पालगड किल्ला – दापोली

0
10590

दापोली तालुक्यातील ‘पालगड’ हे ‘परमपूज्य साने गुरुजी’ यांचे गाव. या गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून साधारण १२००-१५०० मीटर उंचावर असलेला एक छोटेखानी किल्ला आहे. तो म्हणजे ‘पालगड किल्ला.’

ह्या किल्ल्याची प्रथम पायाभरणी कोणाच्या काळात झाली, याबद्दल निश्चित असा ऐतिहासिक पुरावा नाही. पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्याशी जोडलेला होता, अशी शाश्वत माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारताना हर्णे येथील सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी केली, तेव्हा किल्ल्याच्या बांधणीसाठी व रसद पुरवण्यासाठी पालगड आणि मंडणगड किल्ल्याचा उपयोग केला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. (हर्णे ते पालगड अंतर सरळ रस्त्याने जाता सुमारे ४०- ४५ कि.मी. तर आडमार्गे जाता ३०- ३५ कि.मी. आहे.) मंडणगड किल्ल्याचे गडकरी ‘दळवी’ (पालवणीचे) हे किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने ‘बेलोसे व पवार’ कुटुंबात करून त्यांच्याशी सोयरीक जोडली आणि किल्ल्याची व्यवस्था ‘बेलोसे व पवार’ यांजवळ दिली. किल्ल्याचा वापर रसद, शस्त्रसाठा आणि दारूगोळा साठविण्यासाठी होत असावा. कारण किल्ला अतिशय लहान म्हणजे एक ते दीड एकरमध्ये आहे. किल्ल्यावर लढाईच्या फारश्या खाणाखुणा नाहीत. किल्ल्यावर पाच तोफा आढळल्या, त्यातील २ किल्ल्यावर आणि २ किल्ले माचीत आहेत. (माची म्हणजे किल्ल्याभोवतालची जमीन, शत्रूला थोपविण्याची जागा. माची सर झाल्यास शत्रूला किल्ला आरामात ताब्यात घेता येतो.) पालगड किल्ल्याला चार माची आहेत: जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची. या किल्ल्याच्या चारही बाजूला मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील किल्ले माची फक्त खेडच्या बाजूस आहे. इतर तीन दापोलीच्या दिशेने. किल्ल्याकडे जाणारा सोयीचा मार्ग किल्ले माची व राणे माचीतून आहे. किल्ल्यावरील एक तोफ श्री. क्षेत्र परशुराम, चिपळूण येथे आहे, असे सांगण्यात येते. किल्ल्याच्या पायथ्याला जुनी बाजारपेठ आहे. त्यात बारा बलुतेदारांची वस्ती आहे. किल्ल्याखाली हिरवी गर्द देवराई आहे. या देवराईत पालगडची देवी ‘श्री. झोलाई’ हिचे मंदिर आहे.

मंदिराकडून जी किल्ल्याकडे पायवाट जाते, ती अतिशय उंच, निमुळती आणि दोहो बाजूस जंगल व खोल दरी अशाप्रकारची आहे. वर किल्ल्यावर जाण्यासाठी दोनशेच्या आसपास पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोर दोन बुरुज दिसतात. बुरुजाच्या मधून केवळ दोन माणसे प्रवेश करू शकतील एवढा निमुळता दरवाजा आहे. साधारण ८ फूट उंच व ३ फूट रुंद असा दरवाजा दगडी बांधकामात आहे. किल्ल्याला हे एकच प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार उत्तर दिशेस आहे. किल्ल्याची तटबंदी नैसर्गिक डोंगरकडा कापून तयार झाली आहे. नैसर्गिक कड्याच्या वर सुमारे १०-१५ मीटर उंचीची भिंत उभारून तटबंदी तयार केली आहे. ही तटबंदी आज बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे. त्यात किल्ल्याची भिंत काही ठिकाणी निसर्गत: डोंगरकडा सरळसोट कापून तयार केलेली असल्यामुळे त्यावर तटबंदी भिंत उभारण्याची गरज भासली नसावी. किल्ल्याच्या आतील सर्वच इमारती आज कोसळलेल्या आहेत. त्यांच्या पायाचा भागच जुन्या खुणा म्हणून शिल्लक आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस दगड खोदून बांधलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्यावर एकही विहीर नाही. एक भूयारी वाट आहे. ती सध्या भुजलेली असून मंडणगड किल्ल्याकडे जाते, असे म्हटले जाते. नैसर्गिक तटबंदीमुळे किल्ला अतिशय मजबूत आणि सुरक्षित असल्याचे आढळून येते. सरळसोट कापलेला डोंगरकडा शत्रूला चढून वर येण्यास अगदीच अशक्य असल्याचे दिसते. किल्ल्याच्या सुरक्षिततेचा विचार किल्ला बांधतानाच केलेला दिसतो. दोन डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य किल्ला दुरून दिसत नाही. (खेड व दापोली दोन्ही बाजूने) किल्ल्याच्या एका बाजूला टकमक टोकासारखा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला आयताकार डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगराचा आकार पालीसारखा म्हणून किल्ल्याला ‘पालगड’ हे नाव देण्यात आले. (पूर्वी पालील किंवा पालगडात जाताना ‘पालनात जातो’ असे म्हटले जायचे.) एक आख्यायिका अशी की, किल्ल्याचे बांधकाम प्रथम मधल्या डोंगरावर न होता आयताकार डोंगरावर होणार होते, ज्याला रामगड म्हणतात. पण डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि त्यावेळच्या समजुतीनुसार आपण शत्रूपासून भविष्यात कच खाऊ या भावनेला अनुसरून किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली. हा किल्ला खेडचा रसाळगड व मंडणगड किल्ला या दोहोंमधील थांबा किंवा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना व टेहळणीसाठी बांधण्यात आला असावा, असे वाटते. किल्ल्याचा मध्ययुगीन ते ब्रिटीश कालखंडापर्यंतचा पूर्ण इतिहास आढळत नाही. अतिशय त्रोटक असे काही उल्लेख आढळतात. त्यात पहिला बाजीराव आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाली होती, असा एक उल्लेख सापडतो.

संदर्भ

  • रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले – श्री. रघुनाथ रामकृष्णाजी बोरकर
  • गणेश मुंगशे – शिक्षक जि.प.शाळा, पालगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here