरळ्या असून १९८१ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोनच मूर्ती आढळल्या. एक पन्हाळेकाजी येथे व दुसरी रत्नागिरी येथे. रत्नागिरी येथे डॉ. देवला मित्रांना ही मूर्ती एका स्तूपावर कोरलेली आढळली. पन्हाळेकाजी येथील महाचंडरोषणाची  प्रतिमा सुमारे दहाव्या शतकातील असावी व ती उत्तरकालीन चालुक्य कलेशी मेळ खाते. अक्षोभ्याच्या  मूर्तीही नवव्या-दहाव्या शतकातील  असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते व अशा चालुक्य उत्तर काळामध्ये वज्रयांनी  बौद्ध धर्माच्या  शाखा दक्षिण महाराष्ट्रात व कर्नाटकात होत्या याचा थोडाफार पुरावा मिळतो.

गट १५, १६,१७,१८

१५ चे लेणे मूळ वज्र यान पंथी होते. पण मागाहून इथे गणपतीची सुटी मूर्ती दर्शनी भागातील कोनाड्यात ठेवून हे लेणे गाणपत्य पूजेसाठी वापरले जावू लागले. लेण्याच्या ललाट बिंबावर देखील गणेशमूर्ती कोरलेली आहे.

१६ क्र. चे लेणेही मूळ वज्रयान पंथी. या लेण्याच्या जवळ एक बांधीव चौथरा दिसतो व शिलाहार काळ निदर्शक एक देवकोष्ठचा भाग सापडतो. यावरून असा अंदाज बांधता येतो की, येथे शिलाहार काळात एक छोटेसे देवालय असावे.

१७ वे व १८ वे लेणे वज्रयान पंथीच आहे.

गट १९, २०, २१, २२ व २३

१९ ते २३ हा गट शिलाहारांशी निगडीत आहे. शिलाहार काळात पन्हाळेकाजीत जे विशेष लक्षणीय काम झाले; ते केवळ या गटामधून दिसून येते. यातील १९ क्रमांकाच्या लेण्याची सुरुवात आधी झाली असली तरी ११ व्या शतकात शिलाहारशैलीचे एकाश्म देवालय म्हणून हे लेणे साकारले गेले. या देवळातील स्तंभ शिलाहारकालीन आणि गर्भगृह एकाश्म असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ आणि त्याच्या पाठीमागच्या भिंतीत दोन्ही बाजूस उत्तरामुख व अंतराळात समोरासमोर देवकोष्ठे आहेत. यावरून हे मंदिर पंचायतन म्हणून योजिले होते, असे दिसते. सभामंडपाच्या अंतराळाच्या व एकाश्म मंदिराच्या छतावर शिल्पे व उलट्या कमळाचे अलंकरण मध्यभागी असून बाजूच्या खणात रामायण व महाभारतातील प्रसंगाचे शिल्पपट कोरलेले आहेत. पूर्वेकडील खणात रामायण, पश्चिमेकडील खणात बाळकृष्णलीला व मधल्या खणात ( कमळाचे बाहेर ) पुन्हा कृष्णकथा कोरलेल्या आहेत. अंतराळाच्या बाजूस पहिला खण व व अंतराळ यामध्ये अधिष्ठान स्थापलेल्या शिवलिंगाची एक दंपती पूजा करीत असल्याचे एक दृश्य आहे. हे दृश्य मंदिर निर्माण करविणाऱ्या दानी दंपतीचे असावे. अंतराळाच्या पश्चिमेस छतावर आणखी ९ शिल्पे आहेत.

२१ क्रमांकाच्या लेण्यात मुख मंडपाच्या बाजूच्या भिंतीत एक विशाल शिलाहारकालीन गणेशमूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीमुळे या लेण्यास गणेशलेणे म्हणतात. हे लेणे मुळात विहार म्हणून बांधले असावे आणि त्याचा वापर वज्रयान पंथीयांनी केला असावा.

२२ क्रमांकाच्या लेण्यात मुखमंडपात बाजूच्या भिंतीत समोरासमोर गणेश व सरस्वतीच्या प्रतिमा आहेत तर गर्भगृहात सुमारे १४ व्या शतकामध्ये पद्मासनस्थ नाथयोग्याची मूर्ती कोरली आहे.

२३ क्रमांकाचे लेणे मुळात विहार म्हणून खोदले गेले होते. १२ व्या शतकात त्याचे शिलाहार मंदिरात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात मूर्ती संस्थापना करण्याअगोदरच येथील शैवपंथाच्या वर्चस्वास ओहोटी लागली असावी. या लेण्यात विध्वंसाची चिन्हे दिसतात. पण हा विध्वंस बराच नंतर झालेला असावा. कदाचित दाभोळ येथे विजापूरच्या इब्राहिम आदिलखानाच्या कारकिर्दीत मशिदी बांधल्या गेल्या; तेव्हा झाला असावा.

