विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना अर्पण केली. “दान दिलेली ही भूमी माझी आहे. इथे राहण्याचा तूला अधिकार नाही…” असे महामुनी कश्यपांनी परशुरामांना बजावले आणि दक्षिण तीराकडे जाण्यास सुचविले. समुद्रवलयांकित पृथ्वीचे दान केल्यानंतर आपला आश्रम समुद्रगर्भातील भूमीवरच होणे रास्त आहे, हे लक्षात घेऊन बरेच देश ओलांडून ते पश्चिम दिशेला सह्य पर्वतावर आले. त्यांनी समुद्राला विनंती केली की, मला तुझ्याकडून आश्रमासाठी थोडा भूभाग हवा आहे. पण सागराने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परशुराम कोपित झाले आणि त्यांनी आपल्या भात्यातून एक अग्निबाण काढला व धनुष्याला लावला. समुद्र भीतीने शरण आला. “मी तुझे संरक्षण करीन, पण माझा बाण वाया जाऊ शकत नाही. हा बाण जेथे जाऊन पडेल तेवढी रुंदी आणि या सह्य पर्वताच्या लांबीएवढा भूभाग तू मला दिला पाहिजेस.” समुद्राने ही गोष्ट मान्य केली आणि सहा योजने रुंद आणि चारशे योजने लांब अशा पश्चिमेकडील शेवटची भूमी म्हणून कोकणाची निर्मिती झाली. परशुरामांनी या नवनिर्मित प्रदेशात देशोदेशीच्या ऋषींना, तज्ज्ञांना पाचारण करून जमिनीची मशागत केली, गोधन आणले, जमिनीची प्रत तपासून वृक्ष लागवड केली, पिके कोणती घ्यावी हे ठरवले, वसाहती स्थापन केल्या, कोकण भूमीला ‘सुजलाम् सुफलाम्’ केले.
अशा भगवान परशुरामांचे मुर्तरूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोहचावा म्हणून दापोलीत बुरोंडी येथे ‘चिरंजीव परशुराम भूमी’ स्मारक निर्माण करण्यात आले आहे. इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रा.लि.भोसरी आणि मॉर्डन ऑप्टिशियन्स, पुणे यांचे संचालक श्री. अनिल गोविंद गानू आणि सौ. अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे. स्मारकात ४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंचीची परशुरामांची भव्य मूर्ती उभी आहे. ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लासमध्ये बनवलेली आहे. सोलापूरचे शिल्पकार श्री. ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी वर्षभराच्या मेहनतीतून ही मूर्ती साकारली आहे. १६ नोव्हेंबर २०१० रोजी स्थानापन्न करण्यात आलेली ही मूर्ती उत्तराभिमुख असून तामसतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्र किनाऱ्याचे दर्शन तेथून घडते. खालील अर्धगोल पृथ्वीच्या आत भव्य दालन आहे. या मोठ्या व्यासाच्या अर्धगोलात एकही खांब नाही. फेरो क्रीट पद्धतीने हा अर्धगोल तयार केलेला आहे. स्मारकाभोवतीची निसर्ग सौंदर्यता अद्भुत आहे. पूर्वेस व दक्षिणेस हिरव्यागार डोंगररांगा आहेत. दापोलीत येणारे पर्यटक या स्मारकाला मोठ्या प्रमाणवर भेट देतात.
संदर्भ
- शोध अपरान्ताचा – अण्णा शिरगांवकर
- परिचित अपरिचित दापोली – विजय अनंत तोरो
- परशुराम स्मारक, बुरोंडी