आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी घटना म्हणजे पेशवाईचा अस्त आणि इंग्रजी राजवटीचा उदय. भारतीय जनमानसावर असलेला धर्म-अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा लक्षात घेऊन ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षणाची रुजवात केली. पेशवाईनंतर व्यवसाय-उत्पन्नाच्या भ्रांतेत हरवलेल्या लोकांना डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, पाटील, कुलकर्णी अशा प्रशासकीय उतरंडीतील दुय्यम जागा देऊन त्यांनी लोकांमध्ये ब्रिटीशांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातील सतिप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता अशा अनेक अनिष्ट प्रथा त्यांनी कायद्याद्वारे बंद केल्या. अर्थात यात भारतीय सुधारकांचे योगदान मोठेच होते. शिवाय याच काळात महाविद्यालयं झाली. वृत्तपत्र, नियतकालिकं प्रकाशित होऊ लागली. पुढे कारखानदारी आली, रेल्वे धावू लागली, टपालखाते आले आणि महराष्ट्राच्या यंत्रयुगाला प्रारंभ झाला. सोबतच ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदू धर्मातील आणि समाजव्यवस्थतेतील दोष दाखवून लोकांना आपल्या धर्माकडे आकर्षित करण्याचा उद्योग सुरु केला.
१८५७ ची क्रांती फसल्यानंतर भारतातील विचारवंतांची सामाजिक प्रभोधनाची प्रचंड चळवळ सुरु झाली. आणि मिशनऱ्यांची टीका सहन न होऊन तिला सडेतोड उत्तर देण्याचेही प्रयत्न सुरु झाले. स्वधर्म आणि स्वसंस्कृतीची थोरवी पटवून देण्याकरता अनेक इंग्रजी शिक्षण घेतलेले लोक आपल्या प्राचीन वाङ्मयाच्या सखोल अभ्यासकडेही वळले. हा अभ्यास करताना आपल्या समाजाचे गुण व दोष हे दोन्ही लक्षात घेतले आणि सामाजसुधारणा व स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकू लागले.
या सर्व पार्श्वभूमीवर १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेचा जन्म झाला आणि अतिमतः १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा उदय झाला.
भारत रत्न महामाहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्या कार्याला ही सारी पार्श्वभूमी होती. काण्यांचे मूळ गाव मुरडे ( रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात ) सदाशिवराव काणे हे त्यांचे पणजोबा. ते पंचांगकर्ते होते. पणजोबांची तीन अपत्ये, शंकर, लक्ष्मण, रघुनाथ. शंकर हे काण्यांचे आजोबा. ते वैदिक पंडित होते व भिक्षुकीवर उपजीविका चालवायचे. याखेरीज ते ज्योतिषी आणि निष्णात वैद्यही होते. त्यांनाही तीनच अपत्ये, भास्कर, केदार, वामन. वामनराव हे काण्यांचे वडील. वामनरावांना संस्कृतचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. ऋग्वेद त्यांना जवळपास मुखोद्गत होतं. उपनिषदे आणि भगवद्गीता यांचाही त्यांना सूक्ष्म अभ्यास होता. सोबतच उपजीविकेचे साधन म्हणून वडील त्यांना भिक्षुकीचे पाठ देत होते. पण त्यांना भिक्षुकी पसंत नसल्यामुळे ते वयाच्या अठराव्या वर्षी पुण्याला गेले आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. पुढे वकिलीच्या परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १८७८ पासून दापोली न्यायालयात तालुका वकील म्हणून काम करू लागले.
त्या न्यायालयात इंग्रजीतून काम करणारे ते पहिले वकील होते. त्यापूर्वी सर्व वकील मराठीतून कामकाज चालवित असत. वामनरावांना तीन मुली व सहा मुले अशी एकूण नऊ अपत्ये. त्यातील दुसरे अपत्य हे पांडुरंग वामन काणे. चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०२ म्हणजेच शुक्रवार दिनांक ७ मे १८८० ला पेढे उर्फ परशुराम या आजोळ गावी त्यांचा जन्म झाला. पेढे हे गाव चिपळूण तालुक्यात आहे. काणे यांचे चितळे आजोबा म्हणजेच आईचे वडील हेही वैदिक पंडित आणि वैद्य होते. त्यामुळे संस्कृत विद्येचे बाळकडू काणे यांना दोन्ही कुलांकडून मिळाले होते म्हणायला हरकत नाही.
काणे यांचे प्रारंभिक शिक्षण वडिलांजवळचं झाले. ते एकपाठी होते. त्यांची स्मरणशक्तीही दांडगी होती. अगदी लहान वयातच त्यांना अमरकोशाचे ४०० श्लोक मुखोद्गत होते. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १८९१ साली दापोलीच्या ए.जी हायस्कूलमध्ये (त्यावेळी एस.पी.जी मिशन स्कूल) शालेय शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि तिथूनच बॉम्बे विद्यापीठाची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांची वाचनाची भूक जबरदस्त होती. त्यांचे अवांतर वाचन भरपूर चाले कारण वर्गात शिक्षकांकडून एकदा जे ऐकले ते त्यांना लगेच पाठ होत असे.
दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये त्यांचे हस्तलिखित आजही उपलब्ध आहे.
नंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईस गेले. विल्सन कॉलेज मुंबई येथून ते १९०१ मध्ये प्रथम क्रमांकाने बी.ए. उत्तीर्ण झाले. पदवी शिक्षणासाठी त्यांना संस्कृत विषयासाठी त्यावेळची प्रतिष्ठित भाऊ दाजी शिष्यवृत्ती मिळाली होती. १९०२ मध्ये ते एल.एल.बी झाले आणि १९०३ मध्ये झाला वेदांत पारितोषिकासह एम.ए.झाले.
नंतर ते शासकीय हायस्कूल, रत्नागिरी येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे ते ३ वर्ष होते. तेथून १९०७ मध्ये ते एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथे संस्कृतचे शिक्षक म्हणून रुजू झाले. १९०९ ते १९११ पर्यंत ते एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक होते. या दोन वर्षातच त्यांनी हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून दोन पुस्तके लिहली. आर्थिक गरज म्हणून इतरही अनेक शैक्षणिक पुस्तके प्रकशित केली. त्यांचा अध्यापन कार्याबरोबरच वकिली व्यवसायही चालू होता.
५ जुलै १९११ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी बॉम्बे हायकोर्टचे वकील म्हणून त्यांना सनद मिळाली.
१९१२ मध्ये हिंदू आणि मुस्लिम लॉ या विषयात एल.एल.एम ची परीक्षा त्यांनी दिली. १९११-१९१८ या काळामध्ये जवळपास दरवर्षी एक याप्रमाणे त्यांनी संस्कृत पुस्तके संपादित करून प्रकाशित केली. शिवाय कादंबरीचे तीन भाग, हर्षचरिताचे दोन भाग आणि उत्तमरामचरित्र अशी त्यांची अजून सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्याच काळात त्यांनी कायद्याचे खासगी शिकवणी वर्गही घेतले. १९१७ ते १९२३ अशी सहा वर्ष त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याचे प्रोफेसर म्हणून नोकरी केली. १९२४- १९२६ मध्ये तीन मुद्रित प्रती आणि आठ हस्तलिखितांचा आधार घेऊन व्यवहारमयूखची सटीप आवृत्ती तयार केली आणि भांडारकर संशोधन संस्थेने ती प्रकाशित केली.
व्यवहारमयूखच्या आवृत्तीकरता माहिती गोळा करत असताना त्यांचे धर्मशास्त्राचे चिंतन जसजसे वाढत गेले, त्यांच्या लक्षात आले की, ह्या विषयाची माहिती छोट्या प्रस्तावनेत समाविष्ट केल्याने त्या विषयाच्या समृध्दत्वाची आणि प्राचीनकाळची समाजरचना, तुलनात्मक न्यायदान पद्धती आणि ज्ञानाच्या इतर शाखा ह्यांच्या दृष्टीने धर्मशास्त्राच्या इतिहासाचे महत्त्व ह्याची पुरेशी कल्पना येणार नाही. तेव्हा त्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास पूर्णपणे स्वतंत्र रीतीने प्रसिद्धकरण्याचा निश्चय केला. पुढे १९२४ ला सुरु झालेला ज्ञानयज्ञ त्यांच्या १९७२ मध्ये झालेल्या निधनापर्यंत अखंड सुरु होता. त्यांनी करून ठेवलेले काम ५१ वर्षांनी म्हणजे १९७५ मध्ये धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या पाचव्या खंडाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर थांबले.
काणेंना लहानपणापासून अल्सरचे दुखणे होते. अनेक डॉक्टर-वैद्यांना दाखवून देखील त्यावर इलाज मिळाला नव्हता. शेवट त्यांनीच अनुमाने काढून स्वतःला पथ्ये घातली आणि काही उपाय शोधले होते. परंतु वाचा पंचेचाळीशीनंतर आत्महत्येचा विचार मनाला चाटवून जाईपर्यंत त्यांचे दुखणे वाढले होते, तरीही धर्मशास्त्राच्या इतिहासाचे अवघड व प्रचंड काम त्यांनी पूर्णत्वाकडे नेले.
या कार्यामागची अजून एक प्रेरणा म्हणजे एक संतापजन्य भूमिका. इंग्रज कवीची एकच कविता संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हणणारा मेकॉले किंवा भारतीयांना सत्याची कल्पनाच नाही, असे विधान करणारा लॉर्ड कर्झन आणि भारतीय संस्कृतीकडे तुच्छतेने पाहणाऱ्या पाशिमात्यांचा त्यांना खरपूस समाचार घ्यायचा होता म्हणून त्यांनी संस्कृत पंडित आणि मराठीवर प्रभुत्व असून धर्मशास्त्राचा इतिहास इंग्रजीत लिहिला. सुमारे सात हजार पृष्ठे या ग्रंथास खर्ची पडली.
‘धर्मशास्त्राचा इतिहास’ लेखन काळात भारतीय समाजात दोन प्रकारचे मतप्रवाह होते. काही लोकांच्या मते आपल्या सर्व प्राचीन रूढी कालबाह्य झालेल्या असून त्या पूर्णपणे टाकून देऊन सामाजिक सुधारणा तातडीने आमलात आणली पाहिजे आणि दुसरे काही असे मानत होते की आपल्या धर्मात सांगितलेल्या सर्व गोष्टी आजही इष्ट आहेत. त्यांचे निष्ठेने पालन केले पाहिजे. परंतु काणे मात्र समन्वयवादी होते. जुने ते सर्व सोनेही नाही आणि टाकून देण्याजोगे पण नाही असे ते मानत. प्राचीन कालचा इतिहास सांगताना ते वर्तमानाला जराही विसरत नाही आणि भविष्याकडेही दूरदृष्टीने पाहतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीत उमटणाऱ्या समस्या, त्यावर मात करण्यासाठी उपाय आणि भारतीय समाजाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल त्यांनी या ग्रंथांतून ठोसपणे मांडले आहे.
धर्मशास्त्रावरील कोणत्याही विवादामध्ये विदेशी तसेच भारतीय विद्वान या ग्रंथातील मताला प्रमाण मानतात एवढा हा ग्रंथ विद्वत्तापूर्वक लिहिला गेला आहे. या ग्रंथाचे भारतीय समाजव्यवस्थेतील स्थान लक्षात घेऊन भारत सरकारने निव्वळ या ग्रंथनिर्मितीसाठी १९६३ मध्ये त्यांना ‘भारत रत्न’ हा पुरस्कार प्रदान केला. या ग्रंथामुळे अनेक धार्मिकवाद सोडवले गेले.
हिस्टरी ऑफ पोएटिक्स हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ. धर्मशास्त्र आणि काव्यशास्त्र याखेरीज त्यांनी प्राचीन ग्रहज्योतिष आणि फलज्योतिष, भारत-महाराष्ट्र-कोकण-विदर्भ सांस्कृतिक इतिहास आणि भूगोल, मराठी भाषा, तिचे व्याकरण, परिभाषा आणि शुद्धलेखन, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, नाट्यशास्त्र अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या नावावर एकूण १९८ प्रकाशने आहेत. त्यात ३९ ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय व परीक्षणे आहेत.
१९४२ ला काणेंना त्यांच्या विद्वत्येसाठी ब्रिटीश सरकारने ‘महामहोपाध्याय’ (श्रेष्ठ गुरूंमध्ये श्रेष्ठ) या ( संस्कृत विद्वानाला दिली जाणारी ) पदवीने सन्मानित केलं. १९४७ ते १९४९ ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. १९५८ साली त्यांचा राष्ट्रपतीकडून गौरव झाला.
शिवाय कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या स्थापनेत त्याचं महत्वाचं योगदान होतं, राज्यसभेत त्यांची दोन वेळा नियुक्ती झाली, विविध व्यासपीठे आणि माध्यमांतून त्यांनी पुष्कळसं सामाजिक योगदान दिलं, १९२२ मध्ये स्थापन झालेल्या दापोली शिक्षण संस्थेच्या पहिल्या कार्यकारी व नियामक मंडळाचे ते सदस्य होते आणि १९३८ ते १९४६ पर्यंत संस्थेचे अध्यक्ष.
दापोली गावात फॅमिली माळमध्ये सध्याच्या हॉटेल रेसिडन्सी समोर त्यांचे घर होते. त्यावेळी घर नं. ४६ होता. नोव्हेबर २०१६ मध्ये ते घर पूर्णता पाडण्यात आले आणि आता तेथे इमारत उभी राहिली आहे. काणे यांना कोर्टाला सुट्या लागल्या की, कुटुबीयांना घेऊन ते दापोलीत येत असत. दापोलीत आल्यावर दगड मारून, धावपळ करून झाडावरचा रानमेवा हस्तगत करण्यात ते मुलांच्यात सामील होत असत. त्यावेळी मात्र आपल्या विद्वत्तेची शाल ते घरीच काढून ठेवायचे.
संदर्भसाधने:
महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला (संच) – पद्माकर दादेगावकर
परिचित अपरिचित दापोली तालुका – प्रा. डॉ. विजय अनंत तोरो