भारतीय समुद्री किनाऱ्यावर सागरी कासवांच्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकबिल व लॉगर या चार जाती आढळतात. रत्नागिरी समुद्र किनारी प्रामुख्याने ‘ऑलिव्ह रिडले’ नावाचे कासव आढळते. ‘ऑलिव्ह रिडले कासव’ हे सागरी निसर्ग संतुलनात फार महत्वाची कामगिरी पार पाडत असते. मृत अथवा आजारी मासे किंवा इतर जलचर खाऊन हे कासव समुद्र सफाईचे महत्वपूर्ण काम करते. तसेच समुद्रातील पाण वनस्पतींची अमर्याद वाढ रोखण्यासाठी देखील ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांची मदत होते. अशा या सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन दापोली तालुक्यातील सागर किनाऱ्यावर वसलेल्या ‘कोळथरे’ या गावी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वन विभागामार्फत गावातील दोन व्यक्तींची ‘कासव मित्र’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हे कासव मित्र ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांनी समुद्राच्या किनारी भागात (नोव्हेंबर ते मार्च दरम्यान) घातलेली असुरक्षित अंडी गोळा करतात व नंतर ही अंडी सुरक्षितता व संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिमपणे तयार केलेल्या हॅचरी मध्ये नैसर्गिक पद्धतीस मिळते जुळते घरटे तयार करून ही अंडी उबवेपर्यंत त्यांचे संरक्षण करतात. नंतर अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात सोडली जातात.
यंदा (२०१९) दिनांक १ एप्रिल ते ८ एप्रिल या दरम्यान जवळ-जवळ ३५० पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आली. तर गेल्यावर्षी हाच आकडा २१३१ इतका होता. (ऑलिव्ह रिडले कासवे हे दरवर्षी अगर दोन –तीन वर्षाच्या अंतराने अंडी घालतात.)
२००६ साली सह्याद्री निसर्ग संस्था व वन विभाग यांच्या सहकार्याने कासवांचे घटते प्रमाण पाहता कोळथरे येथे कासव संरक्षण व संवर्धनास सुरुवात झाली; परंतु सन २०१४ नंतर मात्र कासव संरक्षण व संवर्धनाचे संपूर्ण काम वन विभाग पहात आहे. सुरुवातीला ‘वेळास’ या गावी कासव संवर्धनाचा उपक्रम सुरु करण्यात आला व आता कोळथरे, मुरुड, लाडघर, कर्दे, केळशी या समुद्र किनारी भागात कासव संरक्षण व संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांची सर्वसाधारण माहिती :
शास्त्रीय नाव | LEPIDOCHELYS OLIVECEA |
अंदाजे वयोमर्यादा | ५० वर्षापर्यंत |
वजन प्रौढ नर | २५ – ४६ किलो पर्यंत |
मादी | ३५ -४६ किलो पर्यंत |
आकारमान | लांबी सुमारे २ फूट |
अंडी देण्याची क्षमता | ४० ते १७० पर्यंत |
अंडी उबविण्याचा कालावधी | ४५-५५ दिवस |
नवजात पिल्लांचे आकारमान | लांबी ३७-५० मि .मी |
नवजात पिल्लांचे वजन सुमारे | १२- २३ ग्रम |
खाद्य | मृदुकाय प्राणी ,जेलीफिश ,शेवाळ इ . |
विणीचा हंगाम | प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च |
नवजात पिलाचा रंग | काळसर |
मोठ्या कासवाचा रंग | तपकिरी |
नराच्या पाठीचा आकार | काहीसा हृदयाच्या आकारासारखा |
मादीच्या पाठीचा आकार | थोडासा गोलसर |
कासव संरक्षण व संवर्धन का आवश्यक आहे?
समुद्र किनारी भागात भरती रेषे पलीकडे कासवानी घातलेल्या अंड्यांची वन्य प्राण्यांकडून नासधूस केली जाते. तसेच, मानवाकडून देखील अंडी खाणे व इतर कारणासाठी तस्करी होण्याची शक्यता असते, कासवांची अंडी ही या भागातील वन्य प्राण्यांचे मोठे खाद्य आहे कोल्हे,कुत्रे,तरस, कावळे, व इतर समुद्र पक्षी यांपासून धोका असतो . किनारपट्टीवर मांसा साठी कासवांची हत्या केली जाते. परिणामी सागरी पर्यावरण स्वच्छ ठेवणाऱ्या कासवांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. हे रोखण्यासाठी व सागरी पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी सागरी कासव संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे .