बालापीर दर्गा

0
1527

इ. स. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस सय्यद हमीद अमरुद्दीन नावाचे एक मुसलमान धर्मोपदेशक कर्नाटकातून थेट दाभोळपासून अर्ध्या मैलावर असलेल्या देर्देच्या डोंगरावर घोड्यावरुन आले. त्याच्या सोबत त्याची पत्नी व मुलगाही होता. ब्रिटीश गॅझेटिअर मधील उल्लेखांनुसार सय्यद हमीद अमरुद्दीन उर्फ बालापीर हे ‘ दक्षिणी वाणी ‘ होते. दाभोळ हा परगणा खरे तर इतिहासप्रसिद्धच आहे. अनेक युद्धे, आक्रमणे, कत्तलींचा रक्तरंजित इतिहास असलेल्या या परगण्यात या मुसलमान संतानी त्यांचे धर्मप्रसाराचे काम सुरु केले. दाभोळ हे त्या काळातील सर्वच राजवटींचे कोकणातील प्रमुख सत्ताकेंद्र होते. दाभोळ परगण्यावर आपली हुकुमत रहावी यासाठी अनेक परकीय सत्ता व राजवटींनी दाभोळ परगण्यावर अनेकदा आक्रमणे केली. मात्र अशाच धामधुमीच्या काळात सय्यद हमीद अमरुद्दीन उर्फ बालापीर यांनी कोणतीही हिंसा किंवा रक्तपात न करता धर्मोपदेशकाचे कार्य केले.

सय्यद हमीद अमरुद्दीन उर्फ बालापीर हे कर्नाटकातून थेट देर्देच्या अतिदुर्गम डोंगरावरच का राहिले? त्या काळात दाभोळ परगणा म्हणजे समृद्ध नगरच होते. दाभोळ नगराच्या आसपासच्या परिसरात अतिशय दाट अशी नागरी वस्ती होती व आजही आहे. मात्र अशी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी नागरी वस्ती सोडून बालापीर देर्देजवळच्या अतिशय दुर्गम, ओसाड व समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार मीटर उंचीवर असलेल्या डोंगरावरच राहिले. आजही या पठारावर सहजासहजी जाणे शक्य होत नाही. आजही या डोंगरावर कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. मग त्या काळात त्या डोंगरावर वस्ती करणे हे खरेच खूप मोठे आव्हान होते. एक मात्र निश्चित की, या डोंगरावरून सभोवार पाहिले असता दाभोळ शहर व आसपासच्या पाच सहा गावांचे संपूर्ण चित्र अगदी सुस्पष्ट दिसते. दाभोळबंदर व खाडी खूप नयनरम्य दिसते. मात्र बालापीर यांनी त्या काळात वस्तीसाठी तेच उंच व शंक्वाकृती क्षेत्र का निवडले याविषयी कोठेही ठोस माहिती वा पुरावा उपलब्ध नाही. बालापीर दर्गा व मशिदीचा अधिक अभ्यास करण्यासाठी तालुका दापोली डाॅट काॅमने (www.talukadapoli.com) या परिसरातील काही बुजुर्ग व्यक्तींशी संवाद साधून या दर्ग्याविषयी अधिक माहिती प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. येथील मशिदीच्या निर्मिती विषयीची एक कथा प्रसिद्ध आहे. बालाशेट म्हणजेच बालापीर त्यांच्या हरवलेल्या बैलाला शोधत असताना त्यांनी मनात ठरवले की, ज्या ठिकाणी बैल सापडेल त्या ठिकाणी मशीद बांधायची. उंच डोंगरावर ज्या ठिकाणावर हा बैल त्याला सापडला त्याच ठिकाणी त्यांनी ही मशीद बांधली आहे.

देर्दे हे गाव तसे दाभोळपासून अतिदूर नाही. दाभोळपासून केवळ अर्ध्या मैलाच्या अंतरावर बालापीर यांनी बांधलेली ही मशीद आहे. देर्दे येथील श्री देवी सातमाई मंदिराच्या अगदी समोरच बालापीर यांनी बांधलेल्या मशिदीचे प्रवेशद्वार आहे. मात्र तिथून खूप मोठी चढण पायीच चढून येथील मशिदीत जाता येते. सुमारे दोनशे ते आडीचशे पायऱ्या चढताना तसा खूप थकवा जाणवतो. मात्र एकदा का पठारावर गेलो की, बालापीर दर्गा व आसपासचा परिसर पाहून हा थकवा क्षणात निघूनही जातो. बालापीर दर्ग्याला व मशिदीला आता पुर्वीसारखे वैभव राहिलेले नाही. परंतु मशिदीकडे व सभोवार पाहिल्यावर गतकाळातील हे ठिकाण किती समृद्ध होते याची कल्पना येते.

ज्या काळात बालापीर या डोंगरावर आले त्या काळात येथे सहसा कोणी राहत नसावे. समुद्र सपाटीपासून खुपच उंच असे हे ठिकाण असल्याने येथे पिण्याच्या पाण्याचेही खूप दुर्भिक्ष्य असावे. लालसर जांभ्या दगडाचे असे विस्तीर्ण कातळवजा डोंगर पाहिल्यावर येथे कातळात पाणी मिळेपर्यंत विहीर खोदणे हे अशक्यप्राय आव्हान बालापीर यांनी स्वीकारून या डोंगरावरच विहीर खोदण्यात सुरुवात केली. कातळात खोदकाम करत करत खूप खोल गेल्यावर या विहीरीला पाणी लागले. पायऱ्या उतरत उतरत आजही या विहीरीत तळापर्यंत उतरता येते. आज या परिसराची म्हणावी तशी डागडूजी कोणी करत नाही. पण आजही ही पायऱ्यांची खोल विहीर सुस्थितीत आहे. विशेष म्हणजे या विहीरीचे पाणी भर उन्हाळ्यातही सदासर्वकाळ थंडगार असते. इतक्या उंचीवर जाऊन कातळात अशी विहीर खोदणे हे खरे तर एक आश्चर्य मानावयास हवे. ही विहीर खोदताना जांभ्या कातळाचे जे तुकडे बाहेर काढण्यात आले याच जांभ्या दगडाच्या तुकड्यांचा वापर करुन बालापीर यांनी येथे ही मशीद बांधली. मशिदीचे बांधकाम आता जुनाट झाले आहे. काही ठिकाणी किरकोळ पडझडही झाली आहे. मात्र ही मशिदही अगदी सुस्थितीत बघावयास मिळते. बालापीर यांच्या मृत्यूनंतर या मशिदीच्या बाजूलाच बालापीर यांचे थडगे बांधण्यात आले आहे.

हाच तो प्रसिद्ध बालापीर दर्गा. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधण्यात आलेल्या या मशिदीविषयी व बालापीर दर्ग्याविषयी, या पवित्र धर्मोपदेशकाविषयी सविस्तर व अधिकृत माहिती कोठेही उपलब्ध नाही. येथील मशिदीत बालापीर यांच्या थडग्याच्या दोन्ही बाजूस एकेक अशी दोन थडगी आहेत. हो दोन थडगी कोणाची याबद्दल निश्चित माहिती कोणाकडे नाही. मात्र ब्रिटीश गॅझेटिअर मधील उल्लेखांवरुन ही थडगी बालापीर यांची पत्नी व मुलाची असावीत असा तर्क आहे. मशिदीच्या आवारात बालापीरचा बैल व घोडा यांचीही कच्चे बांधकाम केलेली लाल दगडात बांधलेली थडगी आहेत. मात्र एकाही थडग्यावर कोणतीही लिखित माहिती उपलब्ध नाही. बालापीर दर्गा व मशिदीचे बांधकाम मात्र अतिशय रेखीव व वैशिष्टय़पूर्ण असेच आहे.

येथील मशिदीजवळच एका खळग्यात एक ‘ मन्नतवाला पत्थर ‘ आहे. मात्र सध्या या ठिकाणी वन्य वपस्पती व गवत बेसुमार वाढल्याने तो मन्नतवाला पत्थर पटकन दृष्टीस पडत नाही. या पत्थर विषयी एक अद्भुत श्रद्धा आहे. हा दगड आपल्या मनातली मन्नत पूर्ण करतो अशी ही श्रद्धा आहे. खोलगट भांड्याच्या आकाराचा हा दगड एकाच हाताने जर कोणी उचलला तर त्याच्या मनातली सगळी मन्नत पूर्ण होते असे म्हणतात. मात्र आजपर्यंत हा दगड कोणी कोणी उचलला व त्यांची मन्नत खरेच पूर्ण झाली का याविषयीची माहिती कोणाकडे उपलब्ध नाही. तसेही हा दगड खूप जड व उचलावयास कठीण असल्याने तो उचलण्याची कोणीही सहसा हिंमत दाखवित नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून देर्दे येथील मुजावर कुटुंबिय या बालापीर दर्गा व मशिदीची व्यवस्था पाहतात. मुजावर कुटुंबियांच्या पुर्वजांकडे इ.स. १६५० मध्ये हबशीने या दर्ग्याची सनद सुपूर्द केली होती. पुढे इ.स. १८७४ पर्यंत पेशवे व आंग्रे यांनीही ही सनद तशीच पुढे चालू ठेवली होती. येथील मुजावर कुटुंबियांकडे याबाबतची जुनी कागदपत्रे उपलब्ध आहेत. अगदी अलीकडे सन १९७४ पर्यंत दरवर्षी रुपये अठरा याप्रमाणे ही सनद रक्कम मुजावर कुटुंबियांकडे जमा होत होती. मात्र आता ही सनद बंद झाली आहे.

 

वर उल्लेख केल्याप्रमाणे आजही येथील मुजावर कुटुंबिय या मशिदीची व बालापीर दर्ग्याची यथाशक्ती देखभाल करतात. बालापीर हे मुस्लिम बांधवांचे प्रसिद्ध व पवित्र श्रद्धास्थान आहे. अनेक श्रद्धाळू लोक आजही या दर्ग्याजवळ जाऊन नतमस्तक होतात. नवसे येथील मुस्लिम बांधवांच्या पुढाकाराने दरवर्षी मुस्लीम रजब महिन्याच्या २९ तारखेस या ठिकाणी बालापीर उरुस साजरा केला जातो. दाभोळ परिसरातील अनेकजण या उरुसात सामील होतात. मुसलमानांसोबतच अनेक हिंदू बांधवही मोठ्या श्रद्धेने बालापीर उरुसात सामील होतात. हिंदू व मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा बालापीर उरुस संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. बालापीर दर्गा व येथील मशीद ही एक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. इतिहासाचे अभ्यासक व अनेक पर्यटक या क्षेत्राला आवर्जून भेट देत असतात. बालापीर या मुस्लिम संतांबद्दल आजही येथील परिसरात पवित्र श्रद्धा आहे. बालापीर दर्ग्याजवळ बालापीर यांचा आजही नितांत वास असून ते आजही या उंच ठिकाणावरून दूरवरपर्यंत लक्ष ठेवून आहेत आणि दाभोळ परिसरातील त्याच्या लेकरांचे रक्षण करत आहेत अशी भावना येथे आजही कायम आहे.

©️ तालुका दापोली डाॅट काॅम फिचर्स.
संदर्भ

१. आजिझ मुजावर – नवसे
२. सुलतान मुजावर-नवसे
३. ब्रिटीश गॅझेटमधील संदर्भिय उल्लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here