चंडिका मंदिर, दाभोळ

0
12534

दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यापासून आत १ कि.मी. आणि दाभोळ बंदरापासून सुमारे ३-४ कि.मी. असलेल्या पठारावर चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू स्थान आहे. जांभ्या दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे ३ फूट उंचीची काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात आहेत. हातात तलवार, ढाल व अन्य आयुधे आहेत.

गुहेमध्ये जाण्याचा दरवाजा उंचीने अतिशय लहान असून वाकूनच आत शिरावे लागते. हे गुहेचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. आत शिरताच खाली गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.( ज्या पूर्वी नव्हत्या, केवळ घसरणीची वाट होती.) आत पूर्ण अंधार असतो आणि दोन माणसे जाऊ शकतील असाच मार्ग आहे. भिंतीचा आधार घेत पुढे गेल्यावर देवीसमोरील समईचा प्रकाश दिसतो आणि देवीच्या मंगलमय रूपाच दर्शन होतं. या अंधाऱ्या गुहेत येऊन देवीचं तेजोमय रूप पाहणं हा एक विलक्षण अनुभव असतो. शिवाय गुहेत केवळ गोडयातेलाचे नंदादीपच तेवत असतात. अन्य प्रकाश साधनांची येथे सक्त मनाई आहे.

देवीच्या गाभाऱ्यातील जागा अंधारात लहान भासत असली तरी देवीच्या सभोवताली ४०० माणूस उभं राहील एवढी आहे. म्हणून देवीला प्रदक्षिणा करून मूळ प्रवेश द्वाराशी आपल्याला परत येता येते.

देवीचं स्वयंभू स्थान असलेली ही गुहा पांडवकालीन आहे असे सांगितले जाते. पांडव अज्ञात वासात असताना त्यांनी आपल्या दैवी शक्तीने ही गुहा निर्माण केली. या गुहेत अनेक लहान-लहान भुयार आहेत. ही भुयार म्हणजे काशीला जाण्याचा मार्ग, असे म्हटले जात असे. आणि स्वयंभू स्थाना मागची कथा अशी की, गोसावी महंत ‘जमना पुरी’ यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व गुहेचा मार्ग आणि गुहेच्या द्वारावरील शिळा हटवण्यास सांगितले. जमना पुरी यांनी त्यानुसार गुहा शोधली व शिळा हटवली. गुहेत त्यांना देवीची पाषाणी मूर्ती आढळली. या मूर्तीची विशेषता म्हणजे ही केवळ कंबरेपर्यंत आहे म्हणजे देवीचे अर्धे शरीर जमिनीखाली आहे. जमना पुरी यांनी देवीची पूजा-अर्चा चालू केली. कालांतराने ही पूजा-अर्चा ‘बाळ पुरी’ या विश्वस्तावर सोपवून त्यांनी मंदिराजवळचं जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून देवीच्या पूजेचे हक्क पुरी घराण्याकडे आहेत. सध्या देवीची पूजा–अर्चा करणारी पिढी ही पुरी घराण्याची ३२ वी पिढी.

पुरी म्हणजे गोसावी दशनाम समाजातील. यांची मूळ उत्पत्ती शंकरापासून झालेली, असे म्हणतात. म्हणून यांना सोयर-सुतक लागत नाही. या समाजातील माणूस मृत पावल्यानंतर त्याच्या नामे शिव लिंग तयार केले जाते. इथेही मंदिराबाहेरील चौथऱ्यावर तुळशीवृंदावन व बरीचशी शिवलिंगे आहेत. यातील जमना पुरी यांच्या समाधी जवळ प्रेत अंत्यविधी आधी ठेवले जाते.

मंदिराचा परिसर म्हणजे सभोवताली कातळ आणि अरण्य. पावसाळी दिवसात जवळचं एक धबधबा कोसळतो त्याचे पाणी झरा बनून मंदिराजवळून वाहते. मंदिर मुख्य गावापासून दूर असल्यामुळे येथे ग्रामस्थांची व पर्यटकांची संख्या कमी आहे. अश्विन प्रतिपदा ते विजयादशमी या दिवसांत फक्त ही संख्या वाढलेली दिसते. या देवीला मांसाहार चालत नाही, ती शुद्ध शाकाहारी आहे म्हणून येथे बळी वगैरे देण्याची प्रथा नाही. शिवाय मंदिरातून कोणत्याही स्वरूपात वर्गणी आकारण्यात येत नाही व देणगी गोळा केली जात नाही. मंदिराचे सर्व अधिकार हे वंशपरंपरेने पुरी घराण्याकडे आहेत. त्यामुळे मंदिराची देखभाल वगैरे तेच पाहतात.

हे मंदिर पुरातन असून शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेदरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती, असा इतिहास सापडतो.

संदर्भ:

  • पुरी कुटुंबीय
  • अण्णा शिरगावकर – शोध अपरान्ताचा
  • विजय तोरो – परिचित आणि अपरिचित दापोली तालुका


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here