दापोलीतील कबड्डीपटू – बाबू लाले

1
4408


कबड्डी हा कोकणातल्या लाल मातीत रंगणारा एक प्रमुख खेळ. काही वर्षांपुर्वी ‘ हुतुतू ‘ या नावाने खेळला जाणारा हा खेळ नंतरच्या काळात ‘कबड्डी‘ याच नावाने प्रचलित व प्रसिद्ध झाला. कोकणच्या लाल मातीने अनेक धुरंधर कबड्डीपटू कबड्डी विश्वाला दिले आहेत. अनेक जागतिक व राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धांमध्ये कोकणातील किंबहुना दापोलीतील अनेक कबड्डीपटू चमकले आहेत व अनेकांनी देशाचे प्रतिनिधित्व व नेतृत्वही केले आहे. काही वर्षांपुर्वी दापोली तालुक्यातील प्रत्येक गावात असे हुन्नरी व चमकदार कामगिरी करणारे कबड्डीपटू उदयास आले होते. गावोगावी होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये युवा खेळाडूनी चमकदार कामगिरीही केली होती. आजदेखील दापोली तालुक्यात अनेक ठिकाणी आकर्षक बक्षिसांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात.


दापोली तालुक्यातील टाळसुरे या गावचे सुपुत्र असलेले बाबू लाले हे एक मुंबईसह राज्यभरात नावाजलेले कबड्डीपटू आहेत. तरुण वयात इतर मुलांप्रमाणेच त्यांनी नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. सन १९५७ पासून मुंबईत गिरगांव येथे नोकरी करीत असताना दररोज रात्री दहानंतर बाबू लाले गिरगाव चौपाटीवर जात असत. तेथे त्यांच्यासारख्याच समवयस्क व नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या सवंगड्यांना गोळा करून ते लाठीकाठी खेळत असत. थोड्याच अवधीत बाबू लाले लाठीकाठी किंवा बनाटी खेळात तरबेज झाले. बनाटीचे बावन्न हात ते अगदी सराईतपणे करून दाखवित. याच लाठीकाठीच्या खेळातली चपळता व लवचिकता पुढे त्यांना हुतुतू किंवा कबड्डी खेळताना उपयोगी पडली. सन १९५७ मध्येच बाबू लाले यांनी लाठीकाठीसोबतच हुतुतू खेळण्यास सुरुवात केली.

त्या काळात कबड्डी या खेळाचे नाव हुतुतू असेच प्रचलित होते. मात्र पुढे याच हुतुतुचे कबड्डीत रुपांतर झाले असले तरी दोन्ही खेळांचे व मैदानांबिबतीत काही स्वतंत्र नियम होते. कबड्डीचा संघ हा प्रत्यक्ष खेळणाऱ्या सात खेळाडुंचा असतो तर पुर्वीच्या हुतुतू संघात नऊ खेळाडू खेळत. हुतुतुच्या मैदानाचा आकारही कबड्डीच्या मैदानापेक्षा थोडा मोठाच असे. पुढे पुढे हुतुतू खेळाची लोकप्रियता कमी कमी होत गेली आणि हुतुतू या खेळाची जागा कबड्डीने घेतली. सन १९५७ मध्ये बाबू लालेंसोबत सिताराम सोलकर, पांडुरंग लाले, गोविंद तांबे, सखाराम लाले हे देखील हुतुतू खेळत असत.

Babu Lale Kabaddi Player from Dapoli

सुरुवातीस क्षेत्रपाल हुतुतू क्रीडा संघाकडून खेळताना बाबू लाले यांनी त्यांच्या अंगी असलेले क्रीडा नैपुण्य दाखविण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात दादरच्या विठ्ठल हुतुतू क्रीडा संघाकडून हुतुतू खेळताना बाबू लाले यांना त्या संघाचे कर्णधार असलेल्या रामजी राजाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रामजी राजाणे यांनी त्यांना कबड्डीतील अनेक तंत्रे शिकविली. त्यामुळेच नंतर बाबू लाले यांनी रामजी राजाणे यांनाच आपले कबड्डीतील गुरु मानले. बाबू लाले यांनी हुतुतू व कबड्डी अशा दोन्ही प्रकारांत प्राविण्य दाखवले. विठ्ठल हुतुतू क्रीडा संघातून बाबू लाले यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हुतुतुचे सामने गाजवले. मात्र बाबू लाले यांना मुंबईत कोणत्याही प्रसिद्ध हुतुतू संघात स्थान मिळत असले तरी त्यांच्या साथीदारांना हवी तशी संधी किंवा संघात स्थान मिळत नव्हते.

आपल्या साथीदारांनाही त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्यातल्या खेळाडूवर अन्याय होऊ नये म्हणून पुढे सखाराम कानसे यांच्या मदतीने बाबू लाले यांनी सन १९६० मध्ये मुंबईतच ‘ विजय दापोली ‘ हुतुतू संघाची स्थापना केली. या संघाकडून अनेक नामवंत खेळाडू खेळत असल्याने हा संघ अल्पावधीतच खूप नावारूपास आला. मुंबईच्या हुतुतू क्षेत्रात या संघाचा चांगलाच दबदबा निर्माण झाला असतानाच मुंबईत विजय हुतुतू क्रीडा संघ याच नावाने अनेकांनी हुतुतू संघ स्थापन केल्याने बाबू लाले यांनी आपल्या संघाचे नाव बदलून ‘ अमर भारत क्रीडा मंडळ ‘ असे ठेवले.

Babu Lale Kabaddi Player from Taluka Dapoli
 

अमर भारत या संघासाठी बाबू लाले यांनी अनेक तरुणांना खेळाडू म्हणून घडवले. अमर भारत संघातून बाबू लाले मुंबईत विविध ठिकाणी सुमारे पंधरा ते सोळा वर्षे कबड्डी खेळले. मुंबईतील असे एकही कबड्डी मैदान नाही की, ज्या मैदानात बाबू लाले खेळले नाहीत. या काळात त्यांच्या अमर भारत कबड्डी संघाने विविध ठिकाणच्या कबड्डी स्पर्धा गाजवल्या. विविध मैदानांवर मोठमोठी बक्षिसे पटकावित त्यांनी अमर भारत आणि बाबू लाले या दोन्ही नावांचा कबड्डीच्या क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण केला. आर्थिक समस्या, खेळाडुंचा प्रवास, दगदग, खेळाडुंच्या निवासाची व्यवस्था आदी कारणांमुळे अमर भारत संघाला कबड्डी खेळण्यासाठी मुंबईबाहेर जाता आले नाही. मात्र मुंबईत अनेक अजिंक्यपदांवर या संघाने स्वतःचे नाव कोरले. याच काळात बाबू लाले यांनी अनेक मुलांना कबड्डीचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली व मुंबईत अनेक हरहुन्नरी व तरुण कबड्डीपटू नावारूपास आले.

कबड्डी खेळातील बाबू लाले यांचे नैपुण्य बघून मुंबईतील एम.एन. कलवा या खाजगी कंपनीने त्यांना त्यांच्या कंपनीत नोकरी दिली. या कंपनीत नोकरी करीत असतानाच बाबू लाले एम.एन. कलवा या कंपनीच्या संघातून आणि पुढे ‘ गोल्ड स्पाॅट ‘ कबड्डी संघातून खेळू लागले. गोल्ड स्पाॅट हा संघ प्रसिद्ध कोकाकोला कंपनीचा संघ होता. याच कंपनीच्या माध्यमातून ते मुंबईसह संपूर्ण कोकणात फिरले. कोकणातील तरुण खेळाडू हुडकून त्यांनी त्या सर्वांना कबड्डीचे धडे शिकवले. पुढे गोल्ड स्पाॅट संघातून असे अनेक खेळाडू खेळले. सन १९७२ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे खेळण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे बाबू लाले यांनी प्रतिनिधित्व केले. जालंधर येथे कबड्डी स्पर्धेत खेळताना बाबू लाले यांनी संघासाठी भरीव कामगिरी केली.

अमर भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बाबू लाले मुंबईत दरवर्षी एकवीस दिवसांचा क्रीडा महोत्सव भरवित असत. या महोत्सवात मुंबईतील अनेक मातब्बर संघ व खेळाडू सहभागी होत असत. दरवर्षी एकवीस दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते होत असे. अमर भारतच्या माध्यमातून बाबू लाले यांनी कोकणातील अनेक युवा कबड्डीपटुंना प्रशिक्षण देऊन चांगले खेळाडू बनविले.

Babu Lale Kabaddi Player from Taluka Dapoli
दापोलीच्या क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान देताना बाबू लाले यांनी अनेक युवा कबड्डीपटूंना प्रकाशझोत आणले. त्या काळात दापोलीतील आझाद मैदान येथे यशवंत बलवर्धक क्रीडा मंडळ दरवर्षी कबड्डीचे भव्य सामने व क्रीडामहोत्सव भरवित असत. आझाद मैदानात दरवर्षी हा कबड्डी महोत्सव भरत असे. मात्र असे असले तरी बाबू लाले यांच्या अमर भारत संघाने या स्पर्धेत सलग तीन वर्षे कबड्डी अजिंक्यपद पटकावले होते. यशवंत बलवर्धक क्रीडा मंडळाच्या कबड्डीमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाबू लाले यांनी अनेक स्थानिक कबड्डीपटू घडविले, ज्यांनी पुढील काळात राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व केले. दापोली बसस्थानकातही पुर्वी दरवर्षी श्री दत्त जयंती निमित्ताने कबड्डीस्पर्धेचे आयोजन होत असे.

फार पुर्वीपासून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. पुर्वी या स्पर्धेतही दापोलीपेक्षा बाहेरचेच खेळाडू खेळून सर्व बक्षिसे घेऊन जात असत. या गोष्टीचा विचार करून बाबू लाले यांनी दापोलीतील अनेक खेळाडुंना कबड्डीचे बाळकडू पाजून त्यांना प्रशिक्षित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे दापोलीच्या लाल मातीत अनेक खेळाडू नावारूपास आले.


सन १९६० पासून बाबू लाले यांनी पुढच्या पन्नास पंचावन्न वर्षांपर्यंत कबड्डी खेळासाठी भरीव योगदान दिले. अमर भारत च्या माध्यमातून त्यांनी दापोलीतील अनेक युवा खेळाडूंना प्रोत्साहन व प्रशिक्षण दिले. एकाहून एक असे सरस कबड्डीपटू घडविले. दापोलीच्या दैदीप्यमान क्रीडाविश्वात कबड्डी खेळात दैदीप्यमान कामगिरी करणारे शेकडो खेळाडू त्यांनी प्रशिक्षित केले. वृद्धापकाळामुळे दि. १ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांचे निधन झाले असले तरी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कबड्डी खेळासाठी भरीव योगदान दिले. त्यांचा टाळसुरे येथील कबड्डी संघ आजही ‘अमर भारत’ याच नावाने दिवसेंदिवस यशाचे एकेक शिखर पादाक्रांत करीत आहे.

बाबू लाले यांचा वारसा संभाळतानाच आजही या संघातून नवनवीन कबड्डीपटू उदयास येत आहेत. दापोलीतील किंवा मुंबईतील कबड्डीचा जेव्हा विषय येतो, चर्चा होते तेव्हा बाबू लाले यांच्या उल्लेखाखेरीज हा विषय पूर्ण होत नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत कबड्डी खेळास प्राधान्य देणारा आणि या खेळाच्या उत्कर्षासाठी रात्रंदिवस झटणारा बाबू लाले यांच्याखेरीज दुसरा खेळाडू नसावा. दापोलीच्या क्रीडापटलावर बाबू लाले यांचे नाव यानंतरच्या काळातही मोठ्या दिमाखात झळकत राहील यात शंका नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here