ग्रामदैवत काळकाई , दापोली

2
10463

२६ मार्च १९९० रोजी दापोली ग्रामपंचायतीचे नागरपंचायती मध्ये रूपांतर झाले. सध्या हा परिसर ‘काळकाई कोंड’, ‘खोंडा’(पाटीलवाडी), ‘नागरबुडी’ व ‘प्रभू’ आळीचा काहीसा भाग यात विभागलेला आहे. ‘काळकाई’ ही जोगेळे गावाची ग्रामदेवता आणि ‘कोंड’ म्हणजे पूर्वी मूळ गावापासून थोड्या लांब असलेल्या वस्तीला कोंड म्हणित असतं. ( मुंबई – ठाण्यात अशा वस्त्यांना पाडा व रत्नागिरीकडे वाडी म्हटले जात असे. ) दापोली एस. टी. आगारा जवळ असलेल्या काळकाई कोंडावर जोगेळे गावाच्या ग्रामदेवतेचं ( काळकाईचं ) अतिशय सुंदर असं देऊळ आहे.

मंदिराची डागडुजी अनेक वेळा झाली असली तरी त्यात पारंपारिकतेच्या खुणा आहेत. मंदिराला भोवताली विस्तीर्ण अशी जागा लाभलेली आहे; ज्यामध्ये शेकडो वर्ष जुने मोठे-मोठे वृक्ष आहेत. मंदिरात काळकाईची काळ्या पाषाणातील नयनरम्य अशी मूर्ती आहे. देवीच्या चार हातांपैकी फक्त एका हाती तलवार आहे. इतर हात निशस्त्र, रिकामे आहेत.

शिमगा व नवरात्रीस देवळात खूप मोठा उत्सव असतो. शिमग्याला देवळाबाहेर निशाण उभारलं जातं, गोंधळ घातला जातो आणि पालखीत रूपे बसवले जातात. मग काळकाई देवीची पालखी संपूर्ण जोगेळे गावात फिरवली जाते. काळकाईच्या पालखीत तीन रूपे ठेवले जातात. हे तीन रूपे म्हणजे आगरातील काळकाई, काळकाई कोंडावरील काळकाई आणि ताम्हणकरीन अशा तीन बहिणी. म्हणूनच काळकाई कोंडावरून पालखी निघाली की आगरातील काळकाई जवळ येते. तिथे मान झाला की मग पालखी पुढे होते.


पहा २०१९ ची काळकाईदेवी ची पालखी : https://talukadapoli.com/folk-art/kalkaidevi-palakhi-2019/


ही आगरातील काळकाई म्हणजे कोंडावरील काळकाईचं मूळ उगमस्थान, स्वयंभूस्थान असंही काहीजण सांगतात. हे स्थान प्रभू आळीत कांता खोताच्या बागेत आहे असं म्हणतात; परंतु ती बाग कांता खोताची नसून त्याची मेहुणी ‘कुमुदिनी गणेश दातार’ यांची आहे. ही बाग पूर्वी दांडेकरांची होती. ती त्यांनी पोतकरांस विकली. पोतकरांकडून ती दातारांकडे आली. हे दातार म्हणजे मुरूडच्या नवलाख दातारांपैकी एक.

(पेशवाईच्या काळात एक मराठा सरदार कोकणात भूमिगत होऊन मुरूडच्या दातारांकडे रहात होता. त्याचा अन्य कुणास संशय लागू नये म्हणून त्याला गुराख्याचे किंवा गड्याचे काम दिले जाई. परंतु रात्रीच्या वेळेस मात्र दातार त्याची पाय चेपून सेवा करीत असत. त्या सरदाराने परतीच्या वेळेस दातारांना नऊ लाखाची बक्षिसी दिली. तेव्हापासून मुरुडमधील दातार ‘नवलाख दातार’ म्हणून प्रचलित झाले.) या स्वयंभू स्थानाला मंदिर नाही. त्या ठिकाणी मंदिर करण्याचा प्रयत्न केल्यास देवीचं मंदिर होऊ देत नाही असं काही लोक म्हणतात व काहीजण ग्रामदेवतेची दोन मंदिरे गावात असू नयेत म्हणून मंदिर बांधलं जात नाही असे सांगतात. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्थान खाजगी जागेत जरी असलं तरी ते सर्वांसाठी खुलं आहे. ताम्हणकरीणीचे स्थान हे एस.टी.आगार मागील जोग नदीच्या पऱ्यापाशी आहे.

‘श्री.प्रकाश गणपत साळवी’ हे सध्या देवळाचे अध्यक्ष आहेत आणि ‘श्री.जयंत साळवी पाटील’ हे पुजारी. ‘श्री.वसंत कदम’ हे देवस्थानचे जुने व ज्येष्ठ मार्गदर्शक. काळकाईचं मंदिर हे ‘काळकाई कोंडावर’ सुरुवातीस नेमकं कोणी आणि किती साली बांधलं याचा आज कोणताही पुरावा नाही; परंतु पिढीजात मिळालेल्या माहितीनुसार मंदिर ४०० ते ५०० वर्षें जुनं असल्याची खात्रीशीर माहिती लोक देतात. या काळकाईच्या देवळात जे उत्सव, कार्यक्रम पार पडतात ते अगदी एकोप्याने होतात. पूर्वीपासून येथे मान, विड्याची प्रथा नाही. हजर असलेल्या प्रत्येकास येथे मान मिळतो. म्हणूनच ग्रामस्थ दर्शनासाठी आणि सेवेसाठी मंदिरात आवर्जून येतात.

2 COMMENTS

  1. काळकाई देवीची माहिती आपल्या पोस्ट द्वारे कळली,आभार,मी दीपक साळवी ,माझे वडील अंकुश शिवराम साळवी, काका विश्राम धोडू साळवी,भिकू साळवी हे काळकाई चे मूळ पुजारी होते ,सध्या जयंत साळवी आणि माझा लहान भाऊ दिनेश साळवी या दैवताचे पुजारी मानकरी आहेत,एकंदरीत माहिती वाचनीय आहे ,मूर्ती बदल मला अधिक माहिती कुठे मिळेल

  2. खूप छान माहिती मिळाली.
    पण सर मला आई कालकाई देवीचे दोन मावळे कोण होते आणि त्यांची नाव काय ते समजलं असत तर बरं झालं असत ह्याची माहिती दिली तर अतिउत्तम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here