१४ व २९ गट

१४ वे लेणे मुळात हीनयान बौद्ध धर्मियांनी भिक्षुगृह म्हणून खोदले असावे. पण मागाहून त्याचा वापर वज्रयान प्राबल्य संपल्यावर नाथ पंथीयांनी केला असे स्पष्ट दिसते. नाथ पंथीयांचे पन्हाळेकाजी येथे केंद्र साधारणतः तेराव्या चौदाव्या शतकात तयार झाले असावे. या लेण्याच्या प्रांगणात एका घडीव चौकोनी दगडावर सिद्ध पादुका कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराचे बाजूस सहा-सहा अशी एकूण बारा शिल्पे आहेत. त्यातील पहिल्या चौकोनात योग पट्टसहित अर्धमत्सेंद्रासनात छताचे खाली एक सिद्ध आहेत. त्यांचा उजवा हाथ समोरील चौकोनातील स्त्री काही वस्तू देत आहे; ती घेण्यासाठी उंच केलेला असून डावा हाथ त्यांनी कुबडीवर ठेवलेला आहे. हा प्रसंग  कदलीवनात मत्सेन्द्रनाथांनी काही काळ तंत्रमार्गी योगिनींचे जाळ्यात शाक्त साधनेत घालवला त्यासंबंधीचा असावा, असा अंदाज व्यक्त करता येतो. आणि इतर कुठल्याही सिद्धाचे डोक्यावर छत नसताना फक्त याच सिधाच्या डोक्यावर आहे. याचा अर्थ ते नाथ पंथीयांचे प्रथम सिद्ध असावेत. उजव्या बाजूच्या वरच्या दोन प्रसंगात एकामध्ये एक स्त्री व दुसऱ्यात एक सिद्ध यांच्यातील संवाद चित्रित केला आहे. हा प्रसंग देखील मत्सेंद्रनाथांच्या जीवनावरील असावा, असा अंदाज दर्शवता येतो.

डाव्या बाजूच्या दुसऱ्या पटात (मधल्या चौकोनात) ध्यानस्थ चौरंगी नाथांची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हाथ पाय खांद्याजवळ आणि पाया जवळ वेगळे दाखवले आहेत. त्याच्या जवळची मूर्ती त्यांचे गुरुबंधू गोरखनाथ यांची असावी.

उजव्या बाजूच्या दुसऱ्या पटात द्वाराजवळील चौकोनात एक योगी चिमट्याने एका तीन पाटाच्या आसावर ठेवलेल्या कुंडामधील वस्तू उचलीत आहे. नाथपंथीय साधू रसविदयेत प्रवीण होते, हे दर्शविण्यासाठी ही प्रतिमा कोरली असावी. तर त्या शेजारच्या चौकोनात कोणी एक व्यक्ती हातामध्ये काही सामग्री घेऊन रसप्रक्रियेत मग्न असलेल्या सिद्धाकडे जात आहे असे दर्शवले आहे. डाव्या बाजूच्या खालच्या दोन चौकोनात एका बसलेल्या सिद्धाची मूर्ती असून ते एक पेटी उघडीत अथवा बंद करीत आहेत. तर त्याच्या शेजारच्या कोनात डाव्या हातात पात्र व उजव्या हातात दंड किंवा पळी घेतलेला सिद्ध पुरुष धावण्याच्या किंवा चालण्याच्या क्रियेत आहे.तर उजव्या बाजूच्या दोन चौकोनात एक लगुड घेतलेले सिद्ध व दुसरे व्याख्यान मुद्रेतील सिद्ध दाखविले आहेत. या लेण्याच्या द्वारशाखेवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि उंबरठ्याच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आहे.

२९ वे लेणे

हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत   चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे.

इतर चार भिंतींवर छोट्या छोट्या चौकोनात अनेक सिद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. उजवीकडील व डावीकडून भिंतीत दोन  मोठ्या कोनाड्यात दोन प्रमुख देवतांची स्थापना केली आहे. त्यापैकी उजवीकडून भिंतीत शरभ तंत्रामध्ये वर्णिलेल्या त्रिपूरसुंदरीचे ध्यान कोरलेले आहे. तिच्या चार हातांपैकी एका हातात बाण, दुसऱ्यात अंकुश, तिसऱ्यात इक्षुचाप,  चौथ्यात  पाश आहे. समोरच्या  भिंतीत  जटाधारी कानफाट्या नाथसिद्धाची  व्याख्यान मुद्रेत बसलेली मूर्ती आहे. या लेण्यात दक्षिणेकडील भिंतीचे मागील बाजूस दरवाजाच्या पूर्वस छोट्या चौकोनात ९, पूर्वेकडील भिंतीत १९ व उत्तरेकडील भिंतीत २९ ,पश्चिमेकडील भिंतीत १९, व पुन्हा  व दक्षिणेकडील भिंतीत दरवाजाच्या पश्चिमेस ९  अशी  एकूण ८५  शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पे  बहुतेक नाथ योग्यांची आहेत. या शिल्पांतील बहुतेक सर्व सिद्ध व्याख्यान मुद्रेमध्ये, पद्मासनात, अर्धमत्सेंद्रासनात, तर क्वचित चालताना आहेत. लेण्यांच्या बाहेर उघड्या प्रांगणावर लाकडी मंडप घालण्याची योजना होती, असे भिंतीतील खाचांमुळे स्पष्ट होते. दाराबाहेर एक छोटासा कट्टा आहे. तर थोडे उत्तरेकडे  वळल्यावर डाव्या बाजूस भैरव, हनुमान यांची  कोनाड्यात कोरलेली शिल्पे आहेत.हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत   चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे.

२४ ते २८ गट

या गटातील लेणी आकाराने लहान असून यात वैशिष्टपूर्ण असे काहीच आढळत नाही. फक्त २५  क्रमांकाच्या लेण्याच्या  प्रांगणात एक एकाश्म  लिंगयुक्त  मंदिर कोरले आहे.

म.न.देशपांडे यांच्या  अभ्यासानंतर २००४ साली  पन्हाळेकाजीत  आणखीन एक ताम्रपट सापडला. हा ताम्रपट त्याच गावातील ग.रा.जाधव यांच्या देवघरात पूजेला लावलेला होता. ठाण्याचे नाणे शास्त्राचे अभ्यासक आणि दक्षिण भारतीय परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत धोपाटे  यांनी तो अभ्यासला व त्याचे वाचन करून  भारतीय पुराभिलेख संस्थेला सादर केला. हा ताम्रपट शिलाहार राजवंशातील मल्लिकार्जुन राजा  पन्हाळेदुर्ग येथे राज्य करीत होता; त्यावेळचा आहे. या ताम्रपटात शिलाहारांनी जैन मंदिराला ग्रामदान केल्याचा उल्लेख प्रथमच आढळला. त्याआधी सापडलेल्या ताम्रपटातून शिलाहारांनी शिवमंदिरे, देवी मंदिरे आणि बुद्ध विहारांना ग्रामदान केल्याचे  उल्लेख आहेत. या ताम्रपटामुळे शिलाहारांच्या  इतिहासात नवीन भर पडली. शिलाहार  राजवंशातील सोळावा राजा अपरादित्य याचा  मल्लिकार्जुन  हा चौथा मुलगा होता. ( पहिला केशिदेव, दुसरा  विक्रमादित्य, तिसरा  हरिपालदेव व चौथा मल्लिकार्जुन ) हे चारही राजे सख्खे भाऊ होते. हे  या ताम्रपटाद्वारे  प्रथमच ज्ञात झाले.  शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची  राजधानी प्रणालक दुर्ग येथे होती. (प्रणालकदुर्ग-पन्हाळेदुर्ग- पन्हाळेकाजी काळानुसार झालेला अपभ्रंश.) शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता.

पन्हाळेकाजीचे लेणे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, याकरता अनेकांकडून अथक प्रयत्न झाले. पण धार्मिक स्थित्यंतरे पाहणाऱ्या या लेण्यांना आजही म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभलेली नाही. सध्या पर्यटन संख्या वाढते आहे, पण तरीही ती संख्या सुमार म्हणण्या इतपतच आहे. फक्त एक सुदैवाची बाब म्हणजे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे.

संदर्भ:

  • व्याख्यान दुसरे-तिसरे : म.न.देशपांडे
  • शोध पन्हाळेदुर्ग परिसराचा : शशिकांत शेलार
  • लेख – पन्हाळेकाजीची लेणी, शिलालेख :  भालचंद्र दिवाडकर दै.सागर ( रत्नागिरी आवृत्ती )

4 COMMENTS

  1. अप्रतिम आणि खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल.. हाकेच्या अंतरावर राहत असून सुद्धा जी माहित नव्हतं ती माहिती दिल्या बद्दल खरंच खूप आभार.

  2. नमस्कार,
    मी स्मितेश, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत आहे . मी कला शिक्षक पद्विकेच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे तर अखला प्रोजेक्ट करायचं असतो तर मी लेणी हा विषय निवडून रत्नागिरी तील दापोली तालुक्यातील पन्हालेकाजी येतील लेणी ची majy प्रोजेक्ट च्या विषयासाठी निवड केली मला या तुमच्या साईड वरून खूप चांगली प्रमाणात माहिती मिळाली पण मला ते त्म्रप्तचा फोटो हवा होता..त्याचा फोटो असेल तर मला mitesh [email protected] ya email la to foto plij takava hi vinti. Mi दापोलीतील रहिवासी आहे माझे गाव मुरुड आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